खंडेराव महाराज शक्ती द्या टोल पासून मुक्ती द्या
शिरपूर ,सोनगीर अनधिकृत टोल वसुली बंद करा - शिरपूर फर्स्ट चे आंदोलन व निवेदन
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात धुळे पळासनेर या अंतरासाठी उभारण्यात आलेल्या शिरपूर आणि सोनगीर या टोल नाक्यावर स्थानिक वाहनधारकांना सवलत मिळावी आणि बेकायदेशीर असलेला सोनगीर टोल नाका बंद करावा या मागणीसाठी दिनांक 15 जुलै रोजी शहरातील युवकांची संघटना शिरपूर फर्स्ट यांनी आंदोलन करून प्रांत अधिकारी शिरपूर यांना निवेदन दिले.
यापूर्वी देखील अनेक वेळा विविध अधिकारी व प्राधिकरण यांना याबाबत या संघटनेने निवेदन देऊन आपल्या मागण्या सादर केल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून व स्थानिक राजकीय नेत्यांकडून त्याची दखल न घेतल्याने पुन्हा आज आंदोलन करण्यात आले.
काल दिनांक 14 रोजी खासदार एडवोकेट गोवाल पाडवी हे शिरपूर दौऱ्यावर असताना त्यांना देखील या संघटनेने निवेदन सादर केले. खासदारांनी देखील आपल्या मागण्या योग्य व रास्त असून यासाठी आपण पाठपुरावा करू अशी आश्वासन या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
शिरपूर फस्ट ने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मागील बारा वर्षापासून शिरपूर तालुक्याची जनतेला, वाहनधारकांना शिरपूर टोलनाका व सोनगीर टोल नाका येथे धुळे येथे जाण्याकरिता दोघं टोल नाक्यांवर अव्वाच्या सव्वा टोल द्यावा लागतो. शिरपूर तालुका हा धुळे जिल्ह्यात येत असल्याने स्थानिक जनतेला काही ना काही कामानिमित्त धुळे येथे जावं लागतं, ५० किलोमीटरसाठी वाहनधारकांना २०५ रुपये टोल मोजावा लागतो.
शिरपूर टोल नाका हा नगरपालिका हद्दीपासून पाच किलोमीटरच्या आत आहे तसेच सोनगीर टोल नाका हा शिरपूर टोल नाक्यापासून एकाच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरती 34 किलोमीटरचा आत आहे जे NHAI शासन निर्णय 5 डिसेंबर 2008 प्रमाणे अनधिकृत आहे.
सामान्य जनता या दोन्ही टोल नाक्यापासून त्रस्त झालेली आहे.
१) शिरपूर टोल नाक्याला शिरपूर तालुका व शहरातील जनते करता तो माफ करावा अन्यथा टोल नाका बंद करण्यात यावा.
२) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लोकसभेत म्हणाले '२ टोल मधील अंतर ६० किलोमीटर असेल, त्यापेक्षा कमी असला तर आम्ही तो टोल बंद करून तो टोल अद्याप बंद झालेला नाही.
शिरपूर-सोनगीर टोल मधील अंतर केवळ ३२ किलोमीटर आहे, एन. एच. ए. आई च्या नियमानुसार सोनगीर टोल अनधिकृत आहे, तो बंद झाला पाहिजे.
३) शिरपूर टोल नाका व सोनगीर टोल नाका येथील प्रशासन स्थानिक जनतेसोबत हुज्जत घालते आरेवारीची भाषा करते, या बाबत तक्रार असून कारवाई होत नाही.
४) शिरपूर व सोनगीर टोल वरील शौचालय अस्तित्वात नाही, 100 मीटर वर पिवळी रेखा नाही, महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत, रस्त्याची अवस्था बिकट आहे, रात्री अनेकवेळा उड्डाणपूलावरील लाईट बंद असतात, त्याची सुधारणा झाली पाहिजे.
५) एन एच ए आय च्या धुळे जिल्हा येथील ऑफिसला भेट दिल्यांवरती संबंधित प्रोजेक्ट डायरेक्टर यादव साहेब यांच्याशी चर्चा करत असताना उडवा उडवी चे उत्तर मिळतात.
६) एन एच ए आय धुळे येथील लँडलाईन ऑफिसचा नंबर ई-मेल दोघे ही बंद आहेत, ही जनतेची दिशाभूल होत आहे यावर कारवाई झाली पाहिजे.
ह्या मागण्यांना घेऊन आम्ही टोल प्रशासनांकडे, एन एच ए आई धुळे डिरेक्टर यांच्या कडे गेलो, संबंधित खात्याचे मंत्री श्री. नितीन गडकरी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १०० पत्र पाठवली पण प्रशासन आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. येत्या ७ दिवसात निर्णय न घेतल्यास आम्ही टोल नाक्यावर 'उपोषणाला बसू असा इशारा या वेळेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळेस मोठ्या संख्येने शिरपूर फर्स्ट चे पदाधिकारी आंदोलन व निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. या आंदोलकांचे निवेदन प्रांत अधिकारी यांनी स्वीकारले असून संबंधित प्रशासनाचा व आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येईल . संबंधित विभाग आणि प्रशासन यांच्यामार्फत याबाबत झालेल्या कार्यवाही विषयी आपणास अवगत करण्यात येईल अशी माहिती प्रांत अधिकारी यांनी दिली.
याआधी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जोरदारपणे टोल अधिकारी आणि परिवहन विभागातील अधिकारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिरपूर तालुक्यातील ग्रामदैवत खंडेराव महाराज शक्ती द्या शिरपूर तालुक्याला टोल पासून मुक्ती द्या असा नारा या वेळेस या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता.
तालुक्यातील अति महत्वपूर्ण असलेल्या या विषयावर तालुक्यातील राजकीय नेत्यांची उदासीन भूमिका असून याबाबत अद्याप त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांनी देखील या प्रश्नात दखल घेऊन वरिष्ठ स्तरावर मागणी करून सदस्य विषय निकाल ती काढावा अशी देखील प्रतिक्रिया संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी दिली.
त्यामुळे आगामी काळात या विषयावर कायदेशीर मार्ग न निघाल्यास तालुक्यातील हे आंदोलन पेटण्याची शक्यता असून ते अधिक तीव्र होण्याच्या इशारा देण्यात आला आहे.
