थाळनेर प्रतिनिधी-शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील कै. अण्णासाहेब पितांबर शंकर वाडिले कला महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने अन्नपुर्णादेवी विद्या प्रसारक संस्थेचे सचिव मा. आप्पासो. श्री.निळकंठ वाडीले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर . जगताप होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. जी. जे. गावित म्हणाले की, भारतीय निवडणूक आयोगातर्फे आज 25 जानेवारी 2023 रोजी 13 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जात आहे. 'मतदानासमान दुसरे काहीच नाही, मी नक्कीच मतदान करणार’ ही या वर्षीच्या मतदार दिनाची संकल्पना आहे. ही संकल्पना मतदारांना समर्पित आहे. यातून लोकशाही व्यवस्थेने दिलेल्या आधिकाराचा वापर करून प्रत्येक मतदाराने निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे व मतदान करावे. कार्यक्रमाचे आयोजक प्रा. आर. के. सोनवणे यांनी आपल्या प्रास्ताविकात मतदार दिनाच्या बोधचिन्ह विषयी माहिती दिली. निवडणूक प्रक्रियेतील सर्वसमावेशकता दर्शविण्यासाठी या दिनासाठी बोधचिन्ह तयार केले आहे. त्यामध्ये पार्श्वभूमीवरील अशोक चक्र जगातील सर्वात मोठ्या लोकशाही यंत्रणेचे प्रतिनिधित्व करत असून शाई लावलेल्या बोटाची प्रतिमा देशातील प्रत्येक मतदाराचा सहभाग दर्शविते. बोधचिन्हातील ‘बरोबर’ची खूण मतदारांच्या माहितीपूर्ण निर्णय घेण्याच्या प्रक्रियेची निदर्शक आहे. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जगताप म्हणाले की,भारतीय राज्यघटनेनुसार, मतदानासाठी किमान पात्र वय १८ वर्षे आहे. या वयात नुकताच प्रवेश केलेल्या तरुणाईला मतदानासाठी प्रवृत्त करणे हा मूळ हेतू मतदार दिवस साजरा करण्यामागे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदान केले पाहिजे असे आवाहन याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम आधिकारी प्रा. एम. डी. रणदिवे यांनी तर आभार सहायक कार्यक्रम आधिकारी प्रा. व्ही. डी. झुंजारराव यांनी मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी मतदार दिनाची प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमाला डॉ. टी. आर. शर्मा, सहायक विद्यार्थी विकास अधिकारी श्री.हितेंद्र माळी, डॉ. आर. बी. आहिरे श्री. नवनीत वाडीले, श्री. गंगाधर राजपूत, श्री. विकास निळे, श्री. विजय मराठे, श्री. अशोक भोई, श्री. मनिष थोरात व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
