सांस्कृतिक लोकोत्सवाचे प्रतीक, जागृत व प्रकट देवस्थान , ऐतिहासिक वारसा व परंपरा लाभलेले श्री खंडेराव महाराज मंदिर व यात्रा उत्सव
शिरपूर महेंद्रसिंह राजपूत
खानदेशातील नामांकित अशी शिरपूर शहरातील यात्रा उत्सवात दिनांक 24 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून सांस्कृतिक लोकात सर्वांचे प्रतीक जागृत व प्रकट देवस्थान, अनेकांचे मनोकामना मनोभावे पूर्ण करणारे ऐतिहासिक वारसा व परंपरा लाभलेले श्री खंडेराव महाराज मंदिर या मंदिर परिसरात साकारणारी यात्रा हे खानदेशातील प्रमुख आकर्षण आहे. यासाठी सालाबादप्रमाणे श्री खंडेराव बाबा विकास संस्था अहोरात्र परिश्रम करून यात्रेचे नियोजन करत असते व त्यास राजकीय सामाजिक व प्रशिक्षण स्तरावरून उत्तम असे सहकार्य मिळते.
काय आहे मंदिराचा इतिहास...
शिरपूर शहरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेले खंडेराव महाराजांचे हे सुमारे 272 वर्षे पुरातन मंदिर असून शहराचे जुने जाणते वैभव व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडेराव महाराज यांचा यात्रोत्सव माघ पौर्णिमे पासून म्हणजेच शनीवार दि. 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होत आहे.
फार पूर्वीच्या काळी एक काळू बाबा नावाचे सद्गृहस्त होते. श्री खंडेराव महाराजांवर त्यांची निस्सीम श्रद्धा होती व ते नेहमी भगवंतांची पूजा-अर्चा, नामस्मरण भक्ती यात तल्लीन राहत असत. काळूबाबा संसारीक गृहस्थ होते. त्यांची व्यथा म्हणजे त्यांना मूलबाळ नव्हते, त्यामुळे त्यांनी देवाला नवस केला व साकडे घातले की, मला जर मूलबाळ झाले तर मी माझे शिरकमल तुला अर्पण करेल. आणि खरोखरच देव नवसाला पावले. काळूबाबांना अपत्य झाले व त्यांनी शब्दाप्रमाणे आपले शिरकमल श्री खंडेराव महाराजांच्या चरणी अर्पण केले असता शिरकमलातून रक्त न निघता भंडारा (हळद) निघाला व या शहराचे नाव शिरपूर असे पडले, असे जुने वयोवृध्द लोक सांगतात. म्हणून श्री खंडेराव महाराजांचा जय मल्हार असा उल्लेख करतात.
स्व. श्री. दौलत रामा मोरे वंश परंपरेने या मंदिराचे पुजारी होते. मंदिराची साफ-सफाई, पूजा-अर्चना, अभिषेक आदी सर्व कार्य स्व. दौलत रामा मोरे हयात असताना मनोभावे करीत होते. त्यांचा स्वर्गवास झाल्यानंतर त्यांचे पुत्र वंश परंपरागत मंदिराचे सर्व पूजाविधी, अभिषेक, अर्चना, साफ-सफाई कार्यात कार्यरत आहेत. त्यात प्रामुख्याने माधवराव दौलत मोरे, उत्तमराव दौलत मोरे, गोविंदराव दौलत मोरे, भानुदास दौलत मोरे हे सध्या सर्व पूजा वंश परंपरेनुसार सांभाळीत आहेत.
शिरपूर शहरातील पुरातन व जागृत देवस्थान असलेले हे मंदीर काही वर्षापूर्वी अत्यंत उपेक्षित व दुर्लक्षित अवस्थेत होते. मंदिराची डागडुगीदेखील व्यवस्थीत होत नव्हती. केवळ यात्रेदरम्यान या मंदिरात भाविकांची वर्दळ राहत असे व नंतर भाविकांचे मंदिराकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असे. परंतु एकाच ध्येयाने प्रेरीत होऊन शहरातील काही सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून श्री खंडेराव बाबा विकास संस्थेची स्थापना केली. या कार्यकर्त्यांनी केवळ विकास संस्थेची स्थापना करुन न थांबता अखंड प्रयास व प्रयत्नांची पराकाष्टा करुन जिद्दीने व मेहनतीने हजारो भाविकांच्या देणगीरुपाने मिळालेल्या पैशातून आज या मंदिराचे जिर्णोद्धार कार्य पूर्ण केले आहे. हजारो भाविकांनी श्री खंडेराव बाबा विकास संस्थेवर विश्वास व्यक्त करुन उदार मनाने देणग्या दिल्या आहेत.
श्री खंडेराव बाबा विकास संस्थेचे अध्यक्ष म्हणून आज कैलास धाकड, उपाध्यक्ष संजय आसापुरे, कोषाध्यक्ष किरण दलाल, कार्याध्यक्ष साहेबराव महाजन हे काम पहात आहेत तर प्रमुख विश्वस्त म्हणून गुलाब भोई, सचिव गोपाल मारवाडी, विश्वस्त श्रीहरी यादगिरीवार, गोपाल ठाकरे, शरदकुमार अग्रवाल यांची देखरेख आहे तर भानुदास मोरे (पुजारी), गोविंदा मोरे (पुजारी), नाना सोनवणे, गजानन मगरे, संजय बारी, जगदिश बारी, राजेंद्र धोबी, प्रकाश भोई, सुभाष भोई, अशोक राजपुत, संजय पाटील हे सर्व स्विकृत सदस्यही त्यांना मदत करीत आहेत. मंदिराचे व्यवस्थापक म्हणून महेश देवकर हे उत्तमरित्या काम पहात आहेत. माधवराव मोरे, उत्तमराव मोरे हे पुजारी म्हणून काम पाहत आहेत.
आज शहरातील अग्रेसर संस्थान असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक कार्यात सदैव तत्पर असणारे असे एक सामाजिक कार्याचे उत्कृष्ट रसायन म्हणजे श्री खंडेराव बाबा विकास संस्था, असे निर्विवादपणे म्हणता येईल.
श्रीमती हेमंतबेन रसिकलाल पटेल (मम्मीजी) यांनी श्री खंडेराव देवस्थान जिर्णोद्धार कार्यासाठी पाच लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची भरीव मदत उदार अंत:करणाने दिलेली आहे. जिर्णोद्धार कार्यासाठी पटेल परिवारातर्फे देण्यात आलेली भरीव देणगी म्हणजे त्यांनी केलेल्या दातृत्वाचे व संस्थेवर दाखविलेल्या विश्वासाचेच प्रतिक आहे. मंदिर जिर्णोद्धार कार्यात शहराचे आमदार अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, विद्यमान नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल यांचे अनमोल सहकार्य लाभल्याने मंदिराचा कायापालट झाला आहे. तसेच यात्रोत्सवादरम्यान शिरपूर-वरवाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सफाई कर्मचारी, अग्नीशमन दल, आरोग्य विभाग अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचारी यांचे अत्यंत बहुमूल्य सहकार्य दरवर्षी लाभत असते.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात माणूस माणसापासून दुरावत चालला असला तरी आज ग्रामीण भागात यात्रोत्सवाला अनोखे महत्व आहे. सर्वच जाती-धर्माचे लोक यानिमित्ताने एकत्र येऊन सामाजिक एकात्मतेचे खर्या अर्थाने दर्शन घडविताना दिसून येतात. यात्रोत्सवाच्या निमित्ताने पूर्वापार चालत आलेल्या रुढी परंपरा यांनाही चालना मिळते. तसेच भावी पिढीला त्याचे आकलन होण्याबरोबरच थोर, संत महात्म्यांनी दिलेली शिकवण मार्गदर्शक ठरत असते. श्रीखंडेराव यात्रोत्सवाचा कालावधी हा माघ शुद्ध पौर्णिमा ते महाशिवरात्रि उत्सवापर्यंत 15 दिवसांचा असतो. या यात्रेस शिरपूर शहर व तालुक्यासह पंचक्रोशीतील आबालवृध्द, महिला, पुरूष, तरूण, यात्रोत्सवाचा आनंद घेतात. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांतून भाविक नवस फेडण्यासाठी यात्रोत्सवांत येत असतात. नवसाला पावणारा देव म्हणून श्रीखंडोबाची ख्याती असून आतापर्यंत अनेक भाविकांनी या ठिकाणी नवस पुर्ण केलेले आहे. खंडोबावर असलेल्या निस्सिम श्रध्देमुळे नवस फेडायला येणार्या भाविकांच्या मनोकामना पुर्ण होत असतात. यात्रोत्सव आणि धार्मिक उत्सवामुळे त्या-त्या गावाचा नावलौकिकही वाढत असतो. शिरपूर शहरात अडीचशे वर्षांपेक्षाही प्रदीर्घ परंपरा असलेला श्रीखंडेराव महाराज यात्रोत्सव संपूर्ण खान्देशात आज परिचित आहे. व्यापारीपेठेचे गाव म्हणून ओळखल्या जाणार्या शिरपुरात सुरु झालेल्या या यात्रोत्साठी खान्देशसह परराज्यातूनही भााविक येतात. यात्रेनिमित्त भरणारा घोडे बाजार हा तर या यात्रेचा मुख्य केंद्रबिंदूच असतो. घोड्यांचे खरेदीदार तसेच परंप्रातांतून आलेले विक्रेते यांची वेगळीच चहल-पहल या यात्रेदरम्यान सुरु असते. असा हा वैशिष्टयपूर्ण यात्रोत्सव पंचक्रोशीत सुपरिचित आहे.
ई-कॉमर्स व ऑनलाइन शॉपिंगच्या जमान्यात देखील पूर्वापारपासून चालत आलेला यात्रा उत्सव याचे महत्त्व कुठेही कमी न होता दिवसेंदिवस नागरिक त्यात सहभागी होऊन खरेदी विक्री करतात आणि म्हणूनच या यात्रा परंपरा चे जतन होत आहे.
