धुळे नंदुरबार मतदार संघात भाजपची वाट बिकट
जनतेची निवडणूक - उमेदवारांच्या विजयासाठी नाही तर पराभवासाठी मतदान
राजकारण - महेंद्रसिंह राजपूत
देशातील निवडणुकांचा अंतिम टप्पा पार पडला. मतदानाच्या कौल मतपेटीत बंद झाला. काल संध्याकाळपासून विविध संस्थांचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली. दावे प्रतिदावे सुरू झाले .
या निवडणुकीत महाराष्ट्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. केंद्रात कोणाचे सरकार असेल यात महाराष्ट्राची नेहमीच महत्त्वाची भूमिका राहिली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्राने केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपला कौल दिला असे अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाला 45 पार चा आकडा कोणत्याही परिस्थितीत गाठता येणार नाही. तर ते 48 पैकी जेमतेम 22 -25 जागांवर विजय मिळवतील असा अंदाज आहे.
मग भाजपाच्या पराभव होणाऱ्या जागा कोणत्या याची समीक्षा केली असता या निवडणुकीत धुळे आणि नंदुरबार मतदार संघात भाजपच्या पराभव निश्चित मानला जात आहे.
नंदुरबार मतदार संघात भाजपचे डॉक्टर हिना गावित यांच्या विरोधात काँग्रेसचे एडवोकेट गोवाल पाडवी यांच्यात प्रमुख लढत झाली. या निवडणुकीत या मतदारसंघातून राजकारणात नवीन चेहरा म्हणून समोर आलेले एडवोकेट गोवल पाडवी यांना मतदारांनी पहिली पसंती दिली. शिवाय मागील दहा वर्षात सत्तेवर असलेल्या डॉक्टर हिना गावित यांच्या बाबतची नाराजी, भाजपातील अंतर्गत फूट, अनेक वर्ष आदिवासी समाजाचे नेतृत्व करून देखील आदिवासी समाजाच्या न झालेला विकास, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांच्या विरोध, महागाई ,बेरोजगारी, धार्मिक असहिष्णुता, देशात वाढीस लागलेली हुकूमशाही, त्यातून धोक्यात आलेली लोकशाही आणि संविधान , शिवाय केंद्र सरकारने महाराष्ट्राशी केलेली गद्दारी, येथील पक्षांची आणि परिवारांची केलेली फोडाफोड, राज्यातील जनतेला अजिबात पटली नाही. संपूर्ण देशभरात भ्रष्टाचारांना भाजपने दिलेली साथ, त्यामुळे फडणवीस जरी स्वतःला चाणक्य समजत असले तरी लोकांना देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे तीनही लोकं नकोसे झाले आहेत. आणि महाराष्ट्रातील उमेदवारांच्या पराभवास प्रामुख्याने हे तीन नेते जबाबदार असणार आहेत.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात डॉक्टर गावित यांच्या बालेकिल्ला असलेल्या नंदुरबार शहरात देखील यावेळेस मोठे खिंडार पडले आहे. शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत रघुवंशी यांची नाराजी, भाजपच्या गटातून नाराज झालेले मुन्ना दादा रावल आणि अभिजीत पाटील यांची नाराजी, प्रतिभा शिंदे सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची साथ, त्यांना दिलेला काँग्रेसचा हात , आणि इंडिया आघाडीतील सहकारी पक्षांची मदत, त्यात जनतेच्या नाराजीचा तडका , असे अनेक विपरीत राजकीय समीकरण तयार झाले आणि काँग्रेसच्या विजयाच्या मार्ग सुकर झाला. साक्री, नवापूर ,नंदुरबार, अक्कलकुवा, या तालुक्यात काँग्रेस उमेदवाराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शिरपूर तालुका जरी भाजपच्या बालेकिल्ला असला तरी या तालुक्यात नाराजी मोठ्या प्रमाणावर होती. शेवटी शेवटी आमदार अमरीश भाई पटेल यांनी सूत्र आपल्या हाती घेऊन लोकांना आवाहन केले मात्र त्यातून काही हाती लागेल असे काही चे चित्र तालुक्यात दिसत नव्हते. लोकांची नाराजी दूर करण्यात ते देखील काहीशा प्रमाणात अपयशी ठरले. त्यामुळे दोन पंचवार्षिक निवडणुकीत चाळीस-पन्नास हजाराच्या लीड देणारा शिरपूर तालुका भरघोस लीड देण्याची अजिबात शक्यता नाही असे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपची वाट बिकट आहे.
तर दुसरीकडे पारंपारिक काँग्रेसच्या असलेल्या मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस तयार आहे.
धुळे मतदार संघात सुरुवातीला काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आणि दिलेला अनोळखी चेहरा यामुळे डॉक्टर सुभाष भामरे यांना ही निवडणूक सहज आणि सोपे वाटत होती. मात्र राजकीय समीकरण बदलली आणि अचानक समोरील उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी प्रचारात आघाडी घेतली. अनेक दिग्गज नेत्यांच्या धुळे शहरात सभा झाल्या. काँग्रेसने पक्षातील अंतर्गत नाराजी दूर करत आपल्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मोट बांधली, तर दुसरीकडे मात्र येथे देखील भाजप उमेदवाराबाबत नाराजी, भाजपकडून हरवलेला जनाधार, केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात लोकांच्या मनात असलेला राग, शेतकऱ्यांची केलेली अवहेलना, राज्याच्या राजकारणात केंद्राने केलेला हस्तक्षेप, काँग्रेसने केलेला सकारात्मक प्रचार, इत्यादी बाबींमुळे काँग्रेस वरचढ ठरत आहे. यात प्रामुख्याने या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी असताना एम आय एम ने आपला उमेदवार दिला नाही. त्यामुळे या सर्व मते काँग्रेसकडे वळताना दिसत आहेत. या मतदारसंघात वंचित ने देखील मोठे आव्हान उभे केले होते मात्र वंचितच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द झाल्याने त्यांची देखील मते काँग्रेसच्या पारड्यात गेली आहेत. धुळे जिल्ह्यात आणि शिंदखेडा तालुक्यात डॉक्टर सुभाष भामरे हे जरी बाजी मारताना दिसत असले तरी नाशिक आणि मालेगाव मतदार संघात मात्र ते मागे पडत आहेत. आणि त्यामुळे धुळे मतदार संघात देखील भाजपची वाट बिकट आहे.
या निवडणुकीत काँग्रेसने सकारात्मक प्रचारावर भर दिला, बेरोजगारी, भ्रष्टाचार ,महागाई, गरीब कुटुंबातील महिलांना वार्षिक एक लाख रुपयांची आर्थिक मदत, 30 लाख नोकऱ्यांची हमी, अग्निवीर योजना, संविधानाचे रक्षण, अशा जनतेतल्या मनात असलेल्या प्रमुख मुद्द्यांना काँग्रेसने हात घातला.
तर दुसरीकडे दहा वर्षे सत्तेत राहून देखील भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस व इतर राजकीय पक्षांची ऊणे धुणे काढण्यात धन्यता मानली, महागाई बेरोजगारी वर चकार शब्द बोलले नाहीत, याउलट धार्मिक असहिष्णुता निर्माण करून म्हैस ,मंगळसूत्र ,मुजरा आणि शेवटी मौन धारण करत जनतेची निराशा केली. अगोदरच 400 पार चा नारा देखील जनतेला पचला नाही, आणि आपकी बार भाजपा तडीपार या उद्धव ठाकरेंच्या घोषणेला जनतेने साथ दिली असे चित्र दिसत होते.
विशेष म्हणजे मागील आठवड्याभरात ज्या ज्या राजकीय समीक्षकांनी आपले राजकीय अंदाज व्यक्त केले त्यात सर्वांनीच धुळे आणि नंदुरबार मतदार संघात भाजपच्या पराभव अटळ असल्याचे मत व्यक्त केले.
सध्या सुरू असलेल्या एक्झिट पोल मधून देखील असेच काहीशी चित्र समोर येत आहे. मात्र आता निकाल जवळ असून निवडणूक निकालांती कोण विजयी होईल हे चार तारखेला ठरेल. एक मात्र नक्की 2024 ला झालेली लोकसभा निवडणूक ही नेत्यांची राजकीय पक्षांची नाही तर जनतेची होती. आणि जनतेच्या कौल असं सांगत होता की आम्ही मतदान उमेदवार विजयी करण्यासाठी नाही तर उमेदवार पाडण्यासाठी केले आहे. त्यामुळे कोणाला विजयी करण्यासाठी आणि कोणाला पाडण्यासाठी हे मतदान केले मतदानाअंती समोर येईल.
आणखी एक राजकीय विशेष म्हणजे निर्भय बनो या संस्थेने आपली एक स्वतंत्र राजकीय विचारधारा प्रवाहित करून महाराष्ट्रात जवळपास 75 सभा घेतल्या. यात त्यांनी सरळ सरळ महाविकास आघाडीला पाठिंबा देत केंद्रातील मोदी शहांच्या सरकारच्या आणि फडणवीसांच्या जाहीर विरोध केला. लोकांना लोकशाही मूल्यांची संविधानाची जाणीव करून दिली. त्यांच्या सर्व या सभांच्या आणि जनजागृतीचा प्रभाव सामान्य लोकांवर पडला आणि फार मोठी विरोधाची लाट महाराष्ट्रातून तयार झाली. त्यामुळे या निकालात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्यास त्यात निर्भय बनो चा सिंहाच्या वाटा असेल.
त्यामुळे प्रतीक्षा आहे चार जून ची , कोणाच्या विजय आणि कोणाचा पराजय हे जनतेचे मतदान अधोरेखित करेल. आता आपण फक्त अंदाज व्यक्त करू शकतो. त्यामुळे हा अंदाज खरा की खोटा आहे येणारा काळ ठरवेल.