दान दे रे नरा दान दे ।
प्राण भारत भु-ला दान दे ।।
लोककवी वामनदादा कर्डक यांच्या १०१ वी जयंती व मुक्तीभूमी वाचनालय-अभ्यासिकेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त येवल्यात रंगले कवी संमेलन..
नाशिक-:शांताराम दुनबळे
नाशिक:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती,येवला व लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी तसेच सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिकेचा चौथ्या वर्धापन दिनानिमित्त कवी संमेलन येवला येथे ज्येष्ठ साहित्य समीक्षक प्रा.डाॅ.जीभाऊ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
या कवी संमेलनात तालुक्यातील कवींनी सामाजिक, राजकीय,जगण्याला बळ देणाऱ्या तसेच स्री जाणिवेच्या कविता सादर करुन कवी संमेलनात चांगलीच रंगत आणली.
झिजवतो हाडे आटवतो रक्त
तरीही नाही फुलत आमचा मळा
खुलत नाही आयुष्य, अन्
कर्जाच्या डोंगरात शिगेला लागतो गळा...
जिवाचा पाचोळा होऊन
इथल्या व्यवस्थेच्या वाऱ्यात होतोय दिशाहीन
आणि भरकटतोय सालोसाल
आपल्याच आयुष्याचा गुंता करत
आयुष्य बहरुन येण्यासाठी...
कवी रतन पिंगट यांच्या 'गुंता' या कवितेत शेतात कितीही कष्ट केले, रक्त आटवले तरीही कर्जाचा डोंगर वाढतच जातो. शासन व्यवस्थेच्या दिशाहीन धोरणांमुळे शेतकरी भरडला जातोय. शेतकऱ्याची व्यथा, दुःखाला स्पर्श करणारी कविता सादर करून उपस्थितांचे लक्ष शासनाच्या धोरणाकडे वेधले.
दान दे रे नरा दान दे ।
प्राण भारत भु-ला दान दे ।ज्योतिबाच्या आखड्यातला।शाहू वाणी पहिलवान दे।
मृत वामनला फुल ना जरी।
पिंपळाचे तरी पान दे।
ह्या व शत्रूच्या छावणीत फितूर होण्यापेक्षा।देशासाठी बंदूकीची गोळी होणं चांगलं। असा वामनदादा करडकांच्या
गझलने कर्डक प्रतिष्ठान व मुक्तीभूमी वाचनालय-अभ्यासिकेचे संस्थापक कवी,लोकशाहीर शरद शेजवळ यांनी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गझला आपल्या सुमधुर व पहाडी आवाजातून सादर करून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले.
सत्य बिचारे रस्त्यावरती लाठ्या खाते
खोट्यावरती हार फुलांची उधळण झाली ।
भुलली बहुदा झगमगणाऱ्या या शहराला
हसरी वस्ती एकाएकी निर्जन झाली।।
मौन असे तू धारण केले भलत्या वेळी
मग शब्दांची कायम मजला अडचण झाली।।।
गझलकार सचिन साताळकर यांनी रोजच्या जगण्यातील प्रश्न , सामान्य माणसावर होणारा अन्याय व समाजातील विरोधाभास याबद्दल भाष्य करणाऱ्या सामाजिक जाणिवेच्या गझल सादर करून उपस्थितांचे मने जिंकले.
शील, प्रज्ञा, करुणा त्रिसूत्री
अनुयायांना देऊनी गेला !
स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचा
प्रचार जगती करूनी गेला !
कवयित्री संगीता महाजन त्यांच्या महामानव या कवितेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात कोसळणारा ज्ञानाचा प्रपात धरणीवरती होऊन गेला ज्यांनी करुणा, शील, प्रज्ञेचा संदेश जगाला देऊन अज्ञानात खितपत पडलेल्या जनतेला ज्ञानाचा प्रकाश दाखविला. या शब्दात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
शुद्ध पवित्र विचार
कृती कीर्तीचा प्रकाश,
भाग्य कोरीते माझे मी
दिव्य उजळे आकाश..
कवयित्री सोनाली आळंदीकर यांनी 'उंच माझा झोका' या कवितेतून स्त्री आता उद्युक्त झाली आहे.असे शुद्ध पवित्र विश्वात्मक कल्याणाचे विचारच नव्हे तर तिला आपल्या अप्रतिम अशा कृतीचाही प्रकाश पाडायचा आहे. याच कृतीच्या प्रकाशात कीर्ती ही सामावली आहे. हे सारे करण्यासाठी मी स्वयंसिद्ध असल्याचा आत्मविश्वास ती जगाला दाखवत आहे असे सांगून श्रोते मंत्रमुग्ध केले.
'स्वार्थाने जगण्याच्या नादात
लोकशाही पायदळी तुडवतो आहे
न्यायदेवतेचा लबाडानी
सारा बाजार मांडला आहे.
कवी बालाजी नाईकवाडी यांनी उद्रेक ही कविता सादर करून आजची राजकीय परिस्थितीमुळे सामान्य व्यक्तीच्या मनामध्ये चीड निर्माण होते ती कवितेमधून मांडण्यात आली.जे खोटं आहे तेच खरं करून सांगितले जाणाऱ्यांचाच विजय होतो. अशाने लोकशाहीचा घात होत आहे का ? या आशयाची कविता सादर केली.
घ्यायचा होता जन्म तुझ्या पोटी किती हर्षली गं तु आई..
कळी होते तुइयापोटी का केली मग लगेचच खुडण्याची घाई...
कवी योगेश माकाणे यांनी वंशाच्या दिव्या साठी मुलाच्या अट्टाहासपायी कित्येक स्रीभृणहत्या समाजामध्ये आपण बघत असतो परंतु नकळत त्यामुळे स्री- पुरुष गुणोत्तर , विविध समाजामध्ये वधू मुलींची कमतरता, वर मुलांची वाढती संख्या यासारखे प्रश्न सध्या भेडसावत असणारी कविता सादर केली.
कवयित्री पुनम दुकळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण करून देणारी छत्रपती शिवराय, ही कविता सादर केली.पूजा सांगळे यांनी 'एकदा तरी करून पहावे' ही कविता सादर करून उपस्थितांना जगण्याला बळ देण्याचे काम केले. तसेच अश्विनी सांगळे यांनी माणुसकीचा पंचनामा ही कविता सादर केली. कवी राजरत्न वाहुळ यांनी 'माझ्या राजानं उघडलं नवसमतेचं दार' ही शिवरायांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी कविता सादर करून शिवरायांच्या कार्याची आठवण करून दिली.
कवी चंद्रकांत निकम यांनी 'गावाकडे चल माझ्या बाळा' ही कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. समीक्षा मेथे यांनी 'मरणाच्या दारावर उभे राहताना माग' फिरायचं' ही कविता तर आणि महेंद्र पगारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकलढ्यावरील आधारित कविता सादर केली.
यावेळी पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड, गौतम पगारे,सुरेश खळे,रणजीत संसारे,सुभाष गांगुर्डे, दत्तू वाघ,
आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद शेजवळ,सूत्रसंचालन राजरत्न वाहुळ तर आभार शैलेंद्र वाघ यांनी मानले.
कार्यक्रमास वाचनालयात अभ्यासिकेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
