शक्ती प्रदर्शन करत महायुतीच्या पाच उमेदवारांनी धुळे जिल्ह्यात केले अर्ज दाखल
धु ळे : धुळे जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवारांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान धुळ्यात उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी मंत्री गिरीश महाजन यांनी धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असा दावा केला आहे.
धुळे जिल्ह्यात गुरुपुष्यामृताचे मुहूर्त साधत महायुतीच्या उमेदवारांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात अनुप अग्रवाल यांनी चाळीसगाव रोड चौफुली वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पूजन करून रॅलीला सुरुवात केली. यावेळी अनुप अग्रवाल व अल्पा अग्रवाल यांचे औक्षण माजी महापौर जयश्री अहिरराव यांनी केले. यानंतर रॅलीला सुरुवात झाली.
रॅलीत एका सजवलेल्या वाहनावर उमेदवार अनुप अग्रवाल यांच्यासह पालकमंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आ.राजवर्धन कदमबांडे, भाजपाचे प्रवासी प्रभारी आ. मुकेश पटेल, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किरण शिंदे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सुमित पवार, आरपीआय जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, आदी उपस्थित होते. तसेच रॅलीत आरपीआय नेते महेंद्र निळे, विनायक शिंदे, तसेच भाजपाचे प्रदीप कर्पे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, महिला जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाठ यांच्या सह कार्यकर्ते सहभागी झाले. ही मिरवणूक आग्रारोडमार्गे राष्ट्रपुरुषांना अभिवादन करीत अपर तहसिल कार्यालयावर पोहोचली. याठिकाणी अपर तहसिलदारांकडे अग्रवाल यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असा दावा केला. लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघातील पाचही विधानसभा क्षेत्रात भाजपलाच आघाडी मिळाली होती. फक्त मालेगावमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला आघाडी मिळाली. त्यामुळे आमचा निसटता पराभव झाला. मात्र आता विधानसभेत धुळे शहरासह पाचही मतदारसंघात भाजपा आणि महायुतीचे उमेदवार नक्कीच विजयी होतील. असेही महाजन यांनी सांगितले.
शिंदखेडात रावलांचे शक्ती प्रदर्शन
शिंदखेडा विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीने राज्याची माजी मंत्री जयकुमार रावल यांना उमेदवारी निश्चित केली. आज रावल यांनी समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यात सजवलेल्या जीपमध्ये रावल यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी तसेच जिल्हा परिषदेच्या सभापती धरतीताई देवरे, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दोंडाईचा शहरातील विविध मार्गांवरून ही रॅली
नेण्यात आली. प्रचंड घोषणाबाजी करीत ही रॅली तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आली. यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
शिरपूर मधून पावरा यांचा अर्ज
शिरपूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार काशीराम पावरा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तहसीलदार महिंद्र माळी यांच्याकडे 2 नामांकन पत्र दाखल केले. तसेच 28 ऑक्टोबर रोजी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करुन उमेदवारी दाखल केली जाणार आहे. आज अर्ज दाखल करतेवेळी आ. काशिराम पावरा, भाजपा व महायुती समन्वयक डॉ. तुषार रंधे, सांगवी मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नारायणसिंग राजपूत, जिल्हा परिषद सदस्य प्रा. संजय पाटील या पाच जणांनी पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करतांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपा तालुका प्रभारी हेमंत पाटील, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती कैलास पावरा, भाजपा ओबीसी प्रदेश सचिव श्यामकांत ईशी हे उपस्थित होते.
साक्रीतून शिंदे सेनेच्या मंजुळा गावित
साक्री विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने शिवसेनेच्या शिंदे गटाला ही जागा सोडण्यात आलेली आहे. या मतदारसंघात मंजुळाताई गावित या गेल्यावेळी अपक्ष निवडून आल्या होत्या. मात्र त्यांनी दोन महिन्यांपूर्वी शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे त्यांना महायुतीच्या वतीने शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली आहे. आज त्यांनी देखील साक्री मधील शिवाजी वाचनालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून रॅलीला सुरुवात केली. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आली. रॅलीत आमदार किशोर दराडे, विजय करंजकर, माजी उपनगराध्यक्ष अरविंद भोसले, सुरेश सोनवणे, सुरेश भामरे, वसंतराव बच्छाव, माजी सभापती कविता क्षीरसागर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
पाच उमेदवारांचे नऊ अर्ज
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पाच उमेदवारांनी नऊ नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती निवडणुक शाखेमार्फत देण्यात आली आहे. साक्री विधानसभा मतदार संघासाठी शिवसेनेच्या उमेदवार मंजुळा गावीत यांनी एक तर अपक्ष म्हणून एक असे दोन अर्ज, धुळे पाच उमेदवारांचे नऊ अर्ज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पाच उमेदवारांनी नऊ नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती निवडणुक शाखेमार्फत देण्यात आली आहे.
साक्री विधानसभा मतदार संघासाठी शिवसेनेच्या उमेदवार मंजुळा गावीत यांनी एक तर अपक्ष म्हणून एक असे दोन अर्ज, धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघासाठी अपक्ष उमेदवार हिलाल माळी यांनी एक, धुळे शहर विधानसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांनी दोन, शिंदखेडा विधानसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जयकुमार रावल यांनी दोन, शिरपुर विधानसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार काशिराम पावरा यांनी दोन अर्ज असे एकूण पाच उमेदवारांनी नऊ अर्ज दाखल केले आहे.
