दोडाईचा, ता. १६ : धावडे येथे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्याने ८५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी दोंडाईच्या पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सतीश चंद्रसिंग राजपूत (वय ३९, रा. धावडे, ता. शिंदखेडा, ह.मु. ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काही कामानिमित्त कुटुंबासह ते ठाणे येथे गेले असता चोरट्यांनी दरवाजा तोडत घरात प्रवेश करीत कपाटातील १५ हजार रुपये किमतीचे नऊ ग्रॅम सोन्याचे कानातले, १० हजार रुपये किमतीचे ६० ते ७० ग्रॅमचे चांदीचे कडे व चाळ, ६० हजार रुपयांची रोकड असा एकूण ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.
फिर्यादीवरून दोंडाईचा पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. पोलिस उपनिरीक्षक सचिन गायकवाड तपास करीत आहेत. दोंडाईचासह परिसरात घरफोडीच्या घटनांत वाढ झाली असून, यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे.
