"महाराष्ट्रात ‘ट्रिपल इंजिन सरकार’चं अध:पतन आणि लोकशाहीची होरपळ
✒️ - महेंद्रसिंह राजपूत
मुख्य संपादक, निर्भीड विचार
महाराष्ट्र या प्रगत आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या राज्याची आजची स्थिती पाहिली तर कोणत्याही संवेदनशील आणि सुजाण नागरिकाच्या काळजाला हादरा बसतो. राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे, आमदारांच्या बेजबाबदार वर्तनामुळे आणि कायद्याच्या व्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीमुळे संपूर्ण राज्य अराजकतेच्या दिशेने घसरत आहे.
आज गुन्हेगारीचा आलेख आकाशाला भिडत आहे. केवळ पाच महिन्यांत १.६ लाख गुन्हे, त्यात ३५०० महिलांवरील अत्याचार, ९२४ खून, ही आकडेवारीच पुरेशी आहे की राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय. गृहमंत्री हे या सर्वांवर मौन बाळगत असतील तर जनतेने त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय कराव्यात?
दुसरीकडे, लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असलेल्या विधानसभेत आमदारांचे असंसदीय वर्तन सुरू आहे. कोणीतरी आमदार धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य करतो, कोणीतरी कर्मचाऱ्याला मारहाण करतो, तर एक पैशांच्या बंडलसमोर बसून माज दाखवतो. , तर कोणी विरोधी कार्यकर्त्यांना मारहाण करतो. तर कोणी कर्मचाऱ्यांना मारतो, कोणी विधानसभेत रमी चा गेम खेळतो, शेतकऱ्यांना भिकारी म्हणतो, गरिबांच्या जमिनी हस्तगत केले जातात, भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होऊ दिली जात नाही, हनी ट्रॅप सारखे प्रकरणांना बगल दिली जाते.
हे सगळं होत असताना मुख्यमंत्री विधानसभेत विधान करतात – "लोक म्हणत आहेत की आमदारांना माज आलाय". पण साहेब तुमच्या कारभारामुळे काही आमदारांना माज आला आहे, ही वस्तुस्थिती आहे. तुमचं हे विधान म्हणजे जणू तुमच्याच सरकारच्या अपयशावर शिक्कामोर्तब आहे. आपण नाराजी व्यक्त केल्यानंतर देखील या आमदारांनी आत्मचिंतन केलं असं कुठेही दिसत नाही.
एक कृषीमंत्री शेतकऱ्यांना ‘भिकारी’ म्हणतो, आणि विधानसभेत रमीचा खेळ खेळतो. त्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्याला चक्क राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण होते. ही फक्त एक अपवादात्मक घटना नाही, ही यंत्रणेच्या सडलेल्या मनोवृत्तीची साक्ष आहे.
राज्याच्या गृहमंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार चालवला जातो, असा गंभीर आरोप होतो, पण त्याची चौकशी तर दूरच, उलट संपूर्ण घटना झाकली जाते. ही केवळ एका मंत्र्याची बाब नाही, ही तर राज्य सरकारच्या नैतिक अध:पतनाची जिवंत साक्ष आहे.
३,००० कोटींच्या गैरव्यवहाराची कामं न्यायालय रद्द करतं, पण सरकार मात्र तेच ठेकेदार, तेच सल्लागार, तेच हातचं राखून व्यवहार करणारे मंत्री टिकवून ठेवतं. गरीबांच्या जमिनी आमदारांचे हस्तक बळकावतात, हे सगळं पाहून कुणीही उद्विग्न होणार नाही का?
ट्रिपल इंजिन सरकारच्या नावाखाली सत्तेचा तिढा निर्माण केला गेला आहे, पण हे इंजिन आता लोकांच्या हितासाठी नाही, तर फक्त स्वार्थ, सत्तेचा माज, आणि भ्रष्टाचाराच्या रेषेवर चालत आहे. विरोधकांनी या सरकारला ‘अनैतिक’ म्हटलं, ते खोटं नाही. उलट ‘अनैतिकता’ ही या सरकारची राजकीय दिशा बनली आहे, असं म्हणावं लागेल.
आज सामान्य माणूस, शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला, वृद्ध या सगळ्यांच्या समस्या स्वतःच्या घरात दबल्या आहेत, कारण राज्याचा मुख्यमंत्र्याचा नियंत्रण आपल्याच पक्षातील आणि मित्र पक्षातील आमदारांवर नाही. मुख्यमंत्री स्वतःला ‘चाणक्य’ समजतात, पण त्यांनी सत्तेसाठी सोबत घेतलेल्यांवर अंकुश ठेवू शकत नाहीत, हेच त्यांच्या चाणाक्यनीतीचं अपयश आहे.
आज महाराष्ट्राची लोकशाहीची प्रतिमा लज्जास्पद झाली आहे. राजकारणात शुचिता, नैतिकता आणि जबाबदारी यांचा गळा घोटला जातोय. आमदारांच्या वागणुकीमुळे, मंत्र्यांच्या अपशब्दांमुळे, आणि मंत्रिमंडळातील निष्क्रियतेमुळे, जनतेचा सरकारी व्यवस्थेवरचा विश्वास उडू लागलाय.
लोकशाहीच्या रक्षणासाठी, जनतेच्या हक्कांसाठी, आणि महाराष्ट्राच्या आत्मसन्मानासाठी लोकांना जागे व्हा ! एक दिवस जनतेचा उद्रेक हा तुमच्या सत्तेला पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. शेवटी या लोकशाही राज्यात जनतेपेक्षा कोणी ही मोठे नाही, सत्ता येते सत्ता जाते, पण गमावलेला विश्वास एकदा गेला की तो पुन्हा मिळवता येत नाही. आणि या सर्व घटनेमुळे आता या सरकारवर जनतेच्या विश्वास राहिला नाही हे देखील सत्य आहे. फक्त सत्तेतील काही लोक हे सत्य स्वीकारत नाही .पण या मुळे महाराष्ट्रात ‘ट्रिपल इंजिन सरकार’चं अध:पतन आणि लोकशाहीची होरपळ होतेय हे मात्र नक्की.