चंद्रकांत पाटील यांनी मागितली जाहीर माफी प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे: राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद गेले काही दिवस राज्यभर उमटले. त्यातच पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवड येथे शाईफेक झाल्यानंतर हा मुद्दा अधिकच पेटला. मात्र, त्यानंतर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

मी जाहीर माफी मागतो- चंद्रकांत पाटील

एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागितली आहे. पाटील म्हणतात, मी पुन्हा एकदा ह्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहिर माफी मागतो. माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी. ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती ही मागे घ्यावी. तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो आहे. माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती.

'महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उध्दारकर्ते, महात्मा जोतिबा फुले, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे, असेही मंत्री पाटील यांनी अधोरेखित केले आहे.

महापुरुषांच्या महान कार्याबाबत मला मनापासून आदर- चंद्रकांत पाटील

त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटते, असे पाटील यांनी म्हटले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने