*लेख: मा.श्री.एकनाथजी शिंदे यांची मुख्यमंत्री पदी निवड
लेखक - रणवीर राजपूत
प्रसिद्धी विभाग,वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,ठाणे.
कोरोना काळात तनमनधनाने रुग्णसेवा करून राज्यातील लाखो लोकांचे जीव वाचाविणाऱ्या रुग्णदुत मा.श्री. एकनाथजी शिंदे यांना राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला,ही ठाणेकरांच्या दृष्टीने मोठ्या भाग्याची गोष्ट आहे.चला तर,त्यांच्या
रिक्षाचालक ते मुख्यमंत्री या जीवन प्रवासावर प्रकाश टाकूया........
मित्रहो,अनाथांचे नाथ - एकनाथ या संभाजीच्या सुपुत्रानं शिवछत्रपतींच्या साताऱ्याच्या कर्मभूमीची माती ललाटी लावून शून्यातून विश्व निर्माण करण्याचं स्वप्न साकारण्यास ठाणे या सांस्कृतिक नगरीत पदार्पण केलं अन् त्यांच्या जीवनाला मोठी कलाटणी मिळाली.या शाश्वत गोष्टीला समस्त ठाणेकर साक्षीदार आहेत.शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जहाल,परखड अन् ओजस्वी वाणीनं प्रेरित होऊन,तर धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या
शिकवणीने वयाच्या अवघ्या २० व्या वर्षीच त्यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला आणि बघता-बघता त्यांचं राजकीय-सामाजिक जीवन भगवामय झालं.
क्षत्रिय मराठा बाणा जपून रुग्णसेवेसाठी आपला जीव पणाला लावणाऱ्या एकनाथजी उर्फ भाईंचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी सातारा जिल्ह्यातील जावळी या गावी झाला,अन् जणू शिवरायांच्या महा..राष्ट्रात लोकसेवेचं व्रत घेऊन एक रुग्णदुत च उदयास आला.
सातारा जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावातले रहिवासी अर्थातच शिंदेसाहेबांचे पिताश्री श्रीमान संभाजीराव शिंदे यांची आर्थिक परिस्थिती साधारण असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी भाईंनी प्रारंभी रिक्षाचालक म्हणून आपल्या जीवनाचा शुभारंभ केला.त्यानंतर आपल्या संयमशिलता,सचोटी व नेतृत्वगुणाच्या जोरावर रिक्षाचालकांची मने जिंकून त्यांनी ठाणे रिक्षा युनियनचे अध्यक्षपद संपादन केलं.त्याआधी त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण किसननगर येथील महापालिकेच्या शाळा न. ३ मध्ये,तर माध्यमिक शिक्षण कोपरी-ठाणे येथील मंगला हायस्कूलमध्ये पूर्ण केलं.त्यानंतर मात्र त्यांचं पुढील शिक्षण खंडित झालं.कारण त्यामागील मुख्य कारण होतं,ते श्रीकांतदादांचं डॉक्टर होऊन गोरगरीब, गरजू लोकांची आरोग्य सेवा करण्याचं स्वप्न साकार करायचं.तथापि त्यांनी पुढील शिक्षण घेण्याची जिद्द व दुर्दम्य इच्छा मात्र आपल्या मनात कायम तेवत ठेवली.काहीही होवो,कुठल्याही परिस्थितीत मागे हटायचं नाही,हा त्यांच्या स्वभावातील जणू स्थायीभावच!
दरम्यान आपल्या सामाजिक कार्य करण्याच्या आवडीने अन् कठोर परिश्रमाने त्यांनी दिघेसाहेबांचा विश्वास संपादन केला.त्यांना शाखा प्रमुख होण्याची संधी दिली.त्या पदास देखील त्यांनी न्याय दिला.तेथेही भाईंनी शिवसेनेसाठी रात्रंदिवस निष्ठेने काम करून वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांची मने जिंकली,अन् तेथूनच त्यांच्या भाग्याची कवाडं उघडलीत.परंतु दुर्दैवानं एक काळा दिवस उजाडला.अन् २००१ मध्ये दिघेसाहेबांचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू होऊन ठाणेकरांवर दुःखाची अवकळा पसरली.संपूर्ण ठाणे शहर सुन्न झालं.प्रत्येकाला आपल्या घरातील थोरली व्यक्ती गेल्याचे दुःख झालं.यानंतर शिवसेनेनं ठाणे जिल्हा प्रमुखाची जबाबदारी शिंदेसाहेबांना सोपविण्यात आली. ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख पदाचं उत्तरदायित्व यांच्या हाती आलं.सर्वांना बरोबर घेऊन आत्मविश्वासाने कार्य करत स्व.दिघेसाहेबांचे पवित्र पद आजमितीपर्यंत ते समर्थपणे सांभाळत आहेत,याचा ठाणेकरांना सार्थ अभिमान आहे.त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख असाच पुढे सरकत गेला.त्या आधारावर बाळासाहेब ठाकरे यांनी २००४ च्या सार्वत्रिक
निवडणुकीत कोपरी-पाचपाखाडी विधानसभेची निवडणूक लढण्याची भाईंना संधी दिली.त्या संधीचं सोनं करून त्यांनी या क्षेत्रात मोठ्या मताधिक्याने विजयश्री संपादन केली.खरं तर,त्यांच्या समाजोपयोगी कामांची ही पावतीच आहे,असे म्हणणे उचित ठरेल.यास्तव ठाणेकरांनी मा.एकनाथ शिंदेसाहेब यांना राज्याचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ठाण्याचे भाग्याविधता एकनाथजी शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांचा आदर्श घेऊन ते ठाणे जिल्ह्यातील सर्वधर्मीय लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी सातत्याने कार्यरत राहिले अन् आजही आहेत.त्यांच्या चतुरस्र सामाजिक कार्यांची जनमानसावर छाप पडून त्यांनी २००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर २००९,२०१४ अन् १०१९ या त्रय विधानसभा निवडणुकींमध्येही विरोधी पक्षांच्या उमेदवारांचा दारुण पराभव करुन ठाणे जिल्ह्यात आपला दबदबा कायम ठेवला.परंतु त्यामागे केवळ त्यांचा राजकारणातून समाजकारण करण्याचा मानस आहे,हे लक्षात घ्यावे.
धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या पश्चात ठाणे जिल्ह्याची शिवसेना सावरून भाईंनी पुन्हा भक्कम पायावर उभी केली आहे.शाखा प्रमुख,नगरसेवक,आमदार,ठाणे जिल्हा प्रमुख अन् कॅबिनेट मंत्री आणि आता मुख्यमंत्री असा त्यांचा यशस्वी राजकीय प्रवास आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरणारा आहे.शिंदेसाहेब यांनी महाराष्ट्र-बेळगाव सीमा आंदोलनात अग्रेसर असताना बेल्लारी तुरुंगात ४ महिने तुरुंगवास भोगला.त्यांचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाविषयी असलेले गांभीर्य पाहून त्यांना समन्वयक मंत्री म्हणून तेथे नियुक्ती केली होती.याशिवाय लोकांच्या न्याय्य मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलनांचे नेतृत्व करताना त्यांनी अनेक गुन्हे आपल्या अंगावर घेतले.जिल्हा प्रमुख म्हणून विविध आव्हानांना समर्थपणे तोंड देत,त्यांनी ठाणे जिल्ह्यात व आसपासच्या क्षेत्रात शिवसेनेचा गड कायमस्वरुपी राखला आहे. संवेदनशीलता,संयम,साहस अन् संघर्ष हे गुण अंगी आकारून त्यांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं.*आम्ही ठाणे जिल्ह्यातले सर्वधर्मीय लोक खरोखर भाग्यवान आहोत,ज्यांना शिंदेसाहेबसारखा लोकहितवादी नेता मिळाला.
नगर विकास विभागाचे प्रधान सचिव श्री.भूषण गगराणी हे शिंदेसाहेबांविषयी म्हणतात,"आमदार असताना त्याच्यात जो साधेपणा व नम्रता पाहिली,तोच साधेपणा व नम्रता आजही मंत्री झाल्यावर त्यांच्या स्वभावात प्रकर्षाने दिसून येते.राज्याचे मंत्री म्हणून त्यांच्यात अहंभाव वा बडेजावपणा तसूभरही नजरेत येत नाही.त्यामुळे आम्हा अधिकाऱ्यांना मोठा विश्वास मिळत असून,त्यातून शासकीय कामांचा निपटारा जलदगतीने व पारदर्शक होण्यास मदत होते.कोणतेही काम असो,नियमात बसत असेल,तरच त्यासंदर्भात पुढील कार्यवाही करावी,असा त्यांचा आग्रह असतो.कुठल्याही कामामुळे आपण मंत्री म्हणून स्वतः किंवा आपले अधिकारी अडचणीत येऊ नयेत,असा त्यांचा कटाक्ष असतो.सार्वजनिक हिताच्या उपक्रमांसाठी ते आग्रही असतात.त्यांच्यात ऐकून घेण्याची क्षमता खूप आहे.ते जास्त न बोलता,मोजकेच बोलतात अन् अभ्यासाअंती आपला अभिप्राय देतात,ही त्यांच्या कामकाजाची प्रगल्भ पद्धत आहे.त्यांच्यात प्रचंड चिकाटी असल्याने त्यांनी गेल्या १५ वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत लोकांचा जिव्हाळ्याचा क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रश्न अखेर मार्गी लावला.त्यांना राज्यातील गोरगरीब,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या मूलभूत प्रश्नांविषयी मोठी कणव आहे.शिंदेसाहेब हे राजकारणी कमी,तर समाजकारणी जास्त वाटतात.त्यांना पुढील वाटचालीसाठी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा!"
दरम्यान शिंदेसाहेबांचा कामांचा सपाटा पाहून जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्याकडे आरोग्य मंत्र्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला.जवळजवळ आठ महिन्यांचा हा कार्यभार त्यांनी समर्थपणे सांभाळून आपल्या कार्याचा ठसा उमटविला.शिंदे साहेबांनी डॉक्टरांची प्रलंबित ८०० रिक्त पदे भरून राज्याची आरोग्य यंत्रणा सक्षम केली.दुर्गम व आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या ७३२ बीएएमएस डॉक्टरांच्या सेवा नियमित केल्या.आशा सेविकांची प्रलंबित वेतनवाढ मंजूर करून त्यांना दिलासा दिला.ग्रामीण भागातील लोकांची सोय व्हावी,या उद्देशाने त्यांनी राज्यातील उप जिल्हा रुग्णालयांना १०२ डायलिसिस मशिन्स सुपूर्द करून दिल्याने ग्रामस्थांना आता आरोग्य सेवेसाठी शहराकडे धाव घेणे कायमचे थांबले.याशिवाय राज्यात ११०० आरोग्य वर्धिंनी केंद्रे सुरू केलीत.राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ३४,००० कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यान्वये किमान १५,६०० रुपये एवढं वेतन लागू केले.त्यामुळे त्यांच्या कुटुंबांच्या दैनंदिन गरजा भागविणे सुकर झाले.यास्तव त्यांनी शिंदेसाहेबांचे आभार मानले.महत्वाचे म्हणजे राज्यातील आदिवासी भागांमधील कुपोषणाची समस्या मिटविण्यासाठी मेळघाट पॅटर्न लागू केला.त्यातून ही समस्या मिटविणारे ना.एकनाथ शिंदे हे पहिले आरोग्यमंत्री म्हणून साबित झाले.शिंदेसाहेबांच्या बाबतीत उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे कुठल्याही खात्याची जबाबदारी दिली,तरी ते त्यास न्याय दिल्याशिवाय रहात नाहीत.यावरून त्यांच्या पारदर्शक कार्यपद्धतीची व सेवाभावीवृत्तीची प्रचिती येते.
कोरोना महामारीमुळे सारं जग मोठ्या संकटात सापडले असता,नगरविकास मंत्री या नात्याने शिंदेसाहेबांनी ठोस उपाययोजना करून ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कोरोनाला नियंत्रित करण्यात यश मिळविलं.कोरोना काळातील भाईंनी केलेली रुग्णसेवेची कामे राज्यातील बहुतांशी लोकांनी प्रत्यक्ष बघितली आहेत.सुरुवातीच्या काळात पुरेशा आरोग्य सुविधा नव्हत्या,कारण या महामारीवर कोणतीही लस वा औषध जगात उपलब्ध नव्हतं.मा.शिंदेसाहेबांच्या संकल्पनेतून साकारलेल्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन या द्वय सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राज्यात जागोजागी आरोग्य शिबिरे आयोजित करून लोकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली.तसेच कोरोनाविषयक जनजागृती करून लोकांना राज्य सरकारच्या नियमावलीचे तंतोतंत पालन करण्याचे विनंतीवजा आवाहन केलं. त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगून स्वतःची व आपापल्या कुटुंबांची काळजी घेतली.आतापर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये सुमारे १०० आरोग्य शिबिरे आयोजित केल्याने पाच लाखांहून अधिक लोकांनी या शिबिरांचा लाभ घेतला आहे.त्यामुळे कोरोना काळात लोकांच्या आरोग्याचे एका अर्थाने रक्षण झाले,असे म्हणणे उचित ठरेल.
राज्यातील गोरगरीब लोकांचे व त्यांच्या पाल्यांचे महागडे ऑपरेशन्स(शस्त्रक्रिया ) पैशांअभावी होऊ न शकल्याने दुर्दैवाने त्यांना आपले जीव गमवावे लागायचे.यावर रामबाण उपाय शोधून रुग्णदुत ना.एकनाथ शिंदे यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यातल्या विविध रुग्णालयांमध्ये गोरगरीब,निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे महागडे ऑपरेशन्स मोफत किंवा अल्पदरात होऊ लागले आहेत.त्यातून जीवन जगण्याची नवी उमेद त्यांच्यात निर्माण होत आहे,ही दिलासा देणारी गोष्ट आहे.आतापर्यंत १२,००० हून अधिक शस्त्रक्रिया सुखरूप पार पडल्या आहेत.याशिवाय शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोरगरीब व निराधार लोकांच्या लहान मुलांच्या हृदयावरील छिद्राचे ठाणे येथील ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये गेल्या चार वर्षांपासून मोफत ऑपरेशन्स होत आहेत.आजमितीपर्यंत ४,००० हून जास्त मुलांचे ऑपरेशन होऊन ती लहान मुलं-मुली आता सुदृढ व निरोगी जीवन जगत आहेत.हे सत्कर्म मा.एकनाथजी शिंदेसाहेबांच्या हातून झाले असून,त्यास डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन अन् शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य समन्वयक श्री.मंगेश चिवटे व त्यांच्या वैद्यकीय टीमचे भरीव योगदान लाभलं आहे.त्याचं राज्यात सर्वत्र कौतुक होत असून,सर्वधर्मीय लोक व राजकीय कार्यकर्त्यांकडून त्यास व्यापक प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.या पार्श्वभूमीवरच राज्यातल्या लोकांनी शिंदेसाहेबांना अनाथांचे नाथ..एकनाथ ही उपमा दिली आहे.ही रुग्णसेवा जात,धर्म,पंत,गोत्र आणि राजकारण ह्या गोष्टी बाजूला सारून होत आहे,हीच पुरोगामी महाराष्ट्राची खरी ओळख आहे.रुग्णसेवेचं हे नेत्रदीपक कार्य राज्यातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तींना अन् संस्थांना पथदर्शक ठरेल,हे निश्चित.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने अन् धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्यासारख्या निःस्वार्थी व सदाचारी गुरूंच्या सानिध्यात जडणघडण झालेले नेते श्री.एकनाथ शिंदेसाहेब हे पुढील काळातही राजकीय व सामाजिक जीवनात नेहमी यशाची उत्तुंग शिखरे गाठतील,हे निश्चित.गेल्या दोन वर्षांच्या कोरोना काळात पालकमंत्री म्हणून शिंदे साहेबांनी सर्वधर्मीय लोकांच्या जीवांचे रक्षण करण्यासाठी अन् त्याबरोबरच कोरोना नियंत्रित करण्याकरिता कोविड हॉस्पिटल्स अन् अन्य वैद्यकीय साधनसामग्री ज्या गतीने उपलब्ध करून दिली,त्याची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे.आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांनी मोठ्या हिमतीने कोरोनाशी लढा दिला आहे.दरम्यान त्यांना दोन वेळा अन् सुपुत्र,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना देखील दोन वेळा कोरोनाची लागण झाली.तथापि त्याची तमा न बाळगता,शिंदे पिता पुत्राने त्यावर सहज मात करून पुनश्च कोरोनाशी निखराचा लढा सुरू केला आहे.जब तक है जान,तब तक हम बाळासाहेब के हिंदुत्व को अपनाकर हम जांबाज शिवसैनिक आखरी दम तक लढते रहेंगे,हम किसीभी हालात मे,पिछे नही हटेंगे.देखो,एक दिन *कोरोना को-रोनाही पडेगा,ये पत्थर की लकीर है!
राज्यातील लोकांचे आरोग्याचे रक्षण करण्याबरोबरच त्यांना पंचतारांकित दळणवळणच्या पायाभूत सुविधा देण्यासंदर्भात देखील शिंदेसाहेब हे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) म्हणून पूर्णक्षमतेने कृतिशील राहिले.राज्यातील रस्त्यांचा विकास,त्यांचं बांधकाम अन् देखरेखीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कार्यरत आहे.
एवढं करून भाई थांबले नाहीत.मुंबई-सिंधुदुर्ग असा रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा ग्रीन फिल्ड कोकण द्रुतगती चा महामार्ग तयार होत असून,त्यामुळे कोंकण विभागातील औद्योगिक व पर्यटन विकासासह या क्षेत्राचे दळणवळण अधिक गतिमान होणार आहे.या व्यतिरिक्त ठाण्याहून घोडबंदरमार्गे बोरिवलीला जाणारा रस्ता ; शीळ- कल्याण रुंदीकरण ; ठाणे घोडबंदर उन्नत रस्ता ; वडाळा- घाटकोपर ठाणे मेट्रो ; ठाणे शहरअंतर्गत मेट्रो प्रकल्प ; कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक ;ठाण्यातील कोपरी पुल ;वांद्रे-वर्सावा सी लिंक प्रकल्प ; मुंबई पश्चिम किनारपट्टीवरील कोस्टल महामार्ग प्रकल्प आदी तत्सम पब्लिक प्रोजेक्ट प्रगतीपथावर आहेत.त्यामुळे राज्यभरातील दळणवळण प्रक्रिया गतिमान होईल,हे नक्की.वास्तवात नागरी जीवन अधिक सुखकर,विना अडथळ्याचं आणि समृद्ध करण्याकडे शिंदेसाहेबांचा मानस आहे,हे दिसून येते.
समृद्धी महामार्ग हा ड्रीम प्रोजेक्ट सार्वजनिक बांधकाम मंत्री या नात्याने शिंदेसाहेबांनी या प्रकल्पाची उभारणी जलदगतीने व्हावी,या उद्देशाने अधिक लक्ष घातले आहे.यावर सुमारे ५५ हजार कोटी रुपये अंदाजित खर्च अपेक्षित आहे.त्यामुळे १० जिल्हे,२६,तालुके अन् ३९३ खेडींची दळणवळणाची मोठी सोय होणार आहे.हा प्रोजेक्ट राज्यातील लोकांना वरदान ठरणार असून,पुढच्या काळात अवघ्या ८ तासात मुंबई-नागपूर अंतर पार करता येईल.त्यास वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे ठरले आहे.हीच खरी ना.एकनाथ शिंदेसाहेबांच्या कारकिर्दीतली सार्वजनिक बांधकाम खात्याची विकासगाथा होय.
ठाणे शहरातील धोकादायक अन् मोडकळीस आलेल्या इमारतींतल्या लोकांचे जीवन सुरक्षित करून त्यांना त्यांच्या हक्काचे घर देण्यासाठी नगर विकास मंत्री या नात्याने यांच्या प्रयत्नांतून क्लस्टर डेव्हलपमेंट योजना कार्यान्वित करण्यासाठी सिडको व ठाणे महापालिका यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.पहिल्या टप्प्यात किसननगरमध्ये हे काम सुरू करण्यात येईल,असे शिंदेसाहेबांनी यावेळी घोषित केले.गेली दोन दशके क्लस्टर योजनेसाठी जो लढा दिला,त्याची ही फलश्रुती आहे,असे विधान शिंदेसाहेबांनी याप्रसंगी केले.या महत्वाकांक्षी योजनेमुळे सुमारे ८ ते १० लाख ठाणेकरांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळून,त्याचे नवे व सुंदर घर मिळण्याचे स्वप्न साकार होईल,हे निश्चित.आमदार झाल्यानंतर २००४ साला पासून मी ते सदर योजनेसाठी लढत आहेत.अखेर आज या योजनेस मान्यता मिळाली,ही माझ्या दृष्टीने समाधानाची तर, ठाणेकरांसाठी भाग्याची गोष्ट आहे,असे उदगार त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना काढले. पदाला न्याय देत,त्यांनी ह्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी २५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला.पालकमंत्री म्हणून पद ग्रहण केल्यावर सर्वप्रथम त्यांनी नक्षलवादी कारवायांचा बीमोड अन् पोलीस सक्षमीकरणासाठी ५६ कोटीचा निधी मिळवून घेतला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील आदिवासी जनजातीच्या आरोग्याची काळजी करत,शिंदेसाहेबांनी या क्षेत्रात १० दिवसांचे आरोग्य शिबीर भरविले.त्यामागील मुख्य कारण म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची झळ आदिवासीबहुल क्षेत्रातील मागास जनजातीच्या लोकांपर्यंत पोहोचू नये.विशेष म्हणजे नक्षलवादाचा मार्ग सोडून,आत्मसमर्पण केलेल्या दोन कुटुंबांना सर्वतोपरी मदत करून त्यांना आपलेसं करून त्यांच्यात मत परिवर्तन घडवून आणलं.त्यांना *काय वाईट अन् काय चांगलं यातील फरक समजावून ,त्यांच्या मनातील गैरसमज दूर केलेत.शिंदेसाहेबांनी एक पाऊल पुढे टाकून,गोरगरीब व गरजू लोकांना जगण्यासाठी रोजगार मिळवून देण्यास त्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केलेत,जेणेकरून त्या लोकांनी नक्षलवादी कारवायां ची वाट धरू नये.त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची सोय करून,त्यांचा आत्मसन्मान जागवला.त्यांच्या मनात शिक्षणाची गोडी निर्माण केली.खरं तर,ना.एकनाथ शिंदे यांनी दगडाला देवपण देण्याचं सत्कर्म करून,ते संत एकनाथांचं प्रतिक असल्याचं ह्याची देही ह्याची डोळा दृष्टोत्पत्तीस येते.
महाड दुर्घटनेत मरण पावलेल्या दोन कुटुंबियांच्या दोन्ही मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडे सोपविली.इतकेच नव्हे तर,त्या मुलांच्या नावे प्रत्येकी १० लाख रुपये त्यांच्या नावे एफ.डी.काढून दिली. चिमुकल्या प्रियांशीची गोष्ट तर वेगळीच होती.ह्या नवजात मुलीच्या कुटुंबातील आईसह प्रत्येक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह अन् ही एकटी निगेटिव्ह होती.ही गोष्ट कळताच शिंदेसाहेब त्या चिमुकलीच्या मदतीला धावून आले.भाईंनी तातडीने त्या मुलीला घेऊन शिवसेना महिला आघाडीच्या सौ.मुदलियार यांच्याकडे जाऊन ती चिमुकली सोपविली.त्यानंतर वीस दिवसानंतर तिची आई बरी झाल्यावर भाईंनी स्वत:च्या हाताने ती चिमुकली आईकडे सोपविली.सदर प्रसंग अतिशय हृदय हेलवणारा होता.मुलीला पाहिल्यावर आईच्या डोळ्यात अश्रू मावत नव्हते.खरं तर,त्यावेळी सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रू झळकत होते.त्या आईनं शिंदेसाहेब आणि सौ. मुदलियार मॅडमचे पदस्पर्श करून शतश: आभार मानले. असच एक उदाहरण ठाणे येथील नौपाडा परिसरातील आहे.जेथेही पालकमंत्री मदतीला धाऊन गेले. नौपाडा स्थित पार्वती निवासस्थानाला मोठी आग लागली होती.त्यात दोन घरे बेचिराख झाले होते.या पार्श्वभूमीवर त्यांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने शिंदेसाहेबांनी तत्कालिन महापौर नरेश म्हस्के यांच्याशी बोलून सदर दोन्ही पिडित कुटुंबांना घर देण्याच्या सूचना दिल्या.लगेचच नुकसानग्रस्त कुटुंबियांना नवीन घराच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. खरं तर,यामुळेच शिंदेसाहेबांना अनाथांचे नाथ एकनाथ असे गौरवानं संबोधिलं जातं.
म्हणतात ना,हर कमियाब इंसान के पिछे औरत का हाथ होता है! ,हे विधान ना.शिंदेसाहेब आणि डॉ.श्रीकांतदादा यांच्या बाबतीत खरं ठरलं आहे.अत: यास कोणी नाकारूच शकत नाही.ना.शिंदेसाहेब तसेच डॉ.श्रीकांतदादा हे खरोखर भाग्यवान आहेत,ज्यांना अनुक्रमे सौ.लतावहिनी अन् सौ.वृषालीताई सारख्या बुद्धिमान,सुस्वभावी व सुसंस्कृत गृहिणी मिळाल्यात.परिणामी आदरणीय भाई अन् आदरणीय दादांची राजकीय, सामाजिक व कौटुंबिक जीवनात उत्तरोत्तर प्रगती होणं,ही सौभाग्याची गोष्ट आहे.अशीच प्रगती आपल्या भावी जीवनात होत राहो,ही आई जगदंबे चरणी प्रार्थना! आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत राज्यातील गोरगरीब,गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे घरकुल,रोजगार,स्वयं रोजगार,शिक्षण,आरोग्य हे मूलभूत प्रश्न मार्गी लागोत अन् त्यांच्या जीवनात सुख - समृद्धी येवो,ही सदिच्छा आम्ही मराठी भूमिपुत्र व्यक्त करतो.सन्माननीय श्री.एकनाथजी शिंदेसाहेब यांची मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
जय महाराष्ट्र!
