जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे गट आणि गण झाले निश्‍चित प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे - पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी नव्याने गट निश्‍चितीसाठी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषदेसाठी ८२ तर, पंचायत समित्यांसाठी एकूण १६४ गण निश्‍चित केले आहेत.
यामुळे जिल्हा परिषदेचे नवीन सात गट आणि पंचायत समित्यांचे नवीन १४ गण वाढले आहेत. हवेली तालुक्यातील २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याचा मोठा फटका या तालुक्याला बसला आहे. हवेली तालुक्यातील तब्बल सात गट आणि १४ गणांवर संक्रांत आली आहे. नवीन रचनेत हवेली तालुक्यात आता केवळ सहा गट आणि १२ गण निश्‍चित झाले आहेत.
हवेली तालुक्यातील कमी झालेले सात आणि नव्याने निर्माण झालेले सात यामुळे जिल्ह्यात नवीन १४ गट आणि २८ गण तयार झाले आहेत. दरम्यान नवीन गट रचनेत आंबेगाव आणि वेल्हे या दोन तालुक्यातील पूर्वीचीच गट आणि गणांची संख्या कायम राहिली आहे. या नव्या गट रचनेचा १० तालुक्यांना फायदा झाला आहे. फायदा झालेल्या दहापैकी जुन्नर, खेड, दौंड आणि इंदापूर या चार तालुक्यात प्रत्येकी दोन गट आणि प्रत्येकी चार गण वाढले आहेत

जिल्ह्यातील शिरूर, मावळ, मुळशी, पुरंदर, भोर आणि बारामती या सहा तालुक्यात प्रत्येकी एक गट आणि प्रत्येकी दोन गण नव्याने निर्माण झाले आहेत. जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याने, पुणे जिल्ह्यातील गट आणि गणांची संख्या कमी होणार असल्याचे निश्‍चित झाले होते. यानुसार जुन्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या ७५ गटांची संख्या २ ने कमी होऊन तीन ७३ तर, गणांची संख्या १४६ झाली होती.
दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या गट आणि गणांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. या नव्या रचनेत गट आणि गणांची संख्या वाढविण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यामुळे या नव्या रचनेनुसार पूर्वी पुणे जिल्ह्यात ८३ गट आणि १६६ गण निश्‍चित करण्यात आले होते. परंतु ही संख्या अंतिम करताना त्यात परत अनुक्रमे एक गट आणि दोन गणांनी संख्या कमी झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
हवेलीची मोठ्या तालुक्यातील ओळख संपुष्टात
दरम्यान, आतापर्यंत हवेली तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक गट आणि गणांची संख्या राहत असे. यानुसार २०१२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत हवेली तालुक्यात दहा गट आणि २० गण होते. त्यानंतर पाच वर्षांनी झालेल्या २०१७ च्या निवडणुकीत हीच संख्या अनुक्रमे १३ आणि २६ झाली होती. परंतु आता यात अनुक्रमे सात आणि १४ ने घट झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक मोठा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हवेलीची ओळख संपुष्टात आली आहे. वेल्हे तालुक्याने मात्र सर्वात लहान तालुक्याची असलेली ओळख कायम राखली आहे.

नव्या रचनेनुसार नवीन गट, गणांची संख्या
तालुका --- गट --- गण
जुन्नर --- ०९ --- १८
आंबेगाव --- ०५ --- १०
शिरूर --- ०८ --- १६
खेड --- ०९ --- १८
मावळ --- ०६--- १२
मुळशी ---०४---०८
हवेली --- ०६ ---१२
दौंड --- ०८ --- १६
पुरंदर --- ०५ --- १०
वेल्हे --- ०२---०४
भोर --- ०४ ---०८
बारामती --- ०७ --- १४
इंदापूर --- ०९ --- १८
एकूण --- ८२ --- १६४

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने