नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची म्हसावद पोलीस ठाण्याला भेट...!!!
प्रतिनिधी सुमित गिरासे नंदुरबार
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील हे दिनांक 27/12/2023 ते दिनांक 30/12/2023 रोजी पावेतो नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले आहेत. दरम्यान त्यांनी दिनांक 28/12/2023 रोजी त्यांनी म्हसावद पोलीस ठाणे येथे भेट देवून म्हसावद पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी केली. त्यावेळी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर. पाटील यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.श्री.बी.जी.शेखर पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील यांनी म्हसावद पोलीस ठाण्याचे आवार, परिसर पाहून पोलीस ठाण्यातील स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर म्हसावद पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेख, गोपनीय अभिलेख, विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमालयांची पाहणी केली.
म्हसावद पोलीस ठाण्याचा गुन्हे आढावा घेत असतांना विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.श्री.बी.जी.शेखर पाटील यांचे असे निदर्शनास आले की, म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत मालमत्तेविरुध्दच्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी असून शरीराविरुध्दचे किरकोळ स्वरुपाचे गुन्हे अधिक आहे. त्यामुळे पोलीसांनी गाव पातळीवर जास्तीत जास्त वेळ थांबून गावात कायदेविषयक जनजागृती करावी, तसेच म्हसावद येथून धडगांव व तोरणमाळ येथे जाण्यासाठी घाट रस्ता असल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी घाटात सतत गस्त करुन वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करणेबाबत मार्गदर्शन करावे. तसेच म्हसावद पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार करीत असलेल्या कामाचा आढावा घेवून त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करुन प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सतर्क राहून आपले दैनंदिन कर्तव्य करणेबाबत सूचना केल्या.
भेटी दरम्यान म्हसावद पोलीस ठाण्यासमोरील मोकळे पटांगण पाहून विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सांगितले की, पोलीस दलात दैनंदिन काम करीत असतांना कामाच्या अतिरीक्त ताणामुळे पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे आपल्या स्वतःच्या शरीर स्वास्थ्याकडे कायमच दुर्लक्ष होत असते. त्या सर्वातून बाहेर पडून प्रत्येकाने आपल्या स्वास्थ्याकडे काळजीपूर्वक लक्ष पुरविले पाहिजे. वर्षभर चालत असलेले सततचे बंदोबस्त तसेच तपास यासारख्या गोष्टीमुळे पोलीस दलातील प्रत्येक
व्यक्ती कायमच व्यस्त असते. या सर्वातून विरंगुळा व्हावा तसेच शरीर स्वास्थ्याच्या प्रती प्रत्येकाने सजग व्हावे
यासाठी प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दैनंदिन कर्तव्यातून थोडा वेळ काढून नियमित मैदानी खेळ खेळले पाहिजे ज्यामुळे शरीरात एका नवा उत्साह निर्माण होत असतो आणि शरीर अधिक जोमाने काम करीत असतो "
म्हसावद पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या कामगिरीबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या अडचणीबाबत विचारपूस करुन त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या निश्चितच सोडविल्या जातील असे यावेळी सांगितले.
सदर वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.श्री. बी. जी. शेखर पाटील, नंदुरबार जिल्ह्याचे पोलोस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, शहादा उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. दत्ता पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, म्हसावदपोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजन मोरे, पोलीस उप निरीक्षक श्री. जितेंद्र पाटील, श्री. चंद्रकांत बडगुजर यांचेसह म्हसावद पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अमंलदार उपस्थित होते.
