"शौर्याचे अजरामर प्रतीक: राष्ट्रगौरव महाराणा प्रताप"
लेख - महेंद्रसिंग राजपूत
इतिहासाच्या भव्य पानांमध्ये काही नावे अशी कोरली गेली आहेत की त्यांची गाथा वाचली की रक्त सळसळते, हृदय गर्जते आणि स्वाभिमान जागृत होतो. अशा अजरामर योद्ध्यांमध्ये अग्रगण्य नाव म्हणजे राष्ट्र गौरव महाराणा प्रताप सिंह — मेवाडच्या भूमीवर जन्मलेला, स्वातंत्र्य आणि स्वाभिमानासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणारा एक महायोद्धा.
महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे १५४० रोजी कुंभलगड येथे झाला. त्यांचे वडील महाराणा उदयसिंह हे मेवाडचे राजा होते. प्रतापसिंहांच्या आयुष्यात लहानपणापासूनच पराक्रम, धर्मनिष्ठा, राष्ट्रभक्ती याचे बाळकडू होते. आई जयवंताबाई यांनी त्यांच्या मनात स्वाभिमान आणि आत्मगौरव रुजवले. त्यांचे बालपण राजसी वैभवापेक्षा अधिकतर रणांगणाच्या छायेत गेले.
महाराणा प्रताप यांचे जीवन म्हणजे संघर्षाचा अमर इतिहास. १५७६ मध्ये मुघल सम्राट अकबराने मेवाडवर आक्रमण केले, आणि हल्दीघाटी येथे महाराणा प्रताप व मुघलांच्या सैन्यात घनघोर युद्ध झाले. युध्द जिंकले गेले नाही, पण महाराणांचा स्वाभिमान आणि शौर्य मुघल साम्राज्याला हादरवून गेला. चेतक या त्यांच्या घोड्याच्या समर्पणाने हे युद्ध एक अमर कथा बनले. हे युद्ध म्हणजे एक गौरवशाली इतिहास आहे. त्यात बलिदान आणि राष्ट्रप्रेम याची हे युद्ध साक्ष आहे.
महाराणा प्रताप यांनी मुघल सम्राटाचे अनेक आमिष, पद, सत्तेचे प्रस्ताव धुडकावले. त्यांनी स्वतःच्या जीवनात अपार हालअपेष्टा सोसून देखील मुघलांपुढे शरणागती पत्करली नाही. त्यांच्या संघर्षाचे दिवस जंगलात, डोंगरात, उपासमारीत गेले, पण त्यांनी स्वराज्यासाठी कोणतीही तडजोड केली नाही.
महाराणा प्रताप हे केवळ एका ऐतिहासिक राजघराण्याचे नाव नाही, तर ते भारतीय स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांनी दाखवलेला स्वातंत्र्याचा मार्ग, त्यागाची तयारी आणि मातृभूमीवरील अपार प्रेम आजच्या पिढीने समजून घेतले पाहिजे.
आज महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करताना आपण फक्त इतिहास स्मरतो नाही, तर नव्या पिढीला मूल्यांचा, शौर्याचा आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेशही देतो. त्यांच्या जीवनातून आपण धैर्य, स्वाभिमान आणि निष्ठा या तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत.या अमर राष्ट्रनायकास विनम्र अभिवादन..
