क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे विद्युत शॉक लागून एका युवकाचा मृत्यू; वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 




पुणे :(ता. इंदापूर) गावाच्या हद्दीतील अर्जुन वस्ती येथील ओढ्याशेजारी सुरू असलेल्या पालखी मार्गाच्या कामादरम्यान  क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे सुमित मारुती वाडेकर या १८ वर्षीय युवकाला विद्युत शॉक लागल्याने नाहक आपला जीव गमावावा लागल्याची दुर्दैवी घटना ११ जानेवारी रोजी घडली होती. या घटनेच्या जवळपास एका महिन्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी सुरज राजेंद्र क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरून भा. द. वि. कलम ३०४ अ अंतर्गत विशालकुमार प्रभूनाथ यादव या व्ही. एच. खत्री कंपनीच्या क्रेन चालकाविरोधात वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी व्ही. एच. खत्री कंपनीविरोधात आपली कोणतीही तक्रार नसल्याचे म्हटले आहे.

सविस्तर हकीकत अशी की, सुरज राजेंद्र क्षिरसागर (सध्या रा. बारामती, मुळ रा. संतपेठ, पंढरपूर, जि. सोलापूर) हे व्ही. एच. खत्री कंपनीच्या पोकलेनवर ऑपरेटर म्हणून कामाला आहेत. चिखली गावाच्या हद्दीत अर्जुन वस्ती ओढ्याशेजारी पालखी मार्गाच्या रस्त्याचे काम सुरू असल्याने या कॅम्पच्या ठिकाणी सुरज क्षिरसागर यांचा मावस भाऊ सुमित (रा. खेडभोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) त्यांना १० जानेवारी रोजी भेटण्यासाठी आला होता. ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पालखी मार्गाच्या कामावर असलेल्या कामगारांच्या राहण्याच्या कंटेनरला वायरूफ लाऊन क्रेनच्या (एम. एच. ४२ बी. बी. ६४५०) साहाय्याने उचलून ट्रकमध्ये ठेवत असताना क्रेन चालक विशालकुमार याच्या निष्काळीपणामुळे क्रेनची बुम वरून गेलेल्या विद्युत तारांना चिकटली. परिणामी क्रेन आणि कंटेनरमध्ये विद्युत प्रवाह संचारल्याने क्रेन आणि कंटेनर दोन्ही हलू लागले.



हलत असलेला कंटेनर आपल्या अंगावर येईल या भीतीने सुमितने कंटेनरला हात लावला. त्यामुळे सुमितला विद्युत प्रवाहाचा शॉक लागून तो जखमी झाला होता. त्याला तात्काळ लासूर्णे येथील देसाई हॉस्पिटल व तदनंतर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. शविच्छेदनानंतर मयत सुमितला त्याच्या गावी नेऊन त्याच्यावर अग्नी संस्कार करण्यात आले होते. दरम्यान ३ फेब्रुवारी रोजी सुरज क्षिरसागर यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात व्ही. एस. खत्री कंपनीचा क्रेन चालक विशालकुमार यादव याच्या विरोधात फिर्याद दिली. त्या अनुषंगाने यादव याच्या विरोधात ३०४ अ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने