शिरपूर तालुक्यातील मतदाराला गृहीत धरले का ?
रोखठोक - महेंद्रसिंह राजपूत
जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा निवडणूक काळात मतदारांचा उत्साह वाढलेला असतो, त्यापेक्षा अधिक उमेदवारांचा उत्साह वाढलेला असतो, निवडणुकीची चाहूल लागताच संभावित उमेदवार हे मतदारांच्या दारावर उभे असतात. किंवा मला निवडणूक लढवायची आहे असे जनतेत जाऊन सांगतात, आणि मतदान रुपी आशीर्वादाची मागणी करतात.मात्र यात शिरपूर तालुका त्यास सध्या अपवाद दिसत आहे.
राज्यात विधानसभेत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे, सर्व पक्ष आपापल्या विधानसभा क्षेत्रात सक्रिय झाले असून विविध पक्षांच्या माध्यमातून आपली उमेदवारीची दावेदारी केली जात आहे. विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली आणि निवडणुकीची तारीख समोर आली. या निवडणुकीत आपले भाग्य आजमावण्यासाठी अनेक उमेदवार हे विविध पक्षांच्या वाटेवर आहेत तर काहींनी आपली उमेदवारीची फिल्डिंग लावली आहे. काही राजकीय पक्षांच्या दारावर उभे आहेत.
असे सर्व चित्र राज्यभर असताना शिरपूर तालुक्यात मात्र विपरीत परिस्थिती आहे. 2024 ची विधानसभेची निवडणूक शिरपूर तालुक्यात आहे का असे विचारण्याची देखील आता वेळ येऊन ठेपली आहे. या तालुक्यातील मतदारांना गृहीत धरण्याची परंपरा सुरू आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी शिरपूर तालुक्यातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार कोण असेल हे अद्याप पक्षाकडून जाहीर करण्यात आले नाही.
महायुतीकडून भाजपा शिरपूर साठी प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे भाजप ची अंतर्गत यंत्रणा जरी कार्यरत असले तरी प्रत्यक्षात उमेदवाराला अजून तरी रणांगणात उतरवले नाही. त्यामुळे तालुक्यात भाजपच्या उमेदवार कोण हे अजूनही गुलदस्त्यात आहे. यावेळी देखील पक्षाकडे विद्यमान आमदार आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र शिरपूर भाजपा मध्ये अंतर्गत मोठ्या प्रमाणावर नाराजी असून भाजपच्या मूळ कार्यकर्ता असलेला वर्ग नाराज आहे. आणि तो निवडणुकीसाठी अद्याप सक्रिय झालेला नाही.
विशेष म्हणजे इतका मोठा पक्ष, हजारो कार्यकर्ते, मोठे मोठे पदाधिकारी असे सर्व साम्राज्य असताना या तालुक्यातून भाजपकडून मीच उमेदवारी करेल असं दावा करायला विद्यमान आमदार सोडले तर कोणी समोर आलेले नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टी तिकीट मागणाऱ्यांची अजिबात ओढ नाही , स्पर्धा नाही,किंवा कोणाचीही इच्छा नाही,
किंवा इच्छा व्यक्त करण्याच्या अधिकार नाही असे चित्र दिसत आहे. उमेदवारी मागण्याचे वेळ काळ निघून गेल्यानंतर पत्रकार परिषदेतून महिला जिल्हा परिषद सदस्य यांनी उमेदवारीची इच्छा बोलून दाखवली. पण त्यांची इच्छा त्यांनी पक्षापर्यंत पोहोचवलेली नाही हे देखील जाणवले. त्यामुळे हा दावा एक पोरकट दावा होता.
त्यामुळे या तालुक्यातील कर्तुत्ववान भाजपने आमचा उमेदवार कोण असेल हे देखील जनतेला सांगण्याचे कष्ट आतापर्यंत घेतले नाहीत. म्हणजेच या तालुक्यातील मतदाराला गृहीत धरण्यात आले आहे असा त्याच्या अर्थ होतो. म्हणजे आम्ही ज्याला शेंदूर लावू तुम्ही त्याला देव म्हणा अशीच काहीशी परिस्थिती या तालुक्यात आहे.
इतर पक्षांच्या विचार केला तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देखील विधानसभा लढण्याचे संकेत दिले आहेत मात्र त्यांना अपेक्षा महाविकास आघाडीच्या तिकिटाची आहे. त्यांच्याकडून देखील अजून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. मात्र महाविकास आघाडी कडून ही जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाऊ शकते. त्यामुळे कम्युनिस्ट पार्टी महाविकास आघाडी सोबत असेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील 200 पेक्षा अधिक उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे मात्र शिरपूर तालुक्यात त्यांची कोणतीही तयारी दिसत नाही. ते देखील एखाद्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतात.
मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांनी देखील राजकीय आखाड्यात उतरण्याची भाषा केली, तालुक्यात त्यांची देखील कोणतीही रननीती अजून तयार झालेली नाही. कदाचित ते आयत्यावेळी एखाद्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करतील. त्यामुळे मराठा समाज आणि धनगर समाज हे भाजपच्या उमेदवारासोबत नसतील ते देखील चित्र निर्माण होत आहे.
ओबीसी समाजाकडून लक्ष्मण हाके यांनी देखील अनेक जागांची चाचपणी केली आहे त्यांची याचा शिरपूर तालुक्यात भूमिका काय हे देखील समोर आले नाही. या निवडणुकीत ओबीसी समाज कोणाच्या पाठीमागे उभा राहतो हे देखील आगामी काळात समोर येईल.
तालुक्यातून काही लोकांची अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी असेल तर या बाबत त्यांनीही कोणता निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. होय मी निवडणूक लढवणार असेच ठासून सांगायला कोणीच पुढे आले नाही. त्यामुळे आमदारकीची सुक्त इच्छा असणारे काही अपक्ष उमेदवार देखील जनता दरबारात न जाता डायरेक्ट तहसील कार्यालयात फॉर्म भरायला जातील असे चित्र दिसत आहे.
त्यामुळे या तालुक्यात विधानसभा निवडणुकीबाबत उदासीनता दिसून येत आहे, महाविकास आघाडी कडून देखील येथील जागा कोणत्या पक्षाला सुटेल याच्यात तिढा अजून सुटलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉक्टर जितेंद्र ठाकूर आणि दत्तू पाडवी यांनी आपली उमेदवारी मागणी केली आहे. त्यात डॉक्टर जितेंद्र ठाकूर हेच प्रबळ दावेदार मानले जात आहेत. ही जागा देखील राष्ट्रवादीच्या वाटायला येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित आहे. डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी तालुक्यात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढवल्या असून ते तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. त्यांनी तालुक्यात जनसंपर्क यात्रा देखील सुरू केली आहे. तर दुसरीकडे दुसरे उमेदवार पाडवी हे उमेदवारी घोषित होण्याची वाट पाहत आहेत. मात्र अद्याप त्यांनी कोणताही जनसंपर्क केलेला नाही.
मात्र तालुक्यातील राजकारणात मला तुमचे आशीर्वाद हवे यासाठी डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी तालुक्याच्या जनतेशी संवाद साधला आहे. आणि जनतेने आग्रह आणि उत्साह दाखवल्याने ते पुन्हा एकदा विधानसभेच्या रणांगणात उतरले आहेत.
महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाकडून देखील इच्छुकांची मोठी यादी काही काळापूर्वी समोर आली होती. मात्र विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने कोणतेही हालचाली अथवा जनसंपर्क कोणत्याही उमेदवारी केल्याची नोंद अजून तरी तालुक्यात दिसत नाही. त्यामुळे उमेदवारी मिळाली तर जनतेसमोर जाऊ अशीच काहीशी मानसिकता या उमेदवारांची दिसत आहे.
त्यामुळे विविध पक्षांकडून या तालुक्यात कोणी उमेदवारीसाठी मागणी केली ही माहिती कार्यकर्त्यांकडे आहे जनतेकडे नाही. त्यांनी देखील एक प्रकारे जनतेला गृहीत धरले आहे. शिवाय तालुक्यात काँग्रेसची विश्वासाहता संपली असून अमरीश भाईंची बी टीम अशीच काहीशी ओळख काँग्रेसची झाली आहे.
एकीकडे विद्यमान आमदार महायुतीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसार करत होते , तर दुसरीकडे माननीय आमदार अमरीश भाई पटेल हे देखील विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवत आहेत. आणि यापूर्वी केलेल्या विकास कामांच्या आधार घेत, जनतेसमोर जात आहेत. तर दुसरीकडे डॉक्टर जितेंद्र ठाकूर, सोडले तर इतर कोणत्याही उमेदवाराकडून तालुक्यात विधानसभेसाठी कामाला सुरुवात झाली नाही .किंवा मग आम्ही आणि विधानसभेसाठी उमेदवारी मागितली आहे असे देखील कोणी जाहीरपणे सांगितले नाही. त्यामुळे कोणतेही पूर्वतयारी नसताना या उमेदवारांनी उमेदवारीची मागणी केली का हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
त्यामुळे तालुक्यातील विधानसभा निवडणूकित मतदाराला गृहीत धरले आहे का ? तालुक्यात लढण्याची विरोधाची क्षमता संपली आहे का असे अनेक प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे.
या आधीच तालुक्यात एखाधिकारशाही आहे. इतर पक्षाकडून उमेदवारीवर किंवा आमदारकी वर दावा केला गेला तर, त्याचे खच्चीकरण केले जाते, आणि म्हटले जाते , आणि या तालुक्यात राजकारण करण्यासाठी कुणीच पुढे येत नाही. असे म्हणायचे आणि कोणी पुढे आले तर आधी त्याची लायकी काढली जाते. जातीपातीचे राजकारण करून आरोप लावले जातात,पण कोणत्याही कार्यकर्त्यास राजकारणात पद मिळाले काम करण्याची संधी मिळाली तर लायकी तयार होऊ शकते.
जर कोणाला पुढे येण्याची संधी उपलब्ध होत नसेल तर मग राजकीय प्रतिस्पर्धी कसा तयार होईल, खरे तर सुदृढ राजकारणाला एक सक्षम विरोधक आवश्यक असतो. मात्र येथे विरोधकच निर्माण होऊ द्यायचा नाही याची खबरदारी मागील अनेक वर्षांपासून घेतली गेली आहे.
आधी व्यापार मग राजकारण आणि शिल्लक राहिले तर समाजकारण असे या तालुक्याचे राजकीय सूत्र आहे.
मागील अनेक वर्षांपासून तालुक्यात विकासाची ढोल वाजवले जात आहे, विकास झाला हे जरी मान्य असले तरी तालुक्याच्या विकास अधिक झाला की एखाद्या परिवाराच्या विकास जास्त झाला याची पण तुलना कधीतरी होणे गरजेचे आहे . त्यामुळे आता जनतेने सांगावे की खरा विकास कोणाचा.... त्यामुळे नेते मालक आणि जनता नौकर ही या तालुक्याची विकासाची सूत्र आहेत. तालुक्यातील सर्व सहकारी प्रकल्प इतिहास जमा झाले असून फक्त खाजगी करनाचे प्रयोग तालुक्यात सुरू आहेत.
राज्यात निवडणुका घोषित झाले आहेत. सर्वत्र विधानसभेची धामधूम सुरू आहे, शिरपूर उमेदवारी जाहीर झाली नाही म्हणून तालुक्यात मात्र सामसूम आहे. मात्र लोकांच्या कल कोणाकडे याची चाचपणी केली जात आहे.
तालुक्यात लोकशाही संपल्याचे हे चित्र आहे, यातून गुलामगिरीचे मानसिकता समोर येते. ही राजकीय आराजक्ता मोडून काढण्याची वेळ आता येऊन ठेपली ली आहे. तालुक्यातील सुज्ञ मतदाराला आता स्वतःच आपल्या हक्काची लढाई लढावी लागणार आहे. राजकारणात मतदाराला आणि कार्यकर्त्याला तेव्हाच किंमत असते जेव्हा समोर एखादा सक्षम विरोधक असतो. अन्यथा तुम्हाला असेच गृहीत धरले जाईल.
या निवडणुकीत डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी विरोधाच्या नारा बुलंद केला आहे. भाजपच्या उमेदवार कोणीही असो त्याला कडवी झुंज देण्याची आणि टक्कर देण्याची क्षमता फक्त डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्यात आहे. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षाचे पाठबळ आहे, जनता जरी आपल्या भावना उघडपणे बोलून दाखवत नसली तरी एक सुप्त लाट त्यांच्या बाजूने आहे. त्यामुळे हा लढा परिवर्तनाच्या लढा आहे असे मानले जात आहे.
एक हाती सत्ता आमच्याकडे आहे आणि आमच्या सर्व तालुक्यावर वर्चस्व आहे , विकासाच्या डोंगर उभा करणाऱ्या भाजपाकडून देखील अजून उमेदवार जाहीर झालेला नाही. विशेष म्हणजे शिरपूर ची जागा भाजपची आहे ते सर्वश्रुत आहे, त्यासाठी एकमेव दावेदार विद्यमान आमदार आहेत हेदेखील सर्वश्रुत आहे, तरी देखील उमेदवारीच्या सस्पेन्स कायम ठेवणे यामागे काय राजकारण आहे त्याच्या शोध जनता घेत आहे.
विद्यमान आमदारांना आदिवासी समाजातून होणारा विरोध पाहता हा सस्पेन्स ठेवला गेला आहे का ? अशी देखील चर्चा तालुक्यात आहे.
त्यामुळे या तालुक्यात सध्या तरी सर्वपक्षीय इच्छुक उमेदवाराकडून सस्पेन्स कायम आहे. एकंदरीत काय तर राज्यात विधानसभा जोमात आहे तालुक्यात मात्र राजकारण मात्र कोमात आहे.
त्यामुळे या तालुक्यात आमदार कोण होईल हे जनता ठरवेल, पण त्यासाठी संभावित आमदारांनी पुढे येऊन जनतेला देखील विश्वासात घेणे महत्त्वाचे आहे. आमदारकीसाठी विविध पक्षांकडून तिकिटाची मागणी केली मात्र जनतेला विश्वासात घेतले नाही अशीच काहीशी विचित्र राजकीय परिस्थिती तालुक्यात दिसून येत आहे.
त्यामुळे राजकारणात उतरताना आधि जनता दरबारात जाऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावे लागतात आणि मग पक्षाकडे जाऊन तिकिटाची मागणी करावी लागते. या तालुक्यात मात्र आधी पक्षाकडे तिकिटाची मागणी केली जाते, उमेदवारी मिळाली की मग जनतेला सांगितले जाते की मी उमेदवार आहे आणि मला मतदान करा. त्यामुळे तालुक्यातील उमेदवारीच्या सस्पेन्स जरी कायम असला तरी जनता दरबार हा शेवटचा पर्याय आहे. आणि नेते जरी जनतेला गृहीत धरत असले तरी या निवडणुकीत जनतेने देखील मनात निर्धार केला आहे. आणि त्याचे चित्र निवडणूक अंति स्पष्ट होईल. त्यामुळे या तालुक्यात शरद पवारांच्या करिष्मा काय काम करेल ? आणि तालुक्यात परिवर्तन होईल का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
