‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवा! जिल्हाधिकारी जलज शर्मा : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक



धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहत चाचण्यांची संख्या वाढवावी. कोरोनाबाधित

व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचीही चाचणी करावी. ‘कोविड- 19’ प्रतिबंधक लसीकरण वाढवावे, असे निर्देश

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले.

कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा

सभागृहात आज दुपारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा

परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, श्री भाऊसाहेब

हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुणकुमार मोरे, जिल्हा

शल्यचिकित्स्क डॉ. कांचन वानेरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रमोद

भामरे (शिरपूर), जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, महानगरपालिकेचे वैद्यकीय

अधिकारी डॉ. जे. सी. पाटील आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या वाढत असून 1 ते

27 जून या कालावधीत 64 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी 22 रुग्ण सध्या सक्रिय आहेत. अशा

परिस्थितीत आरोग्य यंत्रणांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा

रुग्णालयासह सर्व शासकीय रुग्णालयांमधील चाचण्यांची संख्या वाढवावी. ऑक्सिजन प्रकल्प तत्काळ कार्यान्वित

होतील, असे नियोजन करावे. तसेच ऑक्सिजनचा पुरेसा साठा राहील याचीही दक्षता घ्यावी. कोरोना विषाणूचा

प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणावर भर द्यावा. प्रत्येक पात्र नागरिकाला लस देण्याचे नियोजन करावे. वाढत्या

रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक औषधे, साधनसामग्रीची उपलब्धता करून ठेवावी, असेही निर्देश

जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दिले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वानेरे यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात कोविड 19 चे 22 रुग्ण असून आहेत.

त्यांच्यावर आरोग्य विभागाचे लक्ष आहे. जून महिन्यात आतापर्यंत एकूण 64 रुग्ण आढळून आले. धुळे जिल्ह्याचा

पॉझिटिव्हीटी दर 2.2 असून रुग्ण बरे होण्याचा दर 98 टक्के आहे. या 22 रुग्णांपैकी धुळे शहरात 16, शिरपूरला

दोन, तर साक्री तालुक्यात चार सक्रिय रुग्ण आहेत.


धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधितांची संख्या 22 आहे. संबंधित रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.

नागरिकांनीही दक्षता बाळगली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्त बाळगावी. मास्कचा वापर करावा. कोविड-

19 प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे.

-जलज शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने