शिरपूरात भरवस्तीतून चारचाकी वाहन चोरीला – पोलिसात गुन्हा दाखल
शिरपूर शहरातील रहिवासी आणि उद्योजक परेश बाफना यांच्या मालकीची चारचाकी कार भरवस्तीतून चोरीला गेल्याची घटना 3 जून 2025 रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परेश बाफना हे श्रीकृष्ण कॉलनी, प्लॉट नं. 39 येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, MH 18 BX 3777 ही क्रमांकाची “POLAR WHITE ” रंगाची हुंडाई अलकायझर चारचाकी गाडी त्यांनी त्यांच्या राहत्या घरी पार्क केली होती. 3 जूनच्या पहाटे सुमारास अज्ञात चोरट्यांनी ती गाडी चोरून नेली. वाहनाची अंदाजे किंमत ₹4,50,000 असून, ही चोरी सीसीटीव्ही फुटेजमध्येही दिसून आली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, गुन्हा रजिस्टर नंबर 413/2025 अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. गाडीचा शोध घेण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे.
शहरात अशा प्रकारच्या वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करून आरोपीचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
