मध्य प्रदेशातील चोरीस गेलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह दोघे चोरटे शिरपूर पोलिसांच्या ताब्यात



शिरपुर:- मध्यप्रदेश राज्यातील रतलाम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा विक्रीसाठी आणलेले ट्रॅक्टर कांदा व ट्रॉलीसह चोरून नेणाऱ्या दोघा चोरट्यांचा धुळे एलसीबी आणि शिरपूर शहर पोलीसांच्या संयुक्त पथकाने मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील दहिवद जवळ पाठलाग करीत ट्रॅक्टर सह ताब्यात घेतल्याची कारवाई केली आहे. सुनील जगदीश पवार वय 22 आणि विकास दिनेश राठोड वय 18 (रा. डिंकवा, ता. जि. रतलाम, मध्य प्रदेश) या दोघांना ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेतले. याबाबत सविस्तर असे की, रतलाम जिल्ह्यातील बारबोदना येथील समरथ बाबूलाल जाट या शेतकऱ्याचे रतलाम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 डिसेंबर रोजी रात्री कांदा विक्रीसाठी ट्रॅक्टर उभे केले होते. बाजार भाव दुसऱ्या दिवशी होणार असल्याने रात्री प्लास्टिक कागद ट्रॉलीवर टाकून घरी निघून गेले. याच संधीचा फायदा घेत आवारातून संशयितांनी ते पळवून नेले. सदर घटना 6 डिसेंबर रोजी बाजार समितीच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही वरून उघड झाली. याप्रकरणी समरथ जाट यांनी रतलाम स्टेशन रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली

दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात संशयातीणविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रतलाम पोलिसांनी तपास सुरू केला असता मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून सदर ट्रक्टर महाराष्ट्राच्या दिशेने जात असल्याचे आढळून आल्याने मध्यप्रदेश पोलिसांनी तात्काळ धुळे पोलीस दलाशी संपर्क साधला माहिती दिली. मिळलेल्या माहितीनुसार धुळे एलसीबी व शिरपूर शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने दहिवद जवळ सापळा रचला असता संशयितांनी ट्रक्टर पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पथकाने पाठलाग करीत ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले. ट्रॅक्टर मधील कांदा मात्र आढळून आला नसल्याने दोघा संशयीतांनी रस्त्यात कुठेतरी कांदा विक्री केला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सदर दोघां संशयितांना ट्रॅक्टर ट्रॉलीसह रतलाम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश आहेर, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश फड, पीएसआय संदीप मुरकुटे, पीएसआय गणेश कुटे, पोना उमाकांत वाघ, नरेंद्र शिंदे, एलसीबीचे कमलेश सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने