धुळे जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांचे यश
धुळे जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात जयहिंद हायस्कुल धुळे ची कु.लोचना नितीन पाटील हिने प्रथम तर कमलाबाई शंकरलाल कन्या विद्यालयाची कु. दिव्यंका सूचित भामरे
हिने द्वितीय बक्षीस मिळवत विभाग स्तरिय मेळाव्यासाठी निवड करण्यात आली.
इ. 8 वी ते 10वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य विज्ञान संस्था नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद धुळे, जिल्हा मुख्याध्यापक संघ, जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने धुळे येथील कमलाबाई शंकरलाल कन्या विद्यालयात 25 ऑगस्ट रोजी जिल्हा स्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आला.
मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम .मनीषा जोशी होत्या तर उद्घाटन विज्ञान पर्यवेक्षक तथा उपशिक्षणाधिकारी श्री. सुधाकर बागुल यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक संघांचे जिल्हाध्यक्ष आर. व्ही. पाटील, विज्ञान संघाचे जिल्हाध्यक्ष पी. झेड. कुवर, कार्याध्यक्ष संजय पवार, सचिव सी. टी. पाटील, उपमुख्याध्यापिका मनीषा ठाकरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. झेड. कुवर यांनी केले तर सूत्रसंचालन मनीषा चौधरी यांनी केले.
शिक्षणाधिकारी मोहन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली "भरड धान्य - पौष्टिक आहार की भ्रम" या विषयावर झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातून प्रथम व द्वितीय क्रमांकाने निवडप्राप्त स्पर्धक उपस्थित होते. यात जयहिंद हायस्कुल धुळे ची कु. लोचना नितीन पाटील हिने प्रथम, कमलाबाई शंकरलाल कन्या विद्यालयाची कु.दिव्यंका सूचित भामरे हिने द्वितीय तर धनूर च्या म. फुले विद्यालयाचा अविनाश रविंद्र गुजर यांस उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. यापैकी प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या स्पर्धकांची विभाग स्तरासाठी निवड करण्यात आली. डॉ. के. एन. माळी व राज्य आदर्श शिक्षक श्री .एन. पी. भिलाणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
यशस्वीतेसाठी साक्री तालुका विज्ञान मंडळाचे उपाध्यक्ष विजय बागूल, अतुल पाटील, पुनम बोरसे, शेखर ठाकरे, लोकेश सोनवणे, श्रीमती वहिदा खान, व्ही. डी. पाटील यांचेसह विद्यालयातील शिक्षकांनी सहकार्य केले. बक्षीस वितरणाचे संचालन मंडळाचे सचिव सी. टी. पाटील यांनी केले.
