फडणवीस तुम्ही महाराष्ट्राची वाट लावलीः राजीनामा कसला देता, लोकांनीच तुम्हाला घरी पाठवले - संजय राऊत
देशातील लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि त्यात महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान केले आणि महाराष्ट्राने महाराष्ट्राची केलेल्या गद्दारीचा बदला घेतला आणि त्यांना आपली जागा दाखवली. त्यामुळे मिस्टर फडणवीस तुम्ही महाराष्ट्राची वाट लावली राजीनामा कसला देतात लोकांनीच तुम्हाला घरी पाठवलं असा घरातील हल्लाबोल संजय राऊत यांनी केलं.
महाराष्ट्रात यापूर्वी इतक्या टोकाचे सुडाचे आणि बदल्याचे राजकारण कधीच नव्हते, ते फडणवीस यांनी सुरू केले. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक आहेत असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
तसेच मि. फडणवीस, जे दोन पक्ष तुम्ही फोडले, त्या दोन पक्षांनीच तुम्हाला जाहीरपणे अश्रू ढाळण्याची वेळ आणली असेही राऊत म्हणाले. आज प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
एक पिढी संपवण्याचे काम केले संजय राऊत म्हणाले, "ही कटुता आमच्या मनात आहे, त्याला कारण फडणवीस स्वतः आहेत. हे सुडाचे, बदल्याचे फडतूस राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही हे लोकांनी फडणवीस यांना दाखवून दिले. या महाराष्ट्रामधली एक पिढी संपवण्याचे काम फडणवीस यांनी केले. हातातील सत्तेचा वापर त्यांनी चुकीच्या कामासाठी केला, राजकीय कार्यकर्त्यांवर सूड घेण्यासाठी सत्ता वापरली. त्यांनी न्यायालयावर दबाव आणला, हे काम फडणवीस आणि त्यांच्या टोळीने केले", असा आरोपही राऊत यांनी केला.
पुढे राऊत म्हणाले, "लोकांचा जेवढा मोदी-शहांवर राग नाही, तेवढा फडणवीसांवर आहे. विदर्भात नितीन गडकरी यांची जागा सोडली, तर भाजप हा रसातळाला गेला, याला जबाबादार फडणवीस आहेत. ते राजीनामा कसला देतात, लोकांनीच त्यांना घरी पाठवले आहे. एक चांगलं राज्य रसाताळाला नेले", अशा शब्दांत राऊत यांनी फडणवीसांवर हल्ला चढवला.
याशिवाय राऊतांनी नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे. "माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग सरळ नाही. कारण 2014 आणि 2019 या दोन निवडणुकीत रुबाबात 56 इंचाची नसलेली छाती घेऊन मोदी
पुढे जात होते, ते चित्र आता दिसत नाही. मोदींचा चेहरा बघा, मोदींची बॉडी लँग्वेज बघा, मोदींची भाषा पाहा. त्यांना पक्षामध्ये विरोध असल्याची माझी माहिती आहे. त्यांना संघाचाही विरोध आहे. खरंतर नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे पराभूत झालेला माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो?", असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
विधानसभेला 180 ते 185 जागा जिंकू मविआला विधानसभा मतदारसंघानुसार 125 जागांवर आघाडी मिळालीय त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "विधानसभेला याहून मोठ यश मिळेल. यावेळी अनेक ठिकाणी सत्तेच्या बळावर जागा पाडण्याचा प्रयत्न झाला. विजय चोरण्याचा प्रयत्न झाला. विधानसभेला असं होणार नाही. विधानसभेला आम्ही 180 ते 185 जागा जिंकू", असे राऊत म्हणाले.