धुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच एम.डी. ड्रग्जची तस्करी उघड – १७.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

 


धुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच एम.डी. ड्रग्जची तस्करी उघड – १७.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत


धुळे : धुळे जिल्ह्यात प्रथमच एम.डी. (Methdrone) या घातक अंमली पदार्थाच्या तस्करीचा भांडाफोड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी १७ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


२५ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मालेगाव येथील सैय्यद आतिक सैय्यद रफीक (वय ३७) आणि राजस्थानमधील मजहर खान युसूफ खान (वय ३३) हे दोघे कार (क्रमांक GJ 16 DS 0314) मधून जळगावकडून धुळे दिशेने एम.डी. पावडर घेऊन येत असल्याचे समजले. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी शिवारातील हॉटेल रेसिडेन्सी पार्कजवळ सापळा रचण्यात आला.


वाहन अडविल्यानंतर आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून १०.४० लाख रुपये किमतीची १०४ ग्रॅम एम.डी. पावडर, ७ लाखांची हुंडाई कार, ११ हजारांचे मोबाईल फोन असा एकूण १७.५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


आरोपींनी प्राथमिक चौकशीत याआधीही धुळे शहरात एम.डी. ड्रग्जची विक्री केल्याचे कबूल केले आहे. या घातक ड्रग्जचा वापर प्रामुख्याने उच्चभ्रू वर्गातील पार्ट्यांमध्ये होत असल्याचे समोर आले आहे. या जाळ्यात आणखी कोण सहभागी आहेत आणि खरेदीदार कोण आहेत याचा तपास सुरू आहे.


या कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय श्रीराम पवार, सपोनि श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंदे, संजय पाटील तसेच अंमलदार राहुल सानप, पवन गवळी, आरीफ पठाण, देवेंद्र टाकुर, प्रकाश सोनार, जगदीश सुर्यवंशी आणि अमोल जाधव यांनी विशेष भूमिका बजावली.


पोलिसांनी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात NDPS कायदा 1985 कलम 8(क), 21(क), 29 अंतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तपास सुरू असून जिल्ह्यातील ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे शोधले जात आहेत.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने