शिरपूर क्राईम - मारामारीच्या गुन्ह्यातील आरोपींना जामीन नाकारला





शिरपूर / प्रतिनिधी

शिरपूर शहरातील एका मारहाणीच्या तक्रारीत आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश झाल्यानंतर संशयितांनी जामीन मागितला. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्या. आर. आर. भद्रे यांनी हा निकाल दिला.

याबाबत वृत्त असे की, येथील खंडेराव बाबा संस्थानचे विश्वस्त श्रीहरी लिंगय्या यादगिरीवार यांचे चिरंजीव विद्यासागर यादगिरीवार यांना मारहाण करण्यात आली होती. दि.४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विद्यासागर यादगिरीवार हे शेतातून घरी येत होते. तेव्हा वकील कॉलनीतील पुष्कराज मेडिकलनजिक मोटरसायकलने आलेल्या चौघांनी विद्यासागरवर हल्ला चढवून जबर मारहाण केली. दिपक श्रीनिवास बंडीवार याने जाड लोखंडी कंबीने विद्यासागर याच्या डोक्यावर घाव घातला. तर भूपेश मराठे याने उजव्या कानाखाली हाताबुक्क्यांनी मारहाण केली. विशाल सोनार व निलेश बागूल या दोघांनी रस्त्यावरच्या दगडाने पाठीवर मारून दुखापत केली. या मारहाणीत विद्यासागर यास गंभीर दुखापत झाली. त्यास तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तद्नंतर त्यास धुळे येथील शासकी रुग्णालयात हलविण्यात आले. नंतर खाजगी रुग्णालयात उपचार केले.

श्रीनिवास बंडीवार, भूपेश मराठे, विशाल सोनार व निलेश बागूल या चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला. संशयित फरार झाले. परंतु पोलीसांनी दि. ११ ऑक्टोबर रोजी भूपेश मराठे व निलेश बागूल यांना अटक करून दि. १३ रोजी न्यायालयात हजर केले. त्यांना दि. २१ पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

न्यायालयीन कोठडीत जामीनासाठी अर्ज करता येतो म्हणून दोघा संशयितांनी जामीन अर्ज दाखल केले. मात्र न्यायालयाने जामीन नाकारत अर्ज फेटाळून लावले. या गुन्ह्यातील दीपक श्रीनिवास बंडीवार व निलेश बागूल हे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. भर दिवसा गजबजलेल्या परीसरात असा जीवघेणा हल्ला झाल्यानेपोलीसांसमोर वाढत्या गुन्हेगारीचे आव्हान उभे ठाकले आहे. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने