पक्ष वाढला, पण कार्यकर्ते पोरके झाले” — नेत्यांना परिवार पदावर आणि कार्यकर्ते मैदानात हवे ! शिरपूरच्या राजकारणातून उघड होत असलेली भाजपातील अंतर्गत लोकशाहीची शोकांतिका ✍️ राजकारण - संपादकीय : महेंद्रसिंह राजपूत

 


“पक्ष वाढला, पण कार्यकर्ते पोरके झाले” —

नेत्यांना परिवार पदावर आणि कार्यकर्ते मैदानात हवे !


 शिरपूरच्या राजकारणातून उघड होत असलेली भाजपातील अंतर्गत लोकशाहीची शोकांतिका


✍️ राजकारण - संपादकीय : महेंद्रसिंह राजपूत



शिरपूर तालुका कधीकाळी काँग्रेसचा अतूट बालेकिल्ला. काँग्रेसचं अस्तित्व इतकं भक्कम होतं की विरोधकांचे उमेदवार जिंकेल ही कल्पनाही करणे कठीण. पण आज परिस्थिती पूर्ण उलटली आहे. काँग्रेस भवन जशी जीर्ण अवस्थेत पडून आहे, तशीच काँग्रेसची संघटन-शक्ती देखील भग्नावस्थेत. आणि यातून भाजपाला राजकीय विस्ताराची मोठी संधी मिळाली—पण ही संधी पक्षाने योग्य हातांना दिली का? हा प्रश्न आज सर्वत्र गुंजत आहे. काँग्रेस मधून शिरपूर भाजपमध्ये मोठी आयात झाल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते म्हणत होते की ते आमच्यात आले आम्ही त्यांच्यात नाही गेलो, मात्र आज मूळ भाजपवासी आपल्याच पक्षात पोरके झाले असे चित्र आहे.

भाजपाची आजची ताकद ही अचानक निर्माण झालेली नाही. शिरपूर तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते हे वादळ, पराभव, विरोध, आणि राजकीय उपेक्षा सहन करत दशकानुदशके पक्षाशी चिकाटीने राहिले. सत्ता नसताना गावागावातून विचारांची मशाल पेटवत राहिले. झेंडा, पोस्टर, सभा—हे सर्व त्यांच्या कर्तुत्वावर चालत राहिले.

परंतु सत्तेच्या काळात मात्र चित्र धक्कादायक आहे. ज्यांनी भाजपाला शून्यातून शिखरावर आणलं, त्यांनाच आज स्वतःच्या पक्षात अपमान, दडपशाही, आणि दुर्लक्ष सहन करावं लागत आहे. आज तेच कार्यकर्ते पोरके झाले आहेत, वंचित झाले आहेत—आपल्या पक्षातच परके झाले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना आपल्याला संधी मिळेल अशी भाबडी आशा होती.तालुक्यातील परिस्थिती पाहिली तर भाजपात “नव्या चेहऱ्यांना” संधी देण्याच्या नावाखाली ‘राजकीय आयात’ सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना—कोणत्याही पक्षातून आलेला नेता तात्काळ भाजपाचा “मुख्य चेहरा” बनतो. आणि ज्या कार्यकर्त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, पक्षासाठी आहुती दिल्या—ते मात्र कोपऱ्यात ढकलले जातात.

नवीन आलेल्यांना तिकीट, जुन्यांना तोंडदेखली तारीफ.नवीन आलेल्यांना पदं, जुन्यांना फक्त पोस्टर लावण्याचं काम.नवीन आलेल्यांना महत्त्व, जुन्यांना ‘निष्ठावंत’ म्हणून हेटाळणी. आणि प्रमुख पदांवर फक्त परिवारातील सदस्यांची निवड.ही स्थिती भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांसाठी अत्यंत अपमानास्पद ठरत आहे.

यापूर्वी डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढत भाजपा प्रचारयात्रा काढली. वर्षानुवर्षे त्यांनी भाजपासाठी निष्ठा राखली, कार्यकर्ते एकत्र बांधले. पण ऐनवेळी त्यांचे तिकीट कापून थेट काँग्रेसमधून आलेल्या काशीराम पावरांना उमेदवारी देण्यात आली.

या निर्णयाने भाजपातील निष्ठावंत सैनिकांच्या छातीत खंजीर खूपसल्यासारखे झाले. कार्यकर्त्यांनी स्वतःच प्रश्न विचारायला सुरुवात केली —“आम्ही कशासाठी झटलो? ज्यावर विश्वास ठेवून काम केलं, त्यांनाच बाजूला सारलं तर आमची किंमत काय?”

हे प्रश्न केवळ शिरपूरपुरते मर्यादित नाहीत—हा देशभरातील भाजप कार्यकर्त्यांच्या अंतर्मनातला आवाज आहे.

लोकशाहीचा गाभा म्हणजे कार्यकर्त्यांचा सहभाग, विचारांची देवाणघेवाण, आणि संघटनाबद्दलचा आदर. पण सत्तेची मस्ती चढली की लोकशाहीची ही मौलिक तत्त्वे सर्वात आधी मृत्युमुखी पडतात.आज भाजपातही हीच स्थिती आहे:निर्णय काही मोजक्या व्यक्तींच्या हातात केंद्रीत,जुन्या कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतले जात नाही,पक्षांतर्गत निवडणुका औपचारिकता बनल्या,परिवारवाद आणि गटबाजी वाढली,आयात नेत्यांना अधिकाधिक प्राधान्य,यामुळे भाजपातील अंतर्गत लोकशाही धोक्यात आली आहे. पक्ष आज एका व्यक्तीपुरता, एका गटापुरता केंद्रित होऊ लागला आहे.

आज भाजपातील अनेक निष्ठावंत कार्यकर्ते स्वतःला केवळ “इव्हेंट मॅनेजर” समजू लागले आहेत.झेंडे उचला,मोर्चे काढा,पोस्टर लावा,लोकांना आणा,सोशल मीडियावर पोस्ट करा, आणि एवढ्यावरच त्यांची भूमिका संपते.

निर्णयक्षमता, धोरणनिर्मिती, तिकीट वाटप, पक्षाचे दिशानिर्देश—या सर्व ठिकाणी त्यांच्या मतांचा काहीच उपयोग नाही. परिणामी निराशा, राग, आणि असंतोष वाढत आहे. अनेकांनी या कारणास्तव पक्ष देखील सोडला.

काँग्रेस जेव्हा सत्तेत होती, तेव्हा तिची संघटना जीर्ण झाली.आज भाजप सत्तेत आहे, आणि त्याची संघटनक्षमता तडकू लागली आहे.

शिरपूर तालुक्यातील जीर्ण काँग्रेस भवन जसा अवशेषासारखा दिसतो, तसाच भाजपातील अंतर्गत लोकशाहीचा ढासळता पाया लोकांपुढे उघड होत आहे. सत्ता असल्यावरही कार्यकर्ते दुःखी, निराश, आणि उपेक्षित झाले आहेत. हे एक कटू वास्तव आहे.

सत्ता टिकवायची असेल तर कार्यकर्त्यांचा आदर परत मिळवावाच लागेल** शिरपूर तालुक्याचे राजकीय वातावरण स्पष्ट संदेश देत आहे—कोणताही पक्ष कार्यकर्त्यांशिवाय नाही, आणि कार्यकर्त्यासोबत अन्याय ठेवलात तर पक्ष टिकणार नाही.

भाजपला आज कार्यकर्त्यांची पुन्हा मनधरणी करावी लागेल.जुन्यांची किंमत ओळखावी लागेल.आयात नेत्यांना ताबडतोब प्रमुखपद देण्याची प्रथा थांबवावी लागेल. नाहीतर शिरपूरपासून सुरू झालेला हा असंतोष उद्या इतर तालुक्यांमध्ये आणि राज्यभरात धग धग करत उठेल—आणि तेव्हा भाजपला समजेल की सत्ता टिकवण्यासाठी सर्वात मोठा आधार असतो तो पक्षाचा जुना निष्ठावंत कार्यकर्ता. तोपर्यंत वेळ निघून गेली असेल. त्यामुळे शिरपूर तालुक्यात पक्ष वाढला, पण कार्यकर्ते पोरके झाले” आणि राजकीय दृष्ट्या उपेक्षित राहिले. अशीच काहीशी परिस्थिती आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने