अर्धवट चिठ्ठीतून मारेकऱ्यांचा छडा! पोलिसांचा अचूक तांत्रिक तपास; थाळनेर पोलिस व स्थानीक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईने चार आरोपी जेरबंद

 


अर्धवट चिठ्ठीतून मारेकऱ्यांचा छडा! पोलिसांचा अचूक तांत्रिक तपास; थाळनेर पोलिस व स्थानीक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईने चार आरोपी जेरबंद


शिरपूर प्रतिनिधी - 


शिरपूर-गरताड रोडलगत थाळनेर पोलिस स्टेशन हद्दीत दिनांक ५ मे २०२५ रोजी शेतात सापडलेल्या एका अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली होती. कोणताही ठोस धागा नसताना, थाळनेर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कौशल्यपूर्ण तांत्रिक तपासाच्या जोरावर केवळ अर्धवट चुरगळलेल्या चिठ्ठीच्या साहाय्याने मृताची ओळख पटवत अवघ्या आठ दिवसांत मारेकऱ्यांना जेरबंद केले आहे. त्यामुळे पोलिसांचे विशेष अभिनंदन होत आहे.


या गुन्ह्याची सुरुवात झाली जेव्हा ५ मे रोजी एक अनोळखी मृतदेह गरताड रोडवरील एका शेतात सापडला. सुरुवातीस अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलेल्या या घटनेचा तपास गुन्हा क्रमांक ७०/२०२५ अन्वये सुरू झाला. मात्र मृताची ओळख पटवणे सर्वात मोठे आव्हान होते. कारण परिस्थिती जन्य कोणत्याही पुरावे समोर दिसून येत नव्हते.


सपोनि श्री. शत्रुघ्न पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने मृताच्या कपड्यांची पुन्हा बारकाईने झडती घेतली असता, शर्टाच्या खिशात एक चुरगळलेली चिठ्ठी सापडली. तिच्यातील एका मोबाईल क्रमांकाचे ८ आकडे वाचता आल्याने पोलिसांनी संभाव्य शेवटच्या दोन आकड्यांचा वेध घेत सिरीयलने कॉल करून चौकशी केली. मोबाईल नंबरच्या आधारे मध्य प्रदेशातील महत्त्वाच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.


अखेर मोबाईल क्रमांकाच्या आधारे मयताची ओळख उमेश ऊर्फ राहुल कंदारसिंह चौहान (रा. उपला, ता. राजपूर, जि. बडवाणी - ह.मु. नरडाणा) अशी पटली.


तपास पुढे नेऊन, मयताचा शेवटचा संपर्क, नातेवाईकांची चौकशी, सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या साहाय्याने पोलिसांनी नरडाणा येथील आकाश पावरा याच्यावर संशय घेतला. त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याच्यासह दिलीप पावरा, विधीसंघर्षित बालक आणि घनदास ऊर्फ गुड्डु पावरा यांनी मिळून उमेश याची पूर्वीच्या भांडणाचा राग मनात ठेवून निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले.


या चौघांनी ४ मे रोजी नरडाण्यात कट कारस्थान रचून, उमेशला मध्यरात्री शिरपूरजवळील शेतात नेले व त्यास मारहाण करून भगव्या रुमालाने गळा दाबून ठार मारले. त्यानंतर मृतदेह शेतात फेकून सर्व आरोपी पसार झाले. परंतु पोलिसांच्या दक्षतेने व सातत्यपूर्ण तपासामुळे संपूर्ण कट उघडकीस आला व सर्व आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.


ही उल्लेखनीय कामगिरी  मा. पोलीस अधीक्षक सो श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक सो श्री. किशोर काळे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. श्री. सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. श्रीराम पवार स्थागुअशा, धुळे पो. नि. अभिषेक पाटील, अति. कार्यभार स्थागुअशा, धुळे थाळनेर पो. स्टे प्रभारी सपोनि. श्री. शत्रुघ्न पाटील, पोसई/समाधान भाटेवाल, पोसई/दिलीप पवार, पोहेकर्को संजय धनगर, पोहेकॉ  शामसिंग वळवी, पोकों/ उमाकांत वाघ, पोकों/किरण सोनवणे, पोकों/धनराज मालचे, पोकों/मुकेश पवार, चापोकों/दिलीप मोरे, पोकों/आकाश साळुंखे, पोकों/अनिकेत साळुंखे, थाळनेर पोस्टे. पोसई/अमित माळी, असई/संजय पाटील, पोहेको/पवन गवळी, पोहेको/आरिफ पठाण, पोहेको/कैलास महाजन, पोकों/कमलेश सूर्यवंशी, पोकों/गुलाब पाटील, पोकों/ जगदीश सुर्यवंशी, पोकों/ राजेश गिते, पोकों/ अमोल जाधव, पोकों राहुल गिरी, सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, धुळे त्यांच्या पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अत्यंत कुशलतेने व चिकाटीने काम करत एक गुन्हा उघडकीस आणला.


पोलिस दलाच्या या कसोशीनं केलेल्या तपासकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. केवळ एक चुरगळलेली चिठ्ठी, काही सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक साधनांचा वापर करत पोलिसांनी प्रकरणाच्या मुळाशी जाऊन गुन्हेगारांना अटक केल्याने पुन्हा एकदा पोलिस दलावर जनतेचा विश्वास दृढ झाला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने