नंदुरबार - महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक श्री. विनय कारगांवकर हे दिनांक 17/10/2022 ते दिनांक 19/10/2022 रोजी पावेतो नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले आहेत.
आज दिनांक 19/10/2022 रोजी शहादा पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या प्रकाशा पोलीस दूरक्षेत्र येथे भेट देवून दुरक्षेत्राची व परिसराची पाहणी केली तसेच दुरक्षेत्र तेथील अंमलदारांकडून आढावा घेतला. तसेच प्रकाशा दूरक्षेत्र येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सुचना देवून ते करीत असलेल्या कामाकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
त्यानंतर शहादा पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटूंबीयांसाठी उभारण्यात आलेल्या वाचनालयाचे उद्घाटन करून नंदुरबार पोलीस दल हे पोलीसांसाठी व पोलीस पाल्यांसाठी करीत असलेल्या चांगल्या उपक्रमांचे कौतुक केले. पोलीस ठाणे आवारातच आधुनिक वाचनालय सुरु केल्याने शहादा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अमलदारासोबत त्यांच्या कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर शहादा पोलीस ठाणे येथील परिसरात महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक श्री. विनय कारगांवकर यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वाचनाचे मानवी जीवनातील महत्व विषद करताना महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक श्री. विनय कारगांवकर यांनी सांगितले की, " वाचनामुळे मानवी जीवनाला एक नवीन दिशा मिळते, आज पर्यंत जे काही थोर / मोठे व्यक्ती होवून गेले त्यांच्या आयुष्याला वाचनामुळे कलाटणी मिळाली. वाचनामुळे मानवी जीवनात सकारात्मक बदल घडून येतात. पोलीस दलात कर्तव्य बजावित असतांना वेळात वेळ काढून नियमित वाचनाची सवय लावून घ्यावी. वाचनालयात फक्त पुस्तकांचा संग्रह वाढवू नका, वाचनालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकांचे वाचन करुन स्वत:चा विकास करुन घ्या. शहादा पोलीस ठाणे येथील वाचनालयात पोलीस पाल्यांसाठी व पोलीस अंमलदारांसाठी स्पर्धा परिक्षेसाठी आवश्यक असलेले योग्य ते सर्व पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामुळे पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या पाल्यांनी शहादा पोलीस ठाणे येथे उद्घाटन करण्यात • आलेल्या वाचनालयाचा लाभ घ्यावा, " असे उद्घाटन प्रसंगी भाषणात सांगितले,
त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक श्री. विनय कारगांवकर यांनी उप विभागीय कार्यालय शहादा येथे भेट देवून कार्यालयाची व परिसराची पाहणी केली तसेच शहादा उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री. श्रीकांत घुमरे यांचेकडून त्यांनी उप विभागातील पोलीस ठाण्यांचा कामकाजाचा थोडक्यात आढावा घेतला. शहादा उप विभागाच्या कामाकाजाबाबत उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. श्रीकांत घुमरे यांना महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक श्री. विनय कारगांवकर यांनी योग्य त्या सुचना देवून त्यांनी शहादा उप विभागाच्या कामाकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक श्री. विनय कारगांवकर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. श्रीकांत घुमरे, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दीपक बुधवंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती पवार, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजेश शिरसाठ तसेच शहादा पोलीस ठाण्याचे अधिकारो व अमलदार उपस्थित होते.
