१ मे - जागतिक कामगार दिन* *मोडेल पण वाकणार नाही*

 


 १ मे - जागतिक कामगार दिन*

*मोडेल पण वाकणार नाही*


*कामगार* हा औद्योगिक विकासाचा *पाया* आहे.या पार्श्वभूमीवर त्याचे जीवनमान सुधारणे काळाची गरज आहे.उद्योग जगतात त्याला खऱ्या अर्थानं औद्योगिक क्षेत्राचा *कणा* म्हटलं जातं.अत: त्याचं व त्याच्या कुटुंबियांचे रोजगार,

शिक्षण,घरकुल व 

आरोग्य हे मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी,शासकीय यंत्रणा अन् कारखानदार(उद्योगपती)

यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सांघिक प्रयत्न करावेत,जेणेकरून त्यांचे  जीवनमान उंचावेल.त्यातूनच त्यांचे जीवन सुखी,आनंदी व समृद्ध होऊ शकेल.


मित्रहो,*१ मे* हा दिवस साऱ्या विश्वात *जागतिक कामगार दिन* म्हणून पाळला जातो.पण कामगार दिन हा १ मे रोजीच कां पाळला जातो?त्यामागील कारण काय? बंधू भगिनींनो,त्यामागे एक हृदय हेलावून टाकणारा असा कामगारांच्या बलिदानाचा इतिहास आहे.अमेरिकेतील *शिकागो** येथे कामगारांनी आपल्या कामाचा कालावधी आठ तासांचा व्हावा,या लक्षवेधी मागणीच्या पूर्ततेसाठी १मे १८८६ रोजी विराट मोर्चा काढला होता.

परंतु तत्कालीन अमेरिकन सरकारने हा मोर्चा बेकायदेशीर ठरवून त्यावर पोलिसांकरवी अमानुषपणे गोळीबार करविला.या कारवाईत असंख्य आंदोलनकारी कामगार धारातिर्थी पडलेत.या भ्याड घटनेचा साऱ्या जगतात धिक्कार करण्यात आला.पोलिसांच्या या राक्षसी कारवाईचा सर्व थरातून तीव्र शब्दात निषेधही करण्यात आला.या घटनेत हुतात्म्य पत्करलेल्या कामगारांचे पुण्यस्मरण विश्वातल्या कामगारांना सदैव होत रहावे,या उद्देशाने १ मे हा दिवस वैश्विकस्तरावर कामगार दिन म्हणून पाळण्यात येतो.हा दिवस भारतीय किसान पक्षातर्फे सर्वप्रथम १ मे १९२३ रोजी कामगार दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात होऊन त्यास आज १०२ वर्षे पूर्ण होत आहेत.दुसऱ्या शब्दात आपण याला कामगार दिनाचा शतोकोत्तर उत्सव साजरा करत आहोत,असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.


आजच्या दिनी शिकागो येथे  धारातिर्थी पडलेल्या कामगार बांधवांना राज्यासह देशभर मानवंदना दिली जाते.या दिवशी कामगार व त्यांच्या मुला-मुलींसाठी स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कामगारांचा सार्वजनिकरित्या सत्कार केला जातो.शासकीय पातळीवर राज्य कामगार मंडळाच्यावतीने कामगारांसाठी राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाते.तसेच कामगारांच्या पाल्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्यावर याप्रसंगी समग्र चर्चा होत असते.थोडक्यात कामगार कल्याणासाठी ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात संघटितपणे प्रयत्न केले जातात.याचाच एक भाग म्हणून मुंबईतल्या गिरणी कामगारांचा प्रलंबित घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी फडणवीस-शिंदे-पवार या राज्यातील महायुती सरकारने शर्थीचे प्रयत्न करावेत,असे कळकळीचे आवाहन करण्यात येते.


कामगार दिनाला उद्देशून संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत  यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की,*महाराष्ट्र हे श्रमिकांचे,कष्टकरींचे राज्य आहे.घाम गाळून, काबाडकष्ट करून आपली उपजीविका भागविणारी कामगार संस्कृती महाराष्ट्राला लाभली आहे.स्वाभिमान हा कामगारांचा स्थायीभाव, तर मोडेल पण वाकणार नाही,हा बाणा आहे.सांगण्याचे तात्पर्य म्हणजे कामगार हा औद्योगिक क्षेत्राचा पाठीचा कणा आहे*.आज जे मोठमोठे कारखाने,उद्योग,प्रकल्प विकासाच्या मार्गाने वाटचाल करत आहेत,त्यांच्या एकूण उन्नतीत कामगार बंधू-भगिनींचा सिंहाचा वाटा राहिला आहे,असे गौरवोद्गार चव्हाणसाहेबांनी काढले.


कामगार चळवळ अधिकाधिक बळकट करण्यासाठी कामगार संघटनांनी ठोस पावलं उचलावीत.कामगार संघटनांनी कामगारांना विश्वासात घेऊन त्यांच्या जिव्हाळ्याचा घरकुल अन् आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.तसेच कामगारांच्या पाल्यांचा शिक्षण व रोजगार हे प्रश्नही मार्गी लावण्यासाठी संघटनांनी सरकारकडे पाठपुरावा करावा.कामगार संघटनांनी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आंदोलनाचा मार्ग न स्वीकारता,राज्य सरकारच्या कामगार व उद्योग विभाग अन् कारखानदारांशी सामोपचाराने बोलणी करून प्रश्न मार्गी लावावेत.समजा मित्रहो,बहुतेक मागण्या मान्य झाल्या असतील तर,त्यावर समाधान मानावे अन् उर्वरित मागण्या मान्य करण्यासाठी पुढील काळात सामंजस्याचा भूमिकेतून विचारविनिमय करून सोडवून घ्याव्यात.केवळ अन् केवळ सरकारला धडा शिकविण्यासाठी संघटनांनी विनाकारण संपाचे हत्यार उपसू नये.कारण ताठर भूमिका घेतल्याने कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे मोठं आर्थिक नुकसान होऊन अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.


यासंदर्भात उदाहरण द्यावयाचे झाल्यास माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या काळात कामगार नेते स्व.दत्ता सामंत यांच्या महत्त्वाकांक्षी अन् हटवादीवृत्तीमुळे गिरणी कामगारांचा तब्बल २८ महिने बेमुदत संप चालला.त्याची परिणिती म्हणजे मुंबईतील कापड गिरण्या बंद पडल्या.त्यामुळे हजारो कामगारांचे कुटुंब

 देशोधडीला लागले.त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.अशा बिकट परिस्थितीत कामगारांना अन् त्यांच्या पाल्यांना दोन वेळंच अन्न मिळविण्यासाठी अगरबत्या,मेणबत्या,कंगवे आदी तत्सम वस्तू विकण्यासाठी वणवण भटकावे लागले.भूतकाळातला हा कटू अनुभव लक्षात घेता,सरकार असो वा कामगार नेता यांनी कुठल्याही परिस्थितीत ताठर भूमिका न घेता,कामगारांचे हित लक्षात घेत सामंजस्याची भूमिका घ्यावी,जेणेकरून कामगार व त्यांची कुटुंबे सुखी-समाधानी व सुरक्षित जीवन जगू शकतील.


आज कामगारांचा *निवारा* चा मूलभूत प्रश्न आ वासून उभा आहे.प्रत्येक कामगाराच्या डोक्यावर आपल्या मालकीचं छत असणं,हा त्याच्या न्याय्य हक्काचाच एक भाग आहे.या पार्श्वभूमीवर बंद पडलेल्या औद्योगिक वसाहतींच्या जागा विकण्याअगोदर तेथील कामगारांचे *आधी पुनर्वसन व नंतर जमीन विक्री* या तत्वाअंतर्गत पात्र कामगारांना त्यांच्या हक्काची घरकुलं उपलब्ध करून द्यावीत.गिरणी कामगारांसह *घरकाम कामगार महिला आणि बांधकाम कामगार* यांच्यासाठीही राज्य सरकारने ठोस योजना आखाव्यात.जेणेकरून त्यांचेही जीवन सुसह्य व आनंददायी होईल.ना.एकनाथजी शिंदे हे  मुख्यमंत्री असताना *माझी लाडकी बहीण योजना* सुरू केली होती,तिचा गरजू महिला-मुलींनी आपली नावे नोंदवून या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात येते.


विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या पात्र कामगारांनी राज्य सरकारच्या *कामगार कल्याण कार्यालय* मध्ये आपापल्या नावांची नोंदणी करून घ्यावी.ज्यातून त्यांच्या जॉबला कायद्याचे संरक्षण मिळते.राज्य सरकारने कामगारांच्या हितासाठी ठोस कायदे करून त्यांना त्यांच्या स्वप्नातील घरकुलं उपलब्ध करून द्यावेत,म्हणजे कामगार दिन साजरा करणे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.कामगार एकजुटीला मराठी भूमिपुत्रांतर्फे मानाचा मुजरा!जागतिक कामगार दिनानिमित्त समस्त कामगार बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा!जय 🚩महाराष्ट्र!कामगार 💪शक्तीला मानाचा मुजरा!



*लेखक - ✍️रणवीर राजपूत*

*निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी,माहिती व जनसंपर्क,मंत्रालय*


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने