मी शिरपूर विधानसभा निवडणूक भाजप कडून लढण्यास इच्छुक - जिल्हा परिषद सदस्य बेबीताई पावरा
शिरपूर प्रतिनिधी - राज्यभरात विधानसभेचे बिगुल वाजले आहे. प्रत्येक पक्षाचे जागावाटप आणि उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. महायुतीमध्ये शिरपूर विधानसभेची जागा भारतीय जनता पार्टीच्या वाटेला जाणार यात कोणतीही शंका नाही. मात्र तरीदेखील अद्याप भारतीय जनता पार्टी कडून अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. किंवा मग या तालुक्यातून इच्छुकांची नावे देखील अद्याप समोर आलेले नाहीत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपा कडून उमेदवारी पुन्हा आमदार काशीराम पावरा आणि यांच्या परिवारातील सदस्यांनी मागणी केल्याची माहिती आहे.
त्यामुळे भाजपची ही उमेदवारी पुन्हा एकदा विद्यमान आमदार काशीराम पावरा यांना दिली जाईल असा जनतेचा समज आहे. मात्र याबाबत अद्याप भारतीय जनता पार्टी कडून अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
मात्र आज झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद सदस्य बेबीताई पावरा यांनी आपण भारतीय जनता पार्टी कडून शिरपूर तालुक्यासाठी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहोत अशी माहिती दिली. त्यामुळे शिरपूर तालुक्यात भारतीय जनता पार्टी महिला उमेदवारास प्राधान्य देईल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दि. 7 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत प्रामुख्याने शिरपूर विधानसभेसाठी महाविकास आघाडी कडून उमेदवारी करण्यास इच्छुक असलेले डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप असल्याबद्दल आणि त्यासाठी आम्ही न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्याकडे असलेले जात वैधता प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा त्यांनी केला. आणि त्यासाठी काही पुराव्यांच्या आधार त्यांनी घेतला. त्यांच्या वतीने त्यांचे एडवोकेट भगतसिंग पाडवी यांनी बाजू मांडली.
यावेळेस बोलताना जि प सदस्य बेबीताई पावरा म्हणाले की मला संधी मिळाल्यास मी शिरपूर विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टी कडून लढण्यास इच्छुक आहे.
याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला की आपण उमेदवारीसाठी पक्षाकडे नाव नोंदणी केली आहे का? तर अद्याप नाव नोंदणी केली नसत्याची त्यांनी सांगितले. आपण आपल्या पक्षाकडे ही भूमिका मांडली आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर देखील त्यांनी अद्याप वरिष्ठांशी याबाबत चर्चा नाही असे देखील म्हटले. मात्र मी याबाबत लवकरच पक्ष अशी आणि वरिष्ठ यांच्याशी संपर्क साधणार असून उमेदवारीसाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
आजपर्यंत शिरपूर तालुक्यातून मी भाजपकडून उमेदवारी करण्यास इच्छुक आहे असे सांगण्याची तयारी कोणाकडूनही दाखवण्यात आली नव्हती. किमान जिल्हा परिषद सदस्य बेबीताई पावरा यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.
त्यामुळे शिरपूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या संभावित आमदार हा महिला उमेदवार असेल का? भाजपा खरोखर लाडक्या बहिणीला उमेदवारीची संधी देईल का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
