दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री एम. पी. पवार यांनी पंडित नेहरूंच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी भाषण, गायन, भूमिकाभिनय, कागदापासून टोप्या बनविणे, लंगडी, मामाचे पत्र हरवले,धावणे अशा विविध उपक्रमांत व खेळांत सहभाग घेत विद्यार्थ्यांनी या दिवसाचा आनंद घेतला.
कु. कनिष्का राजपूत व प्रथमेश सोनजे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू हे लहान मुलांमध्ये रमायचे आणि त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. मुले हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत. या मुलांमधून देशाचे भावी सुशिक्षित आणि मनाने प्रसन्न व आरोग्य संपन्न नागरिक तयार व्हावेत असे त्यांना नेहमी वाटे. तसेच त्यांचे शैक्षणिक व आधुनिक भारतासाठी केलेले कार्य मोलाचे होते .अशा शब्दांत त्यांचे कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले. कु.निकिता जैन यांनीही नेहरूंच्या कार्याचा परिचय करून दिला.पायल गिरासे व दुसरीच्या विद्यार्थिनींनी 'तारे जमी पर' व इ. चौथीच्या विद्यार्थिनींनी " नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी मे क्या है' ही गीते सादर केलीत
प्राचार्य श्री एम.पी. पवार यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा देवून मुलांनी प्रत्येक दिवसाचा आनंद घेवून शिक्षण घ्यावे. अभ्यासाबरोबर विविध उपक्रमात सहभागी होऊन कलागुण सादर करावेत, त्यामुळे आपले जीवन सुंदर बनते व व्यक्तिमत्वाचाही विकास होत असल्याचे विचार मनोगतातून मांडून पंडित नेहरूंच्या विचारांचा अंगीकार करून त्यांच्या स्वप्नातील भारत साकार करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गोपाल ढोले,शीतल पाटील, प्रियंका थोरात, पायल गिरासे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सौ.ललिता गिरासे यांनी केले .
