शिरपूरात अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाचा धडक कारवाईचा सपाटा! — जळोद शिवारात ट्रॅक्टर जप्त, रेती तस्करांना प्रशासनाचा इशारा
शिरपूर (ता.३ जून) – शिरपूर तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाने एकत्रितपणे कारवाईचा धडका सुरू केला असून, आज जळोद शिवारात अवैध वाळू वाहतूक करत असलेले ट्रॅक्टर महसूल पथकाच्या कारवाईत जप्त करण्यात आले. ही कारवाई जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, प्रांताधिकारी शरद मंडलिक व तहसीलदार महेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील वरूड नाला, अनेर नदी व अन्य भागांतून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेत, विशेष पथके तयार करून गाव पातळीवरील महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांची मदत घेऊन नियमित गस्त व कारवाईचे आदेश दिले.
याअंतर्गत आज दिनांक ३ जून रोजी वरूड नाल्यातून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जळोद शिवारात पथकास आढळून आले. सदर ट्रॅक्टर रवींद्र ओंकार गिरासे यांच्या मालकीचे असून, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अंतर्गत त्यावर दंडात्मक कारवाई करून ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
कारवाईवेळी नायब तहसीलदार साळुंखे, मंडळ अधिकारी बागुल, ई. बी. मस्के, तलाठी भटाने, अहिरे, ठाकरे (नवे भामपूर), पाटील (जवखेडा), बाविस्कर (मांडळ), बोरसे (करवंद) या सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या कार्यक्षम समन्वयामुळे कारवाई यशस्वी झाली.
शिरपूर तालुक्यात रेती माफियांना मोकळे रान न देता प्रशासन कारवाईचा बडगा उचलत असून, महसूल व पोलिस यंत्रणा आता अधिक सक्रिय झाल्याचे चित्र आहे. महसूल प्रशासनाने दाखवलेली तत्परता, कडक भूमिका आणि व्यावसायिक चिकाटी यामुळे अशा तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
वाळू ही नैसर्गिक संपत्ती असून तिचा बेकायदेशीर उपसा पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. प्रशासनाचे हे पाऊल केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नव्हे, तर पर्यावरणाच्या संवर्धनासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून शिरपूर तालुका 'अवैध वाळू मुक्त' करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
या कारवाईतून प्रशासनाने स्पष्ट संदेश दिला आहे की, अशा बेकायदेशीर कृत्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. यापुढे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर महसूल संहितेनुसार अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अवैध वाळू उपशावर पूर्णत: आळा बसवायचा असेल तर नागरिकांनीही सजग राहून अशा प्रकारांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले आहे.