लोकहितवादी अष्टपैलू व्यक्तिमत्व : दादासाहेब रावल लेख - रणवीर सिंह राजपूत, नंदुरबार ,ठाणे

 


लोकहितवादी अष्टपैलू व्यक्तिमत्व : दादासाहेब रावल


लेख - रणवीर सिंह राजपूत, नंदुरबार ,ठाणे



आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात असंख्य क्रांतिकारकांनी हौतात्म्य पत्करले, तर अनेक थोर स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्योत्तर काळात समाज आणि राष्ट्राच्या विकासाला आयुष्य वाहिले. त्यामध्येच एक झगमगता व्यक्तिमत्व म्हणजे स्व. दादासाहेब उर्फ जयसिंह दौलतसिंह रावल. त्यांच्या कार्याचा मागोवा घेतला की, समाजहित, सहकार, शिक्षण, उद्योग, दानशीलता आणि शेतकऱ्यांच्या उत्कर्षाचा एक विलक्षण संगम दिसून येतो.


स्वातंत्र्यसैनिक ते लोकप्रतिनिधी


दादासाहेबांनी आयुष्याची सुरुवात स्वातंत्र्यलढ्यापासून केली. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढताना त्यांनी तुरुंगवास भोगला. स्वातंत्र्यानंतर ते मुंबई राज्याचे पश्चिम खान्देशमधील पहिले आमदार म्हणून विधिमंडळात पोहोचले. शेतकरी, शोषित व वंचित घटकांचा आवाज बनून त्यांनी विधानसभेत प्रभावी भूमिका निभावली.


सहकार महर्षी व शेतकऱ्यांचे कैवारी


दादासाहेबांचे आयुष्य म्हणजे सहकाराच्या तत्त्वज्ञानाची सजीव प्रयोगशाळा होती. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी शिंदखेडा सहकारी दूध संघ स्थापन केला. धुळे जिल्हा सहकारी बँकेचे ते पहिले संस्थापक अध्यक्ष होते. पुढे ‘दादासाहेब रावल सहकार बँक’ उभारून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ दिले. सहकाराला समाजजीवनाचा आधार बनवण्याचे श्रेय दादासाहेबांना जाते.


औद्योगिक दृष्टी व नवीन वाटा


देशातील पहिल्या काही उद्योगपतींपैकी एक म्हणून दादासाहेबांनी स्टार्च केमिकल इंडस्ट्री सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारला. महाराष्ट्रातील पहिली आणि देशातील चौथी अशी ही उद्योगसंस्था ठरली. ग्रामीण भागात उद्योग संस्कृती रुजविण्याचे कार्य त्यांनी केले.


शिक्षण महर्षी व सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार


दादासाहेबांना शिक्षणाची ताकद चांगलीच ठाऊक होती. धुळे येथे महाराष्ट्रातील पहिली अभियांत्रिकी (आय.टी.आय.) संस्था उभारून त्यांनी युवकांसाठी रोजगारक्षम शिक्षणाची दारे खुली केली. ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षणसंस्थांचे जाळे निर्माण केले. विशेष म्हणजे, मुलींनी शिकून स्वावलंबी व्हावे या उदात्त हेतूने त्यांनी मुलींची शाळा स्थापन केली.


दानशीलता व लोकहितकारी विचार


दादासाहेबांनी स्वतःच्या मालकीची जमीन शासकीय कार्यालयांसाठी दान केली. दोंडाईचा व परिसरातील जनतेच्या सोयीसाठी रेल्वे उभारणीसाठी त्यांनी केंद्रीय रेल्वेला स्वतःची जमीन दिली. हे त्यांचे लोकहितवादी विचारांचे द्योतक आहे.


ज्येष्ठ नागरिकांसाठी आगळे कार्य


जगाच्या पातळीवर ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या चर्चेत येण्याआधीच दादासाहेबांनी त्यांचा विचार केला. दोंडाईचा येथे पहिले ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करून त्यांनी वृद्धांच्या आयुष्यास आधार दिला.


लोकहितवादी वारसा


स्वातंत्र्यसैनिक, सहकार महर्षी, शेतकऱ्यांचे कैवारी, शिक्षण महर्षी, उद्योगपती, दानशूर समाजसेवक अशा अनेक पदव्या दादासाहेबांच्या नावाशी जोडल्या जातात. पण यापलीकडे त्यांचा खरा वारसा म्हणजे लोकहितासाठी झटणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व.


आजच्या राजकारणात आणि समाजजीवनात दादासाहेबांच्या विचारांची आणि कार्यपद्धतीची नितांत गरज आहे. स्वार्थासाठी नव्हे तर समाजासाठी जगण्याचे भान त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या स्मृतीला अखिल भारतीय क्षत्रिय राजपूत समाजावतीने वाहिलेली आदरांजली म्हणजे त्यांच्या कार्याची खरी पावतीच म्हणावी लागेल.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने