पुणे:रानभाज्या बाजारात आणून विकणे तसे अवघड आहे, या रानभाज्यांचे बीज जास्त प्रमाणात मिळत नाही, अनेक भाज्या कंदमुळाच्या आहेत. रानभाज्या सर्वस्वी निसर्गावर अवलंबून आहे त्याचे जतन होणे गरजेचे आहे. शासनाकडून रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करून त्याचा प्रसार प्रचार केला जात आहे. असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी राजगुरुनगर येथे केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने ग्रामीण जीवनोन्नत्तीअभियान अंतर्गत राजगुरुनगर येथील खेड पंचायत समितीच्या पटांगणात खेड पंचायत समितीच्या वतीने "रानभाज्या महोत्सवाचे" आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, ग्रामविकास जिल्हा प्रकल्प संचालक शालिनी कडू, तहसीलदार डॉ वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी अजय जोशी, जिप माजी सदस्य मंगल चांभारे, विस्तार अधिकारी सुखदेव साळुंके, अनिता ससाणे, सुभाष भोकटे, डॉ. दिलीप बांबळे, डॉ प्रमिला बांबळे, पस अधीक्षक रमेश इष्टे, चंद्रिका तळपे, सुजाता पचपिंड, विठ्ठल वनघरे यांच्यासह तालुक्यातील विविध बचत गटाच्या महिला, ग्रामसेवक,कर्मचारी शहरातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.यावेळी नायफड येथील कळमजादेवी महिला लेझीम पथकातील महिलांनी उपस्थितांची माने जिंकली.
या रानभाज्या महोत्सवात तालुक्यातील प्रेरणा महिला ग्रामसंघ, सक्षम ग्रामसंघ, दुर्गामाता महिला ग्रामसंघ, कोटेश्वर महिला ग्रामसंघ,रागिणी महिला ग्रामसंघ, सखी महिला ग्रामसंघ, नवीदिशा महिला ग्रामसंघ, संघर्ष महिला ग्रामसंघ आदी बचत गटांनी भाग घेतला. रानभाज्या महोत्सवात रानभेंडी, नाळभाजी, आजोळा, करडू, उंबर, पेंढरा, कवदर (रानकेळी), भोकर, चिंचर्डे , करटुली, भारंगी, तेरा, चाव्याचा बार, कोंबळ, कोकम, काठेमाठ ,बारकी, यापासून बनविलेल्या भाज्या सह मासवडी, भजी, गावरान नाचणीच्या भाकरी, चिकन, मासे आणि खेकडीचा रस्सा ठेवण्यात आला होता सलग तीन दिवस हा रानभाज्या महोत्सव होणार असून नागरिकांना या रानभाज्यांचा आस्वाद घेता येणार आहे.
यावेळी आमदार दिलीप मोहिते म्हणाले, पूर्वीच्या आदिवासी लोकांनी रामनभाज्या शोधुन त्यावर प्रक्रिया केल्या. त्या खाण्यासाठी योग्य आणि आरोग्य वर्धक असल्याने जंगलात त्याचे शोध लावून जतन केले. रानभाज्या आरोग्याला उपयुक्त असून नागरिकांनी त्या खायला पाहिजेत. आज आपल्याकडे रासायनिक भाज्या मोठ्या प्रमाणात पिकवल्या जातात त्या खाल्य्याने अनेक आजारांना तोंड द्यावे लागले. रासायनिक भाज्या पेक्षा रानभाज्या खाण्याचे सर्वानी प्रयत्न केले पाहिजेत. अलीकडे भाजीपाल्यांवर अत्यंत विषारी अशी कीटकनाशके फवारली जात आहेत. त्यामुळे त्याचे परिणाम आपल्या जीवनावर होत आहेत. माणसाला अनेक आजारांनी ग्रासलं आहे. रानभाज्या आहारात आल्या तर अनेक आजार दूर पळून जातील.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदेव साळुंके यांनी केले आभार अनिता ससाणे यांनी मानले.
Tags
news