साक्री कृषी कार्यालयात एसीबीची धडक कारवाई : सहाय्यक कृषी अधिकारी व डाटा ऑपरेटर लाच घेताना रंगेहात

 


साक्री कृषी कार्यालयात एसीबीची धडक कारवाई : सहाय्यक कृषी अधिकारी व डाटा ऑपरेटर लाच घेताना रंगेहात



धुळे :

शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व मुख्यमंत्री शेतकरी महासन्मान निधी योजनेतील अनुदानाच्या रकमेच्या मोबदल्यात १०,००० रुपयांची लाच मागणाऱ्या सहाय्यक कृषी अधिकारी व डाटा ऑपरेटरला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे.


माहितीनुसार, मौजे पन्हाळीपाडा (ता. साक्री) येथील तक्रारदार शेतकऱ्याच्या नावाने आलेल्या अनुदान रकमेबाबत सहाय्यक कृषी अधिकारी मनसीराम कोळशीराम चौरे (वय ५५) व डाटा ऑपरेटर रिजवान रफिक शेख (वय २३) यांनी एकत्रितपणे १०,००० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार धुळे एसीबीकडे केली.


एसीबीने प्राथमिक तपासणी करून १ सप्टेंबर २०२५ रोजी सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराशी बोलणी करताना आरोपींनी १०,००० रुपयांची मागणी निश्चित केली होती. त्यानंतर कारवाई दरम्यान रिजवान शेख या डाटा ऑपरेटरने तक्रारदाराकडून ७,००० रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोन्ही आरोपींना रंगेहात पकडले.


ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या पर्यवेक्षणाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्रीमती पद्मावती कलाल व पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींचा सहभाग होता.


ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


नागरिकांना आवाहन

भ्रष्टाचारविरोधी विभाग, धुळे यांच्यातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, शासकीय/निमशासकीय अधिकारी, कर्मचारी अथवा खाजगी दलालांनी लाच मागितल्यास नागरिकांनी त्वरित एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने