तलवार बनविण्याच्या कारखान्यावर नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई,
31 हजार रुपये किंमतीच्या 23 तलवारी, 01 गुप्ती व 02 चाकुसह 7 आरोपी ताब्यात..!!
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई..!!
नंदुरबार - प्रतिनिधी सुमित गिरासे
आगामी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक-2024 तसेच सण व उत्सवाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच गुन्हेगारांवर वचक राहून निवडणूका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी अवैध दारुची निर्मिती, वाहतूक, साठा, अवैध अग्निशस्त्र, शस्त्र, अंमली पदार्थाची लागवड, विमल गुटखा इत्यादींवर जास्तीत जास्त प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या.
दिनांक 27/10/2024 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त, एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांच्या पथकाने उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील जबरी चोरीच्या गुन्ह्यात 1) सर्फराज भिकन शाह वय-28 रा. मण्यार मोहल्ला ह.मु. भोणे फाटा घरकुल, नंदुरबार 2) फारुक बशीर शाह वय-28 रा. भोण फाटा घरकुल, नंदुरबार यांना मुद्देमालासह ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणला होता. सदर गुन्ह्यातील आरोपीतांकडे सखोल विचारपूस व त्यांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केला असता सदर सर्फराज शाह हा त्याच्या भोणे फाटा घरकुलच्या घरामध्ये बेकायदेशीररीत्या धारदार तलवारी व इतर धारदार शस्त्र बनवून विक्री करीत असल्याचे उघड झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांनी सदरची माहिती जिल्ह्यातील वरिष्टांना कळविली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा, उपनगर पोलीस ठाणे व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे वेगवेगळे पथे तयार करुन सदर ठिकाणी जावून कायदेशीर कारवाई व ज्याना बेकायदेशीररीत्या तलवारी व इतर धारदार शस्त्र विक्री करणाऱ्या इसमांना ताब्यात घेवून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्याप्रमाणे पथकांनी भोणे फाटा घरकुल परीसरात आरोपी नामे सर्फराज शाह याचे घरात जावून तपासणी केली असता घरामध्ये 10 हजार 500 रुपये किमतीच्या 08 धारदार तलवारी व तलवारी बनिवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले.
तसेच 1) फारुक बशीर शाह वय-28 रा. भोण फाटा घरकुल, नंदुरबार याचे घरातून 4500/- रुपये किमतीच्या 05 तलवारी 2) शोएब शेख हनीफ वय-20 रा. घोडापीर मोहल्ला, नंदुरबार याचे ताब्यातून 5500/- रुपये किमतीच्या 05 तलवारी 3) आकिब रफीक शाह वय-21 रा. मण्यार मोहल्ला, नंदुरबार याचे ताब्यातून 3500/- रुपये किमतीच्या 02 तलवारी व 01 चाकु 4) मुस्सवीर शेख अल्लाउद्दीन वय-21 रा. कुरैशी मोहल्ला, नंदुरबार याचे ताब्यातून 2200/- रुपये किमतीची 01 तलवार, 01 गुप्ती व 01 चाकु असा एकूण 31 हजार 300 रुपये किमतीचे एकुण 21 तलवारी, 01 गुप्ती व 02 चाकु हस्तगत करुन आरोपीतांविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी नामे सर्फराज शाह याने बेकायदेशीररीत्या बनवून विक्री केलेली एक तलवार सारंगखेडा येथे विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने सारंगखेडा येथून एका अल्पवयीन मुलाकडून देखील एक तलवार हस्तगत करण्यात आलेली असून त्याचेविरुध्द् सारंगखेडा पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शेख सोहेल शेख शरीफोद्दीन वय 19 रा. बिस्मील्ला चौक, नंदुरबार याचे ताब्यात देखील 01 धारदार तलवार मिळून आल्याने त्याच्याविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व आरोपीतांकडून एकूण 23 तलवारी, 02 चाकु व 01 गुप्ती चाकु हस्तगत करुन संबंधीत पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सुनिल भाबड, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अमित मनेळ, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. रमेश वावरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक श्री. मुकेश पवार, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक श्री. विकास गुंजाळ, हर्षल पाटील उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक अमोल देशमुख तसेच स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार शहर पोलीस ठाणे व उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांच्या पथकाने केलेली आहे.
