अकोले येथे मराठी भाषा शिक्षकांसाठी चिंतन शिबिराचे आयोजन
२४ व २५ डिसेंबर दोन दिवसात पाठ्यपुस्तकातील कवी लेखक भेटीला येणार
शिरपूर (प्रतिनिधी): राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मराठी भाषा अध्यापकांची अग्रगण्य संस्था असलेल्या ' माय मराठी राज्य अध्यापक संघ, महाराष्ट्र' व अहमदनगर जिल्हा माय मराठी अध्यापक संघ यांच्या वतीने मराठी भाषा अध्यापकांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे दिनांक 24 व 25 डिसेंबर रोजी " मराठी भाषा चिंतन शिबिराचे " आयोजन अभिनव पब्लिक स्कूल, अकोले येथे करण्यात आले आहे.
चिंतन शिबिराचे उद्घाटन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मराठी भाषा चिंतन शिबिराच्या अध्यक्षस्थानी यावर्षी माय मराठी राज्य अध्यापक संघाच्या सहसचिव इस्लामपूर जि. सांगली येथील सुनीता साळुंखे पाटील यांची निवड करण्यात आली असून स्वागताध्यक्षपदी अभिनव शिक्षण संस्था अकोलेचे अध्यक्ष मधुकरराव नवले यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला माय मराठी राज्य अध्यापक संघाचे संस्थापक विश्वस्त हनुमंत कुबडे , निमंत्रक माय मराठी राज्य अध्यापक संघाचे उपाध्यक्ष जिजाबा हासे, नगर जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक पाचपुते, कार्याध्यक्ष श्रीकांत होशिंग उपस्थित राहणार आहेत.
शिक्षकांसाठी ज्ञानाची मेजवानी
दिनांक 24 डिसेंबर रोजी नोंदणी झाल्यानंतर पहिले सत्र अकरा वाजता प्रकट मुलाखतीने होणार आहे. ' बीजमातेचा एक अनोखा प्रवास,' बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची मुलाखत संतोष साबळे घेणार आहे. तर दुपारी बारा वाजता 'मराठी भाषा शुद्धता ' या विषयावरील परिसंवादात शारदा शिक्षण संस्था संगमनेरच्या चेअरमन श्रीमती सुवर्णाताई मालपाणी आपले मनोगत व्यक्त करणार असून अध्यक्षपदी सौ अमृता कवीश्वर असणार आहेत.
दुसऱ्या सत्रात दुपारी दोन वाजता ' कविता विद्यार्थ्यांच्या अंतरंगात उतरताना ' या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर कैलास दौंड हे मार्गदर्शन करणार असून यावेळी डॉ. प्रिया निघोजकर (कार्यकारी संपादक) अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. दुपारी तीन वाजता ' मराठी भाषा विषयाच्या अध्ययन निष्पत्ती व वर्ग आंतरक्रिया ' या विषयावर शिक्षण अभ्यासक संदीप वाकचौरे मार्गदर्शन करणारा असून यावेळी अध्यक्षस्थानी संघाचे उपाध्यक्ष रमाकांत देशपांडे असणार आहेत.
दुपारी चार वाजता ' लोकसाहित्य आदिवासी कलाप्रकार सादरीकरण' कांबड नृत्य व टिपरी नृत्य सादर होणार आहे. सायंकाळी सहा वाजता माय मराठी राज्य अध्यापक संघाची सहविचार सभा होणार असून त्याचे अध्यक्षस्थान संघाचे राज्याचे अध्यक्ष लक्ष्मण महाडिक असणार आहेत. रात्री साडेआठ वाजता कवी संमेलन होणार असून त्यामध्ये डॉ. कैलास दौंड व रानकवी तुकाराम धांडे कविता सादरीकरण करणार आहेत. याचे अध्यक्षस्थान संघाचे उपाध्यक्ष विलास पाटील भूषावणार आहेत. यावेळी संघातील सर्व सदस्यांना आपल्या कविता सादर करता येतील.
दुसऱ्या दिवशी (२५ रोजी ) सकाळी पहिल्या सत्रात नऊ वाजता ' नवे शैक्षणिक धोरण ' हा परिसंवाद होणार असून त्यात वरिष्ठ अधिव्याख्याता प्राध्यापक अरुण भांगरे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनील शिंदे सहभागी होणार असून याचे अध्यक्षस्थान कोल्हापूर येथील नेताजी डोंगळे भूषवणार आहेत.
सकाळी दहा वाजता ' रानकवीचा प्रवास जाणून घेताना ' ही रानकवी तुकाराम धांडे यांची मुलाखत डॉ. रंजना कदम , भाऊसाहेब कासार घेतील . सकाळी अकरा वाजता ' मातृभाषेची आवश्यकता काळाची गरज' या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे मांडणी करणार असून मराठी भाषा अभ्यास गट बालभारती पुणेच्या सदस्य डॉ. सौ नंदा भोर अध्यक्षस्थानी असणार आहेत.
दुपारी बारा वाजता समारोपाचा कार्यक्रम होणार असून त्या ज्येष्ठ साहित्यिक व आमदार लहू कानडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक बबनराव महाले असणार आहेत. तसेच श्री विक्रम नवले , सतीश पाचपुते, डॉक्टर भास्कर शेळके, ज्येष्ठ साहित्यिक पुंडलिक गवंडी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अहमद नगर जिल्ह्यातील अकोले येथे संपन्न होणाऱ्या माय मराठी अध्यापक कान साठी आयोजित दोन दिवशीय भाषा व ज्ञान समृद्धी चिंतन शिबिरास मराठी भाषा अध्यापकानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माय मराठी राज्य अध्यापक संघाच्या वतीने संघाचे विश्वस्त डाॕ.संतोष पाटील शिरपूर ,पोपटराव ढोले साक्री ,शांताराम पाटील नंदुरबार , माय मराठी अध्यापक संघाच्या धुळे जिल्हा अध्यक्षा प्राचार्य सारिका निशांतराव रंधे , माय मराठी जिल्हा अध्यापक संघाचे जयेश महाजन धुळे जिल्हा माय मराठी अध्यापक संघाचे सल्लागार विश्वस्त योगेंद्र गिरासे यांनी केले आहे.
