नंदुरबार शहरातील पवित्र असलेल्या धार्मिक ठिकाणाची चादर जाळणाऱ्या व सायकलींना आग लावून दोन समजात तेढ निर्माण करणारा आरोपी नंदुरबार पोलीसांच्या ताब्यात..!!
स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीसांची कारवाई..!!
प्रतिनिधी सुमित गिरासे
दिनांक 14/07/2024 रोजी सायंकाळी 06/30 वाजेपासुन ते दिनांक 15/07/2024 रोजी सकाळी 09/00 वाजे दरम्यान नंदुरबार शहरातील शादुल्ला नगर परिसरात असलेल्या टेकडीवरील एका धर्माचे पवित्र स्थान असलेल्या ठिकाणाची चादर कोणीतरी अज्ञात इसमाने जाळुन नुकसान करुन पवित्र उपासनास्थान अपवित्र करुन एका धर्माचा अपमान केला, म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 426/ 2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 298 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
सदरची घटना नागरिकांच्या धार्मिक भावनेशी संबंधीत असल्यामुळे तसेच जातीय दृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे घटनेची माहिती मिळताच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस., नंदुरबार उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर घटनास्थळावर काही संशयास्पद वस्तु मिळून आल्यानंतर त्या तपासकामी जप्त करण्यात आल्या होत्या.
त्यातच दिनांक 16/07/2024 रोजी रात्री 12.30 वा. सुमारास नंदुरबार शहरातील शाहदावल मशीदच्या बाजुला श्री. शेख नासिर शेख हनीफ खाटीक यांचे बुलंदी नाव असलेल्या सायकल दुरुस्तीचे दुकानासमोर असलेल्या 20 ते 22 हजार रुपये किमतीच्या एकुण 09 सायकलींना अज्ञात व्यक्तीने आग लावून नुकसान करुन दोन समाजात तेढ निर्माण होवून सार्वजनिक शांतता भंग करण्याचे कृत्य केले म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 429/2024 भारतीय न्याय संहिता कलम 326 (फ), 196 (1) (ब), 324 (4) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरच्या दोन्ही घटना जातीयदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस. यांनी सदर घटनांचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची वेगवेगळी तपास पथके तयार करुन त्यांना दोन्ही गुन्ह्यातील अज्ञात आरोपीना तात्काळ ताब्यात घेणेकामी निर्देश दिले होते.
त्याप्रमाणे तपास पथकांनी घटनास्थळाचे आजुबाजुला असणारे CCTV, गोपनीय बातमीदार व इतर तांत्रिक बाबी यांच्या मदतीने एका इसमाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने दोन्ही गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे. सदर आरोपीचे नाव कल्पेश रविंद्र कासार वय-30 रा. तांबोळी गल्ली, नंदुरबार असून त्याच्याविरुध्द् पुढील कायदेशीर कार्यवाही सुरु आहे.
ताब्यात घेण्यात आलेला आरोपी कल्पेश रविंद्र कासार वय-30 रा. तांबोळी गल्ली, नंदुरबार यास सदरचे कृत्य करण्यास कोणी भाग पाडले आहे किंवा कसे? याबाबत गुन्ह्याच्या मुळाशी जावून गुन्ह्यात सहभाग असणाऱ्या कोणाचीही गय न करता दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस. यांनी सांगितले.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस., नंदुरबार उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव देसले, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. दिनेश भदाणे, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक / राकेश मोरे, पोलीस अंमलदार विजय ढिवरे, आनंदा मराठे, अभय राजपुत तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक / बलविंद्र ईशी, पोलीस अंमलदार किरण मोरे, कल्पेश रामटेके, राहुल पांढारकर यांच्या पथकाने केली आहे.
नंदुरबार शहरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अफवांवर विश्वास ठेवू नये. सण / उत्सव दरम्यान शांतता भंग करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणून सामाजिक शांतता भंग करणाऱ्या काही समाज कंटकांकडून सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ प्रसारीत केले जातात. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सायबर सेलमार्फत सोशल मीडियावर 24 तास विशेष लक्ष ठेवण्यात येत असून सोशल मीडियावर बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या इसमांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या निदर्शनास काही अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्ष 02564-210100/210113 तसेच डायल-112 यावर संपर्क साधावा.
