*शिरपूरचे तहसीलदार महेंद्र माळी यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव*
शिरपूर: विविध शासकीय कामे आणि योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल शिरपूरचे तहसीलदार महेंद्र माळी यांना धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते 'प्रशस्तीपत्र' देऊन गौरवण्यात आले आहे. १ ऑगस्ट २०२४ ते ३१ जुलै २०२५ या महसुली वर्षातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
महसूल दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते तहसीलदार माळी यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. आणि या सन्मानामुळे शासकीय कामांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोबल वाढेल असे सांगितले.
या यशाबद्दल उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनीही तहसीलदार माळी यांचे अभिनंदन केले आहे. तहसीलदार माळी यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर तालुक्याने महसूल आणि गौणखनिज वसुली, लोकसभा, विधानसभा निवडणूक २०२४ मधील कामकाज, तसेच ई-फेरफार प्रणाली व संजय गांधी निराधार योजनेसारख्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विशेषतः, राज्यातील १०० दिवसीय कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात नाशिक विभागात शिरपूर तहसील कार्यालयाने तिसरा क्रमांक मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे.
त्यानुसार तहसीलदार माळी यांनी शिरपूर तालुक्यात लोकाभिमुख प्रशासन निर्माण केले म्हणून सदरचा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.