शिरपूर-शहादा रस्त्याची दुर्दशा; मनसेचे 'बेशर्मीचे वृक्ष' आंदोलन, वाघाडीतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
बातमी:
शिरपूर (प्रतिनिधी): शिरपूर-शहादा मार्गावरील वाघाडी गावाजवळील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अनोख्या शैलीत आंदोलन करत राष्ट्रीय महामार्ग विभागाला खडसावले.
वाघाडीतील ब. ना. कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून दररोज शाळेत यावे लागते. याच मार्गावर मोठ्या खड्ड्यांमुळे गेल्या वर्षभरात अनेक अपघात घडले आहेत. प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे मनसे तालुकाध्यक्ष पुनमचंद मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये 'बेशर्मीचे वृक्ष' लावून तीव्र आंदोलन केले.
या आंदोलनात तहसील कार्यालयाचे प्रमुख अधिकारी सानप यांनी निवेदन स्वीकारले. यापूर्वी मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले असता, त्यांनी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाल्याची माहिती देत त्यांच्याकडे पाठवले होते. त्यानुसार हे निवेदन महामार्ग विभागाकडे सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, वाघाडी गावाजवळील पुलाजवळील रस्त्याची अवस्था अपघातप्रवण बनली असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. या रस्त्यावर शहादा, बोराडी, वाघाडी आदी गावांचे नागरिक नियमित प्रवास करतात, त्यामुळे वाहतुकीचा भारही मोठा आहे.
मनसेने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर या रस्त्याचे काम तात्काळ सुरू झाले नाही, तर मनसे आपल्या स्टाईलने उग्र आंदोलन करेल आणि त्याचे सर्व परिणाम व जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागावर राहील.
या आंदोलनात मनसे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी, मनविसे सोनू राजपूत, शहराध्यक्ष पंकज मराठे, वाघाडीचे पोलीस पाटील अमोल पाटील, ग्रामपंचायत सदस्य विकी मोरे, नक्षत्र पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. शिरपूर पोलीस ठाण्याचे पीएसआय सोनवणे आणि त्यांच्या टीमने आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य केले.
रस्त्याचे काम होईपर्यंत मनसे शांत बसणार नाही, असा निर्धार मनसे कार्यकर्त्यांनी या आंदोलनातून व्यक्त केला.