अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या : बिरसा फायटर्स, शिरपूर
शिरपूर प्रतिनिधी,
धुळे जिल्ह्यातील वनपट्टेधारक शेतकरी व ७/१२ धारक शेतकरी यांना अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी असी मागणी बिरसा फायटर्स, शिरपूर यांनी तहसीलदार, शिरपूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री, कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे कि, धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हाता-तोंडाशी आलेली ज्वारी, तूर, कापूस, मिरची, पपई, केळी, कांदा, सोयाबीन, भाजीपाला इ. पिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झालेले आहेत. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे कापणी केलेली ज्वारी, मका व उडीद भिजून खराब झाली. शेतकऱ्यांचा पांढरे सोने म्हणून ओळख असलेला कापूसही काळा-पिवळा पडला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी चारा, जनावरांचे गोठे व घरांचेही अतोनात नुकसान झाले आहेत. पाऊस वाऱ्यामुळे अनेक पिके जमीनदोस्त झालेली आहे. अगोदरच अनियमित पावसामुळे उत्पादन जेमतेम आहे. व शेतमालाला योग्य दर नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहे. अस्मानी संकटाने हाता-तोंडाशी आलेले पीक हिरावून घेतले आहे. धुळे जिल्ह्यातील वनपट्टेधारक व ७/१२ धारक शेतकरी यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
तरी धुळे जिल्ह्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून वनपट्टेधारक शेतकरी व ७/१२ धारक शेतकरी यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळावी असी मागणी करण्यात आली.
निवेदन देतांना यांची उपस्थिती विलास पावरा अध्यक्ष नाशिक विभाग बिरसा फायटर्स, ज्ञानेश्वर भील जैतपूर गावा शाखा अध्यक्ष, काकड्या पावरा जिल्हा संघटक, शिवाजी पावरा, जितेंद्र पावरा, कैलास पावरा आदि. उपस्थित होते.
*“शासनाकडून अनेकवेळा नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होतात; मात्र, नुकसान भरपाई मिळत नाही. यासाठी सरकारने नुसती आश्वासने न देता; वनपट्टेधारक शेतकरी व ७/१२ धारक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार देण्यासाठी मदत करावी.”*
विलास पावरा, अध्यक्ष, नाशिक विभाग, बिरसा फायटर्स
