शहर पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी ६०,४५६/- रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह घरफोडी करणारा आरोपी जेरबंद




शहर पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी
६०,४५६/- रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

शिरपूर (ता. प्रतिनिधी) – शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ६०,४५६/- रुपयांच्या सोनं-चांदीच्या दागिन्यांची चोरी उघडकीस आणत एका घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. सदर कारवाईने शहर पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांच्या दक्षतेचे व गुन्हे तपासातील कुशलतेचे उदाहरण घालून दिले आहे.

फिर्यादी नरेंद्र सिताराम निकम (वय ६०, रा. कृष्णा व्हिला, प्लॉट नं. १७ ब, मांडणळ शिवार, शिरपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. ५ मार्च २०२५ रोजी रात्री १० ते दि. ६ मार्च रोजी सकाळी ७.२० या वेळेत ते आपल्या कुटुंबासह लग्न समारंभासाठी गावाबाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील 79,673 रुपयांचे सोनं-चांदीचे दागिने चोरी करून नेले होते. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस स्टेशनला भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोउनि हेमंत खैरनार यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शोध पथक सक्रिय होते. तपासादरम्यान हनुमान जयंतीच्या निमित्ताने शहरात पेट्रोलिंग करत असताना शनिमंदिर परिसरात एक संशयित इसम अंधारात उभा असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. पोलिस गाडी पाहताच तो पळून जाऊ लागल्याने त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपले नाव मुकेश भुवनसिंग वास्कले (वय २२, रा. वाक्या, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) असल्याचे सांगितले.

सखोल चौकशीअंती त्याने शिरपूर शहरातील एका बंद घरात घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलीस कोठडीत असताना त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी गेलेला माल – एकूण ६०,४५६/- रुपयांच्या सोनं-चांदीच्या दागिन्यांपैकी मनी मंगळसूत्र, कानातले, पेंडल, चांदीचे जोडवे – पंचासमक्ष दहिवद शिवारातून हस्तगत करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक मा. किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. किशोरकुमार परदेशी व पोउनि हेमंत खैरनार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. डी.बी .पथकातील पोहेकॉ राजेंद्र रोकडे, रवींद्र आखडमल, गोविंद कोळी, प्रशांत पवार, आरिफ तडवी, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, मनोज दाभाडे, भटू साळुंखे, सचिन वाघ, मनोज महाजन, सोमा ठाकरे, उमेश पवार तसेच त्याला पोलीस कॉन्स्टेबल नासीरखान पठाण, मिथुन पवार, राम भिल, सुनिल पावरा यांच्या सहकार्याने ही उल्लेखनीय कारवाई करण्यात आली.

शहर पोलीस स्टेशनच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने