नायब तहसीलदार यांच्या नावाने लाच मागणारा पंटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या शाखेने केले जेरबंद
शिंदखेडा -नायब तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांच्या नावाने लाच मागणारा पंटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे शाखेने जेरबंद केला आहे. याबाबत आज सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की 10 ऑक्टोबरला शिंदखेडा येथे ही कारवाई करण्यात आली. रितेश पवार असे पंटरचे नाव असून 14 हजार रुपयांची लाच घेतांना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
शिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णे येथील शेतकऱ्याने याबाबत तक्रार दिली होती. त्यांच्या सामायिक शेतीची खातेफोड करावयाची असल्यामुळे ते शिंदखेडा तहसील कार्यालयात गेले होते. 4 ऑक्टोबरला त्यांना संशयित रितेश पवार भेटला. त्याने खातेफोड करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करून प्रकरण जमा केले. त्यानंतर तेथील नायब तहसीलदार व इतर अधिकारी यांच्याशी घनिष्ट संबंध असल्याचे सांगून खातेफोडीचा आदेश काढण्यासाठी साहेबांना 20 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
संबंधित शेतकऱ्याने धुळे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. सहा ऑक्टोबरला तक्रारीची पडताळणी केल्यावर त्याने पंचासमक्ष तडजोड करून 14 हजार रुपये मागितले. त्यानंतर 10 ऑक्टोबरला विभागाने सापळा रचून 14 हजार रुपये स्वीकातांना रितेश पवार याला अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, वाचक अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शाखेचे उपअधीक्षक अभिषेक पाटील, निरीक्षक मनजीतसिंह चव्हाण,
हेमंत बेंडाळे, रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, गायत्री पाटील, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कामगिरी बजावली.
