सुवर्णनगरी झाली भगवामय, शहरात श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी
सर्व हिंदू व राम भक्तांना कार्यक्रमास उपस्थितीचे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा उत्सव समितीचे आवाहन
शिरपूर महेंद्रसिंह राजपूत
दिनांक 22 जानेवारी रोजी आयोध्या येथे अयोध्येचे मूळ निवासी व अयोध्येचा राजा प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा संपन्न होऊन भव्य दिव्य व अलौकिक असे राम मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे.
वर्षानुवर्षांपासून प्रत्येक हिंदूंच्या मनात असलेला व राम भक्तांच्या स्वप्न असलेले अयोध्येतील राम मंदिर हे स्वप्न पूर्णत्वास येत असून त्यानिमित्ताने देशभरात राममय व भक्तीमय असे वातावरण तयार झाले आहे.
या निमित्ताने सुवर्णनगरी शिरपूर शहरात देखील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा उत्सव समितीने जय्यत अशी तयारी केली असून संपूर्ण शहर भगवामय झाले आहे. शिरपूर तालुक्यात देखील विविध ठिकाणी भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न होत आहे. प्रामुख्याने शिरपूर शहरात भव्य दिव्य असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या सर्व धार्मिक कार्यक्रमात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन उत्सव समितीने केले आहे.
शिरपूर शहरात आज दिनांक 20 जानेवारी रोजी वरवाडे येथील नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे आज दुपारी 03 वाजता जलाभिषेक करून दुपारी 04 वाजता भव्य दिव्य व अनोखा असा शोभायात्रा व पालखी सोहळा संपन्न होत आहे. यादरम्यान विविध धार्मिक देखावे, भजन कीर्तन व भक्तिमय वातावरणात हजारो विद्यार्थी नागरिक महिला व राम भक्त व तालुक्यातील जनतेच्या सहभागाने संपूर्ण शहरात सदरची शोभायात्रा काढण्यात येत आहे. यासाठी गल्लोगल्ली आणि जागोजागी भगवा ध्वज व पताका लावून रांगोळ्या ची सजावट करून पालखी मार्गावर तयारी करण्यात आली आहे. या शोभा यात्रेच्या समारोप आयोध्या धाम ,गरबा ग्राउंड कॉलनी पित्रेश्वर स्टॉप शहादा रोड येथे सायंकाळी संपन्न होणार आहे.
रविवार दिनांक 21 जानेवारी रोजी अयोध्या धाम गरबा ग्राउंड पित्रेश्वर कॉलनी स्टॉप शहादा रोड येथे 51 होम कुंडांवर श्रीराम महायज्ञाचे आयोजन करण्यात सकाळी 08ते दुपारी 12 या कालावधीत करण्यात आले आहे. होम यज्ञाच्या दर्शनासाठी दुपारी01 ते 05 या वेळेत नागरिकांसाठी दर्शनाची व्यवस्था केली आहे. सायंकाळी रामरक्षा व सहस्रदीप यज्ञ सायंकाळी 05 ते 07 या वेळेत संपन्न होणार आहे. आणि प्रभू श्रीरामांच्या भक्तांसाठी रात्री 08 वाजता कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 09 ते 11 या वेळात महायज्ञ पूर्णाहुती, दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामांची महाआरती व अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या लाईव्ह कार्यक्रम एलईडी स्क्रीनवर दाखवला जाणार आहे. आणि दुपारी एक वाजेनंतर महाप्रसाद व भंडारा चे आयोजन करण्यात आले आहे.
शिरपूर शहरात प्रथमच भव्यदिव्य असा या धार्मिक उत्सवात तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्रीराम प्राणप्रतिष्ठा उत्सव समितीने केले आहे.



