शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील दहिवद ग्रामपंचायत ही एक मोठी ग्रामपंचायत असून त्या अंतर्गत विविध संस्था व कंपन्या कार्यरत असल्याने या पंचायतीच्या कारभार व उत्पन्नाच्या स्रोत देखील मोठा आहे. मात्र याच ग्रामपंचायतीची अशी शोकांतिका आहे की या पंचायतीचे कार्यालय हे बेवारस असून अशा बेवारस स्थितीत उघडे असलेल्या कार्यालयास खुद्द ग्रामपंचायत सदस्य यांनीच कुलूप लावल्याने तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे.
ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक हजर राहत नसल्याच्या निषेधार्थ दहिवद ग्रामपंचायतीचे सदस्य मयूर देवेंद्रसिंह पाटील - राजपूत यांनी 14 नोव्हेंबरला सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गावातील तुंबलेल्या गटारी, उडालेले स्ट्रीट लाईट आदी समस्यांबाबत माहिती देण्यासाठी ग्रामस्थ गेले असता कार्यालयात सरपंच व ग्रामसेवक कोणीही हजर नव्हते. कार्यालयात शुकशुकाट होता. ही बाब ग्रामस्थांनी मयूर राजपूत यांना सांगितली. त्यांनी स्वतः जाऊन पाहणी केल्यावर कार्यालय रिकामे आढळले. हा प्रकार वारंवार घडत असून गावात अनागोंदी माजल्याचे ग्रामस्थांनी लक्षात आणून दिले. त्यानंतर कोणीच हजर नसेल तर कार्यालय उघडे ठेवून काय उपयोग अशी प्रतिक्रिया देऊन मयूर राजपूत यांनी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावले. या घटनेची गाव परिसरात चर्चा सुरू असून गावातील समस्याही चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.
मयूर राजपूत यांची प्रतिक्रिया -
ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून, समजून सोडवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय असते. मीटिंगमध्ये सदस्यांचे ऐकून घेतले जात नाही, गावकऱ्यांनी समस्या मांडल्या तर तिकडे लक्ष दिले जात नाही, लोकांकडून सक्तीच्या उपकार वसूल करतात मात्र मोठ्या लोकांना सूट दिली जाते, मग नुसते कार्यालय उघडे ठेवायचा देखावा तरी कशासाठी ? म्हणून या सर्व बाबींच्या निषेध करण्यासाठी कुलूप लावले. यानंतर तरी पदाधिकाऱ्यांनी बोध घ्यावा अशी अपेक्षा आहे.