जळगांव - जिल्हयातील जळगांव विमानतळ येथिल प्रबंधक भारतीय विमान प्राधिकरण, जळगांव विमानतळ यांनी विमानतळ परिसरात वन्यप्राणी बिबट याचा वावर आढळून येत असल्याने तसेच सदर प्राणी सातत्याने विमानतळाच्या धावपटटीवर आढळून येत असल्याने त्याबाबत उपाययोजना करण्या संदर्भात वनविभागास सुचित केले होते. त्याअनुषंगाने वनविभाग जळगांव अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी जळगांव यांनी मागिल दहा दिवसापासून वन्यप्राणी बिबट याच्या हालचालीवर लक्ष ठेवले. तसेच वन्यप्राणी बिबट याच्या संचारबाबत खात्री करण्यासाठी विमानतळ परिसरात जागोजागी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. दिनांक ०५/०१/२०२३ रोजी बिबट वन्यप्राणी व दोन बछडे ट्रॅप कॅमेरामध्ये आढळून आले असल्याने त्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आलेले होते. सदर ठिकाणी लावण्यात आलेल्या पिंज-यामध्ये बिबट मादी व दोन बछडे कैद झाल्याने त्यांना पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येत आहे.
सदर कार्यवाहीमध्ये श्री. यु.एम. बिराजदार, सहा. वनसंरक्षक (मृ.सं. व कॅम्पा) जळगांव वनविभाग जळगांव, श्री.एन.ए. बोरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, जळगांव. वनपाल संदीप पाटील, वनपाल जी.एस. चौधरी, वनरक्षक उल्हास पाटील, वनरक्षक दिपक पाटील, वनरक्षक चिंचोले, वनरक्षक अजय रायसिंग, वनरक्षक संभाजी पाटील, वाहन चालक भरत बाविस्कर, वाहनचालक श्री. चव्हाण, योगेश पाटील, यांचा सहभाग होता.
सदर कार्यवाही श्री. विवेक होशिंग, उपवनसंरक्षक जळगांव वनविभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली असून सदर कार्यवाही श्री. विवेक देसाई, मानद वन्यजीव रक्षक जळगांव यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडली.
