*सहा महिन्यांपूर्वी झालेल्या 'त्या' खुनाचा वाकड पोलिसांनी केला उलगडा...*
*"पत्नीविषयी अश्लील बोलल्यावरून मित्राचा निर्घृणपणे केला खून."*
*"नाशिक फाटा येथील उड्डाणपुलावरून ढकलले."*
पिंपरी : दारू पित असताना तरुणाने त्याच्या मित्राच्या पत्नीबाबत अश्लील भाषा वापरली. त्याचा राग आल्याने मित्राने त्याच्या साथीदारासह तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्ट मारला. जखमी झालेल्या तरुणाला नाशिक फाटा येथील उड्डाणपुलावरून महामार्गावर ढकलले. यात महामार्गावर पडून गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्य झाला तरुण बेपत्ता झाल्याप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी सहा महिन्यांनंतर तक्रार केली. त्यानंतर वाकड पोलिसांनी ३६ तासांत तपास करून खुनाचा हा प्रकार उघडकीस आणला.
दिनेश दशरथ कांबळे (२६), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सिद्धांत रतन पाचपिंडे (२३, रा. गुरुनानकनगर कॉलनी, रहाटणी), प्रतीक रमेश सरवदे (२५, रा. कदळवाडी चिखली) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश कांबळे हा सहा महिन्यांपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याची आई माया कांबळे (५०, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी तपास केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, निरीक्षक (गुन्हे) रामचंद्र घाडगे, तपास पथकाचे सहायक निरीक्षक संतोष पाटील उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फौजदार बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलिस कर्मचारी वंदू गिरे, संदीप गवारी, स्वप्निल खेतले, दीपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, प्रशांत गिलबीले, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, अजय फल्ले, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे, रमेश खेडकर, सागर पंडित यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
*"रुग्णालयात दाखल न करता केली हत्या"*
दिनेश याच्या मित्रांकडे चौकशी केली. दिनेश हा १५ मार्च २०२३ रोजी रात्री काळेवाडी फाटा येथे त्याचे मित्र सिद्धांत व प्रतीक यांच्यासोबत दारू प्यायला बसला होता. त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले, अशी माहिती पोलिसांना मिळाली. सिद्धांत आणि प्रतीकला ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले, सिद्धांत, प्रतीक आणि दिनेश हे तिघेही १५ मार्च रोजी दारू प्यायला बसले. दिनेश याने प्रतीकच्या पत्नीबाबत अश्लील भाषा वापरली. त्यामुळे प्रतीक व सिद्धांत यांनी दिनेशच्या डोक्यात सिमेंटचा गट्ठ मारून जखमी केले. रुग्णालयात दाखल करण्यासाठी दुचाकीवरून नेले. मात्र, पोलिस चौकशी होईल, या भीतीने रुग्णालयात दाखल न करता उड्डाणपुलावरुन फेकून दिनेश याचा खून केला."
