पुणे:- इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात शनिवारी आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावे हा यामागील उद्देश होता. आठवडे बाजारात विद्यार्थ्यांनी घरच्या भाजीपाल्यासह ,मक्याची कणसे, किराणा साहित्य, स्टेशनरी,कटलरी आदी वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या.तसेच खाऊगल्लीत कांदे पोहे, सामोसे, ओली/ सुकी भेळ,भजी,मसाला ताक, मसाला हरभरा, सुका मेवा,वडापाव,ढोकळा, इडली, तळलेली मासळी आदी खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने बनवले होते.खमंग खाद्यपदार्थ घेण्यासाठी गर्दी झाली होती.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आल्याचे चित्र शाळेत दिसले. खरेदीसाठी ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. आठवडे बाजारात अंदाजे दहा ते बारा हजार रुपयाची उलाढाल झाली.
आश्रमशाळेत कृतीशील शिक्षण देणारे नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिले जातात. अशा उपक्रमाद्वारे व्यवहारज्ञान बालवयातच मिळाल्यास भविष्यात विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण राहणार नाही,असे मत आयोजित आठवडे बाजाराच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.राहुल मखरे यांनी मांडले. आठवडे बाजाराचे उद्घाटन इंदापूरच्या माजी नगरसेविका, संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे यांनी केले. यावेळी संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे, संचालक अस्मिता मखरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
या शाळेत राबवले जाणारे नाविन्यपूर्ण उपक्रम इतर शाळांना दिशा देणारे आहेत.
असे मत नानासाहेब चव्हाण (कार्याध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र) यांनी मांडले.
आठवडे बाजाराचे आयोजन मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे यांनी अतिशय नियोजनबद्ध केले होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

