अहो साहेब तुमचे राजकारण बाजूला ठेवा आमचे काय ते सांगा...
विधानसभा निवडणुकीत फक्त आरोप प्रत्यारोप, सामान्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष ?
राजकारण विशेष- महेंद्रसिंग राजपूत
शिरपूर तालुक्यात विधानसभा निवडणूक 2024 चे वातावरण तापले असून निवडणूक प्रचार जोमाने सुरू आहे. विधानसभेच्या या जागेसाठी तालुक्यातून सहा उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात आहेत. त्यात तीन पक्षाचे उमेदवार आहेत तर तीन अपक्ष उमेदवार आहेत. कोणतीही निवडणूक आली तर या काळात विकास आणि जनतेचे मूलभूत प्रश्न यावर चर्चा होते. ते सोडवण्यासाठी आश्वासन दिले जातात. आणि तालुक्यात प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधले जाते. जनता पुढे येऊन आपल्या समस्या मांडते आणि त्या समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी उमेदवार घेतात.
मात्र शिरपूर तालुक्यात या विपरीत परिस्थिती निवडणूक प्रचारात दिसत आहे. ही निवडणूक प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी विरुद्ध अपक्ष उमेदवार डॉक्टर जितेंद्र ठाकूर, आणि त्यांना आव्हान देणारे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार, आणि अपक्ष इतर उमेदवार अशी होत आहे. निवडणूक प्रचारात सत्ताधारी भारतीय जनता पार्टी पक्षाकडून आमदार काशीराम पावरा आणि आमदार अमरीश भाई पटेल हे आजपर्यंत केलेला विकास, भविष्यात होणारा विकास यावर भर दिला जात आहे. अपक्ष उमेदवार डॉक्टर ठाकूर यांच्याकडून बंद पडलेल्या सहकारी प्रकल्पांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आणि रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील अविकसित आदिवासी बांधवांच्या विकास हा देखील त्यांनी प्रचाराचा मुद्दा केला आहे. आणि काही प्रमुख मुद्दे त्यांनी आपल्या वचननाम्यात घेतले आहेत आणि ते पूर्ण करण्याचे वचन दिले आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले जात आहे. या व्यतिरिक्त पक्षाने अपक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोप देखील होत आहे. त्यामुळे प्रमुख विधानसभेचे दावेदार हे एकमेकांवर आरोप करण्यात व्यस्त आहेत. आणि जनता या आरोपांचे सुख उपभोगत आहे.
मात्र या सर्वांचे व्यतिरिक्त या तालुक्यात आणि शहरात ज्या काही प्रमुख समस्या आहेत, त्यांच्याकडे लक्ष वेधण्याचे काम होताना दिसत नाही.
काय आहेत शिरपूर शहर आणि तालुक्यातील नागरिकांच्या मनातील समस्या..
शिरपूर तालुक्यात मागील बारा वर्षांपासून टोल च्या माध्यमातून नागरिकांचे आर्थिक लूट होत आहे. या विषयावर मोठे जन आंदोलन उभे आहे. हे आंदोलन दाबण्याच्या पुरेपूर तालुक्यात प्रयत्न होत असून सत्ताधारी आमदार टोल प्रश्नावर मूक गिळून गप्प आहेत. त्यामुळे टोलबाबत त्यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे या टोल पासून मुक्ती मिळावी अशी तालुक्यातील नागरिकांची मागणी आहे.
सुजलाम सुफलाम असलेला शिरपूर तालुका हा आत्महत्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. शिरपूर तालुक्यात एक सुसाईड पॉईंट आहे जिथे आज पर्यंत अनेकांनी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली. ते ठिकाण आहे तालुक्यातील सावळदे येथील तापी पूल. या पुलावरील आत्महत्या थांबवण्यासाठी या पूलाला संरक्षक जाळ्या बसवण्यात याव्या अशी मागणी मागील काही काळांपासून जोर ठरत आहे. याबाबत आश्वासन देखील दिले गेले. मात्र हे आश्वासन अद्याप कोणीही पूर्ण केलं नाही. त्यामुळे या आश्वासनाची हमी कोण घेणार ?
शिरपूर तालुक्यात मागील काळात झालेल्या सांगवी येथील दंगल प्रकरणात अनेक आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल झाले, यात काही निरप्राप युवकांच्या देखील समावेश आहे असे बोलले जाते, त्यामुळे अनेक आदिवासी युवकांचे आयुष्य या प्रकरणामुळे बरबाद होत आहे, जे काही झाले ते सगळं विसरून या तालुक्यात या आदिवासी तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन आदिवासी आमदारांनी द्यावे अशी आदिवासी बांधवांची मागणी आहे.
शिक्षणाची पंढरी आणि आरोग्याची नगरी म्हणून समजल्या जाणारा शिरपूर शहरात करवंद येथील सन स्टार फॅक्टरी मुळे पसरणारे दुर्गंधी त्यातून निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न आणि या विरोधात तालुक्यातील लोकांनी उभारलेला लढा, हा संघर्ष सतत सुरू आहे. मात्र अद्याप या तालुक्यातील राजकारण्यांना यावर कोणताही तोडगा काढता आला नाही त्यामुळे हा प्रश्न देखील आज देखील प्रलंबित आहे. त्यामुळे हे अपयश कोणाचे हे देखील एकदा निर्धारित झाले पाहिजे.
या तालुक्यातील कष्टकरी कामगाराला किंवा विविध संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पगाराच्या पूर्ण मोबदला मिळत नाही, अनेक कर्मचाऱ्यांना आजपर्यंत नियमित करण्यात आले नाही, त्यांच्यावरील अन्यायाला कोणीही वाचा फोडताना दिसत नाही.
या तालुक्यातील राजकारण हे नेहमीच आदिवासी बांधवांच्या विकासावर लढवले जाते मात्र शिक्षणाची पंढरी असलेल्या शिरपूर तालुक्यात आजही झोपडतील शाळा अस्तित्वात आहेत, एकाच वर्गात अनेक वर्ग भरतात, त्यांच्या शिक्षणाचे काय त्यांच्या मूलभूत प्रश्नांचे काय यावर या निवडणुकीत कोणतीही चर्चा नाही.
एकीकडे शिरपूर तालुक्यात विकास होत असताना सर्व क्षेत्रात तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार फोफाटला आहे, टक्केवारीची परंपरा जोर धरत असल्याने भ्रष्टाचाराला वाव मिळत आहे, टक्केवारीमुळे तालुक्यातील विकास कामांवर त्याच्या परिणाम होत असून ती निकृष्ट तयार होत आहेत. आधीच बिलो मध्ये कामाचे टेंडर घ्यायचे, त्यात टक्केवारी द्यायची, आपला नफा कमवायचा तर मग उत्कृष्ट काम कसे करायचे कसे हा प्रश्न या तालुक्यातील ठेकेदार यांच्या पुढे आहे. त्यामुळे शासन स्तरावरील भ्रष्टाचारात वाढ झाली असून यावर कोणतेही राजकीय पक्षाचे लक्ष नाही.किंवा नियत्रंण नाही. त्यामुळे भ्रष्टाचार हा देखील एक मोठा मुद्दा आहे.
तालुक्यात युवकांच्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे, सामान्य नागरिक तालुक्यातून रोजगारासाठी स्थलांतर करत आहे, शेती उपयोगी प्रकल्पांचा अभाव आहे, हाताला काम, आणि कामाला मोल नाही, भविष्यात एमआयडीसी तयार होईल तेव्हा होईल, आजच्या पिढीच्या बेरोजगारांचे काय ? असे मूळ प्रश्न दुर्लक्षित होत आहेत.
शिरपूर तालुक्यात असलेले सरकारी रुग्णालये, पी.एस . सी सेंटर, उपजिल्हा रुग्णालये यांची अवस्था का बिकट आहे ? त्याच्यात सर्व आवश्यक त्या साधनसामुग्री किंवा मनुष्यबळ का उपलब्ध होऊ शकत नाही. त्यात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतात का ? हे देण्याची जबाबदारी कोणाची यावर निवडणुकीत कोणतीही चर्चा नाही.
तालुक्यातील युवा वर्ग हा राजकारणात आणि समाजकारणात पुढे येऊन समाजसेवा करण्याची क्षमता ठेवतो, मात्र त्यांना आजपर्यंत पुढे येण्याची संधी उपलब्ध होत नाही, शिक्षित आणि कर्तबगार युवकांना राजकारणात संधी मिळत नाही. तालुक्याचे राजकारणात याची हमी कोणीही घेताना दिसत नाही.
शहरात नगर परिषदेमार्फत लावण्यात येणारे उपकर घरपट्टी पाणीपट्टी आणि दुकानांचे भाडे यात मागील काळात मोठी भरघोस वाढ करण्यात आली आहे.हे कर अन्यायकारक असून नागरिकांची लूट करणारे आहेत अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे हे उपकर कमी करण्याचे हमी कोण घेईल का? सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचे धाडस कोणी दाखवेल का?
एकेकाळी सुवर्ण नगरी म्हणून ओळखला जाणारा शिरपूर तालुका आता गांझा उत्पादन करणारा तालुका म्हणून महाराष्ट्रात बदनाम झाला आहे. आज पर्यंत पोलिसांनी अनेक कारवाया केल्या तरी देखील तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गांझा हा मिळून येत असतो. त्यामुळे भविष्यात तालुक्यावर लागलेला हा डाग कशाप्रकारे पुसून काढता येईल त्यावर काय उपाययोजना करता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न होणे गरजेचे आहे ते दिसत नाहीत.
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर व्यवसाय फोपावत आहेत, अनेक लँड माफिया तयार झाले आहेत, अव्वाच्या सव्वा व्याज आकारणारे गुंड प्रवृत्तीचे व्यावसायिक तयार होत आहेत, अवैध पैशामुळे गुंडगिरीला वाव मिळत आहे. सामाजिक स्वास्थ्यासाठी यांच्या बीमोड होणे देखील गरजेचे आहे.
त्यामुळे शिरपूर तालुक्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत सामान्यांच्या प्रश्नांना वाव मिळेल का? यांच्या विचारांचा आणि भावनांच्या कोणता पक्ष विचार करेल का? फक्त विकास आणि एकमेकांवरील आरोप हेच राजकारण आहे का ? त्यामुळे किमान आता सामान्य मतदारांच्या अपेक्षा, त्यांचे प्रलंबित प्रश्न, समस्या , यावर या निवडणुकीत सकारात्मक राजकारण व्हावे, स्थानिक नागरिकांचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांना मिळावे, त्यांच्या समस्या या प्रचाराचे मुद्दे असावेत ही या मतदाराची अपेक्षा.
म्हणून तालुक्यातील मतदार विचारत आहे की साहेब तुमचे राजकारण बाजूला राहू द्या, आमचे काय ते सांगा... या निवडणुकीत फॅक्त नेत्यांची लढाई सुरू आहे, एकमेकांवर आरोप होत आहेत, सोशल मीडियातून आरोपांचे खंडन केले जात आहे, नेत्यांचे महिमा मंडळ होत आहे निवडणुकीत सामान्य मतदार, आणि त्यांचे प्रश्न मात्र दुर्लक्षित होताना दिसत आहेत.
