युवकांना घडवणारी राष्ट्रीय सेवा योजना,२४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिवस /
विशेष लेख -महेश मोतीलाल पाटील
शालेय शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड, महाराष्ट्र छात्रसेना, राष्ट्रीय छात्रसेना, पर्यावरण, यातूनच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, देशासाठी काहीतरी केले पाहिजे, या भावनेतून त्यांना समाजसेवेचे शिक्षण दिले जाते, परंतु महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक हा या देशाचा कणा आहे. यावर देशाचे संपूर्ण भवितव्य आधारलेले आहे. म्हणून युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, देशासाठी काहीतरी करण्याची उम्मेद निर्माण व्हावी म्हणून “ राष्ट्रीय सेवा योजना”, हा उपक्रम विद्यार्थ्यासाठी राबविण्यात आला.
महात्मागांधी म्हणतात कि भारत हा खेड्यांचा देश आहे. खेड्याकडे चला, भारत स्वतंत्र होऊन इतकी वर्ष झाली, तरीही खेड्यांमध्ये आजही सोयी, सवलती उपलब्ध झालेल्या नाहीत, खेड्यातील नागरिक अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत, या वर्गालाही आपला हक्क मिळावा, त्यांच्यात समाज प्रबोधन व्हावे, या उद्देशानेच राष्ट्रीय सेवा योजनेची निर्मिती झाली. महात्मा गांधीच्या स्वतंत्र भारताचे स्वप्नपूर्तीच्या दृष्टीनेच “राष्ट्रीय सेवा योजनेचे”, प्रकल्प राबविले जातात.
१९५० पासूनच विद्यापीठ आयोगाने विद्यार्थ्यांसाठी समाजसेवा करणारे, लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी अनेक समित्या स्थापन करून अहवाल मागविण्यात आले. १९६४ मध्ये भारत सरकारच्या शिक्षण सुधारणा आयोगाचे अध्यक्ष डॉ. कोठारी यांनी आपल्या अहवाला मध्ये समाजसेवा कार्यक्रम राबविण्याची शिफारस केली. १९६९ मध्ये कुलगुरूंच्या बैठकीत “राष्ट्रीय सेवा योजनेला”. मंजुरी देण्यात आली. २४ सप्टेंबर १९६९ रोजी शिक्षण मंत्र्यांनी या योजनेची घोषणा केली.
२४ सप्टेंबर १९६९ पासून म्हणजे महात्मा गांधींच्या जन्मशताब्धी वर्षापासून भारत सरकारच्या युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना हा उपक्रम राबविण्यात येवू लागला. देशातील सर्व विद्यापीठामधील संलग्नित महाविद्यालयातील ३० ( तीस लाखाहून) अधिक विद्यार्थीचा यात समावेश झाला आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी सक्रीय सहभाग नोंदवावा लागतो. पुस्तकी ज्ञानाबरोबरच तो समाजसेवा तसेच श्रमप्रतिष्ठेचे धडेही घेत असतो. राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्यांसाठी खुले व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात नेतृत्व कौशल्य गुण आत्मसात केली जातात.
राष्ट्रीय सेवा योजने मार्फत ग्राम दत्तक योजनेतून ७ (सात) दिवशीय किवा १० (दहा) दिवशीय निवासी हिवाळी शिबिरे महाविद्यालयां मार्फत घेतली जातात. निवासी शिबिरांमध्ये महाविद्यालयीन युवक व युवती मोठ्या संखेने सहभागी होतात. या शिबिरांमध्ये विद्यार्थी हे पर्यावरण, साक्षरता, अंधश्रद्धा निर्मुलन, एड्स जनजागृती अभियान, स्त्री-पुरुष समानता, स्त्री भ्रूण हत्या, अश्या अनेक सामाजिक विषयांवर विद्यार्थी पथनाट्ये सादर करून प्रबोधनाच्या माध्यमातून ग्रामीण लोकांमध्ये जनजागृती करीत असतात.
महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना खेड्यातील लोकांपर्यंत पोहोचवण्याच काम राष्ट्रीय सेवा योजने स्वयंसेवक करीत असतात.
राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून गाव दत्तक योजनेतून अनेक गावांमध्ये शोषखड्डे, शेततळे, वनराई बंधारे, वृक्षारोपण, या कार्यक्रमांमधून या गावांमधील आरोग्याची व पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. इतरांसाठी झटता- झटता या विद्यार्थ्यांमध्येही अनेक गुण आत्मसात झालेले आहेत. स्वतःचे व्यक्तिमत्व बदलण्याची क्षमता राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून विद्यार्थ्यांना मिळत असते.
NOT ME BUT YOU (नॉट मी बट यू) “माझ्यासाठी नव्हे तुझ्यासाठी सेवा”, हे ब्रीदवाक्य असलेले बोधचिन्ह विद्यार्थी जेव्हा आपल्या छातीवर लावत असतो त्यावेळी विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळीच शक्ती निर्माण होऊन तो नैतिकतेच्या व दुसर्याला मदत करण्याच्या भावनेतून काम करीत असल्याची जाणीव त्याच्यात निर्माण होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे बोधचिन्ह हे कोणार्कच्या सुर्यमंदिराच्या रथचक्रावर आधारित आहे. हे विशाल चक्र मानवी जीवनात गतीचे महत्व सांगत असते. स्वयंसेवक हा सूर्याप्रमाणे सर्व जग प्रकाशमय करणारा निर्माण झाला पाहिजे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संवेदनशील अंत: करणाने आपल्या कार्यात सातत्य ठेवले पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी हा खर्या अर्थाने सर्वगुण संपन्न बनत असतो. अनेक ठिकाणी आव्हाने स्वीकारण्याची त्याची मनाची तयारी बनलेली असते. तसेच तो साम्प्रदाईक सदभावना बाळगून असतो, आणि असा युवक जीवनात कधी हि अपयशी होत नाही.
रक्तदान शिबिरे, पोलियो लसीकरण, व्यसनमुक्ती, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, स्त्री भ्रूण हत्या, अश्या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सुद्धा राष्ट्रीय सेवा योजनेचे युवक सक्रीय सहभाग नोंदवतात. अतिशय मागास, दुर्लक्षित, दुर्बल, घटकांपर्यंत राष्ट्रीय सेवा योजना पोहोचलेली आहे. व या वंचित घटकांच्या उत्थानासाठी अनेक कार्यक्रम हाती घेतले जात आहेत.
महाविद्यालयीन व विद्यापीठस्तरीय शिबिरांमधून विद्यार्थ्यांना आपत्कालीन प्रशिक्षण शिबीर, साहस शिबीर, मैत्री शिबीर, व्याख्याने यामधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या अडी-अडचणी सोडवणे, त्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो. तसेच प्रजाक सत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना आपल्या देशाच्या जवानांसोबत दिल्लीच्या मैदानावर परेड करण्याची संधी मिळते. यातूनच खर्या अर्थाने तो युवक समाज सुधारणेच्या कामात स्वत:ला झोकून देत असतो.
भारताला जर खरोखर महासत्ता बनायचे असेल तर अश्या युवकांनी स्वत:हून राजकारणात प्रवेश करून या देशातील घाणेरडे राजकारण थांबबून समाजकार्याची एक लाट निर्माण करतील व या लाटेत सर्व भ्रष्टाचार वाहून निघेल. तेव्हाच खर्या अर्थाने माझ्यासाठी नाहीतर तुमच्यासाठी हा राष्ट्रीय सेवा योजनेच्या बोधवाक्याचा खरा अर्थ सध्या होईल.