माणुसकीचा पाझर... नितिन कोळी या प्रवाश्याची इमानदारी
शहादा प्रतिनिधी सुमित गिरासे
माणुसकी कशी जपावी स्वतःचा स्थायी स्वभाव ठेवावा लागतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी व सत्याच्या वारसा जपण्यासाठी या युगात फार खटाटोप करावा लागतो. जन्मापासून सत्याचे बाळकडू औषध पिणे म्हणजे गुणकारी होय. आपल्या खान्देशात एक म्हण आहे *काडी चोर किंवा पहाडी चोर* पहाड मधून काडी जरी चोरली तरी तो चोरच समजला जातो. परंतु या जन्मात सुद्धा शाश्वत इमानदारी रुजवली जात आहे. प्रत्येक जण जन्माला येऊन काहीतरी सार्थक करणे म्हणजेच आपण आपल्या चांगल्या केलेल्या कर्माचे फळ योग्य असे मिळते. म्हणून असे कार्य करा की, आपले पुण्य जमा झालेले दिसले पाहिजे, यातच खरी जनसेवा व त्या माध्यमातून ईश्वरसेवा समजली जाते. इमान आणि इमानदारी जनता नेहमी स्मरणात ठेवते. दिनांक 31 जुलै, 2024 रोजी धुळे-अक्कलकुवा, बस क्रमांक-1849 दोंडाईचा स्थानकावर थांबलेली असताना तेथे अक्कलकुवा जाण्यासाठी चेतन यशवंत पाडवी राहणार अक्कलकुवा याने सदर बस गाडीत कॅरी वरती आपली बॅग ठेवून पाण्याची बॉटल घेण्यासाठी गेला असताना, सदर बस ही दोंडाईचा स्थानाकावरून निघून गेली. सदर प्रवाशाला लक्षात आल्यानंतर त्याने दोंडाईचा आगार वाहतूक नियंत्रक श्री.शामराव पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. सदर बसमध्ये माझी बॅग राहिली असून त्यात रू.16,000/- चा मोबाईल व रू.15,000/- रोख एवढा ऐवज आहे. विलंब न करता वाहतूक नियंत्रक दोंडाईचा आगार यांनी मोबाईलद्वारे शहादा आगार वाहतूक नियंत्रक श्री.नितीन सुदाम कोळी यांना सर्व हकीकत मुद्देसूद सांगून खात्री करण्यासाठी व पडताळणी करून सदर बॅग ताब्यात घेण्यासाठी सुचित व निर्देश केले. तोपर्यंत गाडीच्या प्रवास सुकर चालू होता. वेळेवर गाडी शहादा येथे आगारात आली असता वाहतूक नियंत्रक यांनी सदर बसमध्ये जाऊन स्वतः तपासणी केली. त्यात सदर गाडीतील बॅगमध्ये मोबाईल व 15 हजार रुपयाची रक्कम आढळून आली. शहादा आगार वाहतूक नियंत्रक व अक्कलकुवा आगार वाहक राठोड व चालक यांनी माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले. या कार्यामध्ये दोंडाईचा आगार वाहतूक नियंत्रक, शहादा आगार वाहतूक नियंत्रक, अक्कलकुवा आगार वाहक-चालक यांच्या इमानदारीने केलेल्या कामाची पावती सर्व जनतेतून मिळालेली आहे. म्हणून सर्व लोकांचे विश्वासाचे, सत्याचे व इनामदारीचे कौतुक करून त्यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे. सदर प्रवासी हा गाडी सुटल्यामुळे त्या गाडीच्या मागून येणारी गाडी जळगाव-अक्कलकुवा या गाडीने शहादा आगार गाठले व वाहतूक नियंत्रक यांच्याशी संपर्क साधला असता आगारामध्ये सदर इसमाची बॅग इमाने इतबारे मुद्देमाल सह परत केली. सदर चेतन यशवंत पाडवी यांचे आनंद अश्रू अनावर झाले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आपल्या सर्वांमुळे मला माझा मुद्देमाल मला परत मिळाला. मी आपला सर्वांचा खूप - खूप आभारी व ऋणी राहील. म्हणून श्री.हरीश भोई साहेब (शहादा आगार व्यवस्थापक) यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे कर्तव्य पार पाडतांना पोटतिकडीने चांगली कामगिरी बजावल्याचे कौतुक केले. सेवेत राहून जनतेची काळजी घेतली आहे. म्हणून एसटी कर्मचारी विभागामध्ये इमानदारीच्या वागणुकीमुळे नावलौकिक होताना दिसते. असे त्यांनी मनोगत व्यक्त केले. सदर मुद्देमाल इमानदारीने परत केला याबाबत श्री.नितीन सुदाम कोळी (शहादा आगार वाहतूक नियंत्रक) व इतर कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
