शिरपूरमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची करडी नजर : तीन ट्रॅक्टरवर कारवाई, गुन्हे दाखल

 



शिरपूरमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर  महसूल विभागाची करडी नजर : तीन ट्रॅक्टरवर कारवाई, गुन्हे दाखल


शिरपूर (ता.प्रतिनिधी) –

शिरपूर तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध तहसील कार्यालयाने जोरदार मोहीम उघडली असून, गेल्या दोन दिवसांत तीन ट्रॅक्टरवर कारवाई करत दंडात्मक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मोहिमेमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.


तहसील कार्यालयात अवैध वाळू वाहतुकीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार महेंद्र माळी यांच्या आदेशानुसार व उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष भरारी पथक तयार करण्यात आले. या पथकाने दिनांक २४ ते २६ एप्रिलदरम्यान तीन वेगवेगळ्या ठिकाणी मोठी कारवाई केली आहे.


प्रथम, लोंढरे भागात भरारी पथकाने अवैध वाळू वाहतूक करत असलेला एक ट्रॅक्टर पकडला. हा ट्रॅक्टर तात्काळ जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी तहसील कार्यालय शिरपूर येथे जमा करण्यात आला.

दुसऱ्या घटनेत, दिनांक २५ एप्रिल रोजी मौजे वाडी (ता. शिरपूर) गावाजवळील रस्त्यावर भरारी पथकाला विना क्रमांक असलेले लाल रंगाचे ट्रॅक्टर व ट्रॉली वाळूची अवैध वाहतूक करताना आढळले. याही प्रकरणात ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.


तिसऱ्या घटनेत, दिनांक २६ एप्रिल रोजी सकाळी ६:३० वाजता मुंबई-आग्रा महामार्ग क्रमांक ५२ वरील सांगवी ते पळासनेर रोडवर पन्हाखेड गावाजवळ भरारी पथकाने एक ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करताना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनचालकाने तपासणी दरम्यान ट्रॅक्टरसह पळ काढला. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या एकूण तीन कारवायांमध्ये संबंधित वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक तसेच गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाने यापुढेही अशाच प्रकारे अवैध वाळू वाहतुकीविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


ही कारवाई नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या पथकांच्या मदतीने करण्यात आली असून, यामुळे तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने