शहादा येथील ज्वलेर्सचे दुकान फोडणाऱ्या 02 आरोपीतांना 24 तासात 5 किलो चांदीच्या मुद्देमालासह अटक नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे




नंदुरबार - महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक श्री. विनय कारगांवकर हे दिनांक 17/10/2022 ते दिनांक 19/10/2022 रोजी पावेतो नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले होते. दिनांक 19/10/2022 रोजी महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक श्री. विनय कारगांवकर हे शहादा येथे तपासणीसाठी आले असता तक्रारदार नामे प्रतिक पवनकुमार गेलंडा वय- 28 धंदा व्यापार रा- तेरापंती भवन लक्ष्मीनगर शहादा हे शहादा पोलीस ठाणे येथे आले. त्यांनी त्यांचे रत्नलाभ ज्वेलर्स या दुकानातून 5 किलो वजनाचे चांदीचे दागिने हे दुकानाची मागील भिंत फोडुन त्यातून छतावर चढून तसेच छताचे स्लॅप फोडुन दुकानाच्या आत प्रवेश करुन घरफोडी केल्याचे सांगितले. तसेच मोहम्मद साजिद खत्री यांचे पेहनावा फॅशन या कापडाचे दुकानातुन देखील 15 हजार रुपये अज्ञात चोरटयाने चोरी केल्याचे सांगितले. त्यांचे तक्रारीवरुन शहादा पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीतांविरुद्ध दिनांक 19/10/2022 रोजी गु.र.नं. 638/2022 भादवि कलम 457,380 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक श्री. विनय कारगांवकर यांनी तसेच नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी शहादा येथे घडलेल्या दोन घटनांची गांभीर्याने दखल घेतली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देवून आरोपीत व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत निर्देश दिले.

सदर घटनेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ 03 पथके तयार केली. त्यातील 02 पथके ही दोंडाईचा व खेतीया परिसरामध्ये रवाना केली. तसेच 01 पथक हे गुन्हयाचे तांत्रिक विश्लेषण करीत होते.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शहादा येथील झालेल्या घरफोडीतील आरोपी पैकी एक आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन तो प्रेस मारुती मंदिरजवळ राहत आहे. सदरची बातमी त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ प्रेस मारुती मंदिराजवळ रवाना झाले. तसेच प्रेस मारुती मंदिराजवळ राहात असलेल्या सराईत गुन्हेगाराबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता अली ऊर्फ बबलू हा सराईत आरोपी प्रेस मारुती मंदिराजवळ राहत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेला बातमीदारमार्फत समजले.


प्रेस मारुती मंदिराजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत सावधानता बाळगत सापळा रचला, परंतु संशयीत आरोपी अली ऊर्फ बबलू हा सराईत गुन्हेगार असल्यामुळे आपण पोलीसांच्या सापळ्यात अडकलो असल्याचे लक्षात येताच संशयीत आरोपी अनी ऊर्फ बबलू याने तेथून पळुन जाण्याचा प्रयत्न केला परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अली ऊर्फ बबलू खान अफजल खान पठाण वय 21 वर्षे रा. ठि प्रेस मारुती मंदिराजवळ, शहादा ता. शहादा जि. नंदुरबार असे सांगितले.. अली ऊर्फ बबलू यास शहादा पोलीस ठाणे येथे आणून ज्वेलरीच्या दुकानातील घरफोडी बाबत विचारपूस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला. त्यास कौशल्यपूर्वक विचारपुस केली असता त्याने ज्वेलर्सच्या घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्या बरोबर दुसरा साथीदार नामे विक्की संजय सुर्यवंशी वय 22 वर्षे रा. ठि सालदार नगर, शहादा ता. शहादा जि. नंदुरबार हा असल्याचे - सांगितले. त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सालदार नगर येथून ताब्यात घेतले.

त्यांचेकडे अधिक विचारपुस केली असता त्यांनी पेहनावा फॅशन या कपडयाच्या दुकानात देखील चोरी केल्याची कबुली दिली. तसेच घरफोडी केलेल्या चांदीच्या दागिन्यांबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता दोन पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करुन 3 लाख रुपये किमतीचे 5 किलो वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून उर्वरीत मुद्देमाल हस्तगत करीत आहोत तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपीतांकडून शहादा व आजुबाजुच्या परिसरातील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले..

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, पोलीस हवालदार दिपक बाळकृष्ण गोरे, पोलीस नाईक विकास हिम्मत कापुरे, पोलीस कॉन्सटेबल विजय धनसुखलाल ढिवरे यांच्या पथकाने केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने